महानुभाव संप्रदाय

……………………………………………………………………………………………………………

महानुभाव संप्रदाय

महाराष्ट्राला विविध धर्म, वंश, पंथ आणि अध्यात्मिक केंद्रांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडात फार मोठा वारसा लाभलेला आहे. वेळोवेळी त्याचा उद्गम आणि विकास होत गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. महानुभाव हा त्यातीलच एक अवैदिक संप्रदाय. जातिभेदाला मूठमाती देत समाजात एकत्मतेचे भान जागवणारया आणि मराठी भाषेची अस्मिता वाढवणारया या संप्रदायाचे सामाजिक योगदान हे आपल्याला कदापीही विसरता येणार नाही.

……………………………………………………………………………………………………………

महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक पुरोगामी संप्रदाय म्हणून ओळखला जातो. श्री चक्रधर स्वामी या संप्रदायाचे संस्थापक होत. पंचकृष्णावतार हे त्यांचे आराध्य दैवत आहे. त्यात श्रीकृष्ण, श्रीदत्त, चांगदेव राऊळ, गोविंदप्रभू आणि स्वतः चक्रधर स्वामी यांचा समावेश आहे. यांचा दत्त एकमुखी आहे. यांच्या तत्वज्ञानात प्रपंच, जीव, देवता आणि परमेश्वर या चार गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. त्यात प्रपंच जड आहे, जीव बद्धमुक्त आहे, देवता नित्यबद्ध असून कनिष्ठ आहेत आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे अशा विचारसरणीवर हा पंथ उभा राहिला आहे.

सर्वमान्य तत्त्वज्ञानाचा स्वीकार

प्रपंच जड असल्याने आणि देवता कनिष्ठ नित्यबद्ध मानल्याने फक्त दत्त आणि श्रीकृष्ण या देवअवतारांनाच त्यांनी भक्ती भावाने आळवण्यास सांगितले. सगळ्यांना पेलवेल असे द्वैती तत्वज्ञान स्वीकारले. त्यात त्यांनी मुंगी साखरेचा दृष्टांत देऊन स्वतः साखर होण्यापेक्षा मुंगीसारखे राहून साखरेची गोडी चाखण्यात अधिक आनंद मानला. याचाच अर्थ ईश्वराचे सान्निध्य त्यांनी मानले. ईश्वराच्या सहवासात धन्यता मानली. हे तत्त्वज्ञान सामान्यजनांच्या चटकन गळी उतरणारे असल्याने गोविंद प्रभू, चक्रधरांच्या लीळा त्यांना स्वीकारार्ह झाल्या. महानुभाव पंथात लीळा चरित्र, गोविंद प्रभू चरित्र, स्मृतीस्थळ, स्थानपोथी, चक्रपाणी चरित्र आणि सती ग्रंथ महत्वाचे मानले जातात. त्यात लीळा चरित्र हे चक्रधर स्वामींच्या लीळांचे एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध अशा तीन भागात वर्णन करणारे असल्याने सर्वात प्रमाण ग्रंथ म्हणून त्याला मान्यता आहे. १२ व्या शतकात चातुर्वणाला विरोध करून प्रत्यक्ष आचरणात या पंथाने एकात्मता आणली. जातिभेदाला मूठमाती दिली. लीळा चरित्रात प्रत्यक्ष अशा कितीतरी लीळा आहेत की त्यात स्वतः स्वामी चक्रधरांनी जातीभेद कृतीने दूर सारले. अंत्यजाच्या मुलाला देवाचे तीर्थ दिले. सर्वांना मंदिर प्रवेश खुला केला.

दंडवत प्रणाम

प्रणाम आणि दंडवताला या पंथात विशेष स्थान आहे. परस्परभेटीत याचा आजही प्रत्यय येतो. देवतांचा गजबजाट यांनी कमी केला. केवळ नवसाला पावणाऱ्या म्हणून त्या चिरकाल सुख देणाऱ्या ठरत नाहीत हे समाजाला पटवण्याचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच चक्रधरांनी मराठी भाषेचाच पुरस्कार केला. त्यांचे सूत्रच होते, ‘येणे माझे म्हातारिया नागवतील तुमचा अस्मात कस्ताम मी नेणे गा!’ मज श्री चक्रधरे निरूपली मऱ्हाठी तियाची पुसा ! संस्कृत भाषा विद्वान पंडितांसाठी योग्य पण सर्वसामान्यांना आकलनास कठीण म्हणून सर्व व्यवहार मराठीतच आणि निवृत्तीपर ग्रंथ रचना करा असा त्यांचा संदेश होता. संत एकनाथांनीही अस्पृश्यांच्या घरी भोजन घेतले. गाढवाला गंगाजल पाजले. वाळवंटातील तळपत्या उन्हातील अंत्यजाच्या मुलाला कडेवर उचलून घेतले. त्याचप्रमाणे स्वामी चक्रधरांनी स्पृश्यास्पृश न मानता सर्व समाजाला एकात्मतेचे भान दिले. मराठी भाषेची अस्मिता वाढवली.

महानुभावांची पवित्र स्थाने

डोंबेग्राम, सिन्नर, पांचाळेश्वर, बीड, जालना, माहूर, रिद्धीपूर जाळीचा, देव, बेलापूर, पैठण, फलटण, खानदेश, वऱ्हाड ही महानुभावांची पवित्र स्थाने आहेत. द्वैती भक्तीचा महिमा वाढवण्याबरोबरच महानुभावियांचे सामाजिक योगदान हे आपल्याला कदापीही विसरता येणार नाही. मात्र हळुवारपणे लोकांच्या वळणात सुधारणा न पेलवणाऱ्या एकदम करायला घेतल्यामुळे जनरुची संवाद साधला गेला नाही. म्हणून या अवैदिक पंथाला आज शास्त्री पंडितांपेक्षा अडाणी, अती ग्रामीण भागात विशेष स्थान राहिले आहे. मूर्तीपूजेला या पंथाने स्थान दिले नाही. सर्वज्ञ चक्रधर हेच महानुभाव पंथाचे प्रवर्तक होते. त्यांचे गुरु होते चतुर्थ परमेश्वरावतार मानले जाणारे श्री गोविंदप्रभू. या गुरुशिष्यांनी पुरोगामी विचारसरणी अंगिकारली होती. ब्रम्हचर्य, अनासक्त वृत्ती, सर्वाभूमी समत्व, क्षमाशