Blog

कर्करोगाची लक्षणे

कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा असा रोग आहे जो शरीराच्या कोणत्याही अवयवात (मस्तिष्क, मेंदू, अन्ननलिका, जठर, यकृत, मूत्रपिंड, स्तन, गर्भाशय इ.) निर्माण होऊ शकतो. चरक, सुश्रुत या आयुर्वेदीय संहितात दुष्ट व्रण-ग्रंथी-अर्बुद-विद्र्धी-विसर्प-नाडीव्रण- मांसदोषज विकार या व्याधींचे वर्णन केलेले आहे. कर्करोगाची लक्षणे या व्याधींशी साधर्म्य असलेली आहेत. शरीराच्या विशिष्ट अवयवात/स्थानात दुष्ट व्रण – ग्रंथी – अर्बुद निर्माण झाल्यावर दोन प्रकारची लक्षणे दिसतात.

प्रत्यक्ष व्याधीची लक्षणे –

दुष्ट व्रण निर्माण झाल्यास त्यास्थानी तीव्र वेदना, आग होणे, आरक्त वर्ण यांसारखी लक्षणे दिसतात.

दुष्ट अवयव – स्थान – स्त्रोतसाची लक्षणे –

अवयव लक्षणे – दुष्ट अर्बुद आमाशयात निर्माण झाला तर आम्लपित्त, वारंवार उलट्या होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात.

स्थानिक लक्षणे – मांडीच्या ठिकाणी दुष्ट अर्बुदादी निर्माण झाल्यास त्या भागात जडपणा, पायाच्या हालचाली करताना वेदना होणे अशी लक्षणे दिसतात.

स्त्रोतस लक्षणे – यकृतात दुष्ट अर्बुद – विद्र्धी निर्माण झाल्यास यकृत हे रक्तवह स्त्रोतसाचे मूळस्थान असल्याने कावीळ, रक्तपित्त यांसारखी रक्तवह स्त्रोतसाच्या दुष्तीची लक्षणे दिसतात.

दुष्ट व्रण, दुष्ट ग्रंथी, दुष्ट विसर्प, दुष्ट विद्र्धी यांची आयुर्वेदीय ग्रंथात सामान्य आणि विशेष अशी दोन प्रकारची लक्षणे सांगितली आहेत.

दुष्ट व्रण – व्रण म्हणजेच जखम होय. शरीरात दोन कारणांनी व्रण निर्माण होतात.

शरीरातील वात, पित्त, कफ, रक्त या दोष व धातूंच्या दुष्टीमुळे जो व्रण निर्माण होतो त्याला शारीर/निज व्रण असे म्हणतात.

मार लागणे, पडणे, हत्याराचा आघात होणे, पशु-पक्षी-कीटक यांचा दंश त्यांच्या शरीरावरील केस, मुत्र, पुरीष यांचा स्पर्श यांसारख्या बाह्य कारणामुळे जे व्रण निर्माण होतात त्याला आगन्तु व्रण असे म्हणतात.

सुश्रुताचार्यांनी निज व्रणाचे दोषांच्या दुष्टीनुसार १५ प्रकार सांगितले आहेत. वात-पित्त-कफ व रक्त या दोषांनी दुष्ट झालेल्या व्रणास दुष्ट व्रण असे म्हणतात. दुष्ट व्रण अतिशय संकुचित मुख असलेला, अतिकठीण, मृदू, दबलेला, अतिशीत,, अतिउष्ण, काळा – पांढरा –पिवळा यापैकी कुठलातरी वर्ण असलेला, दुर्गंधीयुक्त, किळसवाणा, वेदनादायी, लाली-खाज-सूज यांनी युक्त, दुष्ट रक्तस्राव होत असलेला आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. कर्करोगाच्या काही प्रकारात अशी दुष्ट व्रणाची लक्षणे आढळतात.

दुष्ट ग्रंथी –

शरीराच्या एका स्थानात जेव्हा दोष एकत्र येऊन संचित होतात तेव्हा त्यांना ग्रंथी म्हणतात.

यात प्राधान्याने मांस, मेद व रक्ताची दुष्टी होऊन सूज निर्माण होते. गोलाकार, कठीण व वर आलेली सूज ही दुष्ट ग्रंथीची सामान्य लक्षणे आहेत. दुष्टी करणाऱ्या दोष धातूच्या अधिक्यानुसार दुष्ट ग्रंथीचे वातज, पित्तज, कफज, सिराज, रक्तज, मांसग्रंथी, अस्थीग्रंथी, व्रणग्रंथी असे प्रकार पडतात. कर्करोगाचे काही प्रकार दुष्ट ग्रंथीत मोडतात.

दुष्ट अर्बुद –

शरीराच्या कोणत्याही भागात प्रकुपित झालेल्या दोषांनी मांसाची दुष्टी उत्पन्न करून जो उंचवटा उत्पन्न होतो त्याला अर्बुद म्हणतात. हा उंचवटा मांसाच्या संचयामुळे निर्माण होतो.

आकाराने गोल व मूळ ठिकाणी मोठा असलेला या भाग हळूहळू वाढतो. त्याची वाढ होताना फारशी वेदना जाणवत नाही. दोषांनी दुषित झाल्याने त्याला दुष्ट अर्बुद असे म्हणतात.

अर्बुद निर्माण होण्यात कफ दोष, मांस व मेदाचे अधिक्य असले तरी वातज, पित्तज, कफज, रक्तज, मांसज व मेदोज असे त्याचे सहा प्रकार पडतात. याशिवाय अर्बुदावर अर्बुद निर्माण होणे याला अर्ध्यबुर्द व शेजारी शेजारी दोन अर्बुद निर्माण होणे याला द्वीरबुर्द असे म्हणतात. अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांत अशा प्रकारचे अर्बुद प्रत्यक्ष पाहायला मिळते.

दुष्ट विद्र्धी –

ज्या सुजेत अतिशय लालपणा, उष्ण स्पर्श अशी लक्षणे दिसतात त्याला दुष्ट विद्र्धी असे म्हणतात.

त्वचा, रक्त, मांस, मेद यांची दुष्ट दोषामुळे गंभीर धातुस्थ दुष्टी होते. त्यामुळे अतिशय उंचवटा असलेली सूज निर्माण होते. त्याला विद्र्धी म्हणतात. यात प्राधान्याने रक्तदोषाची दुष्टी होते. गुद, बस्तीमुख, नाभी, वंक्षण, वृक्क, यकृत, प्लीहा, हृदय  या शरीराच्या आभ्यंतर अवयवात जेव्हा दुष्ट दोषांनी रक्त व मांसाची दुष्टी होते तेव्हा गोलाकार दुष्ट विद्र्धी निर्माण होतो.

दुष्ट विद्र्धी शरीर अवयवात मोठे, वेदनायुक्त, गोल किंवा आयताकार व वारंवार दुष्ट होणारा असतो. विद्र्धीचे वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, रक्तज व क्षतज असे प्रकार पडतात. काही कर्करोग प्रकार दुष्ट विद्र्धीत मोडतात.

यांशिवाय दुष्ट विसर्प, दुष्ट नाडीव्रण, दुष्ट गलगंड, दुष्ट गंडमाला यांसारख्या व्याधीही कर्करोगाच्या काही प्रकारात मोडतात. वर उल्लेख केलेले दुष्ट व्रण – ग्रंथी – अर्बुद इ. व्याधी शरीराच्या ज्या अवयवात निर्माण होतात त्या अवयवाचा कर्करोग निर्माण करतात. रक्ताच्या कर्करोगाचे आयुर्वेदात वर्णन केलेल्या रसधातूगत ज्वर, रक्तधातुगत ज्वर, ज्वर पाक, पांडू, रक्तपित्त, कृमी या व्याधींशी साधर्म्य आढळते.

***************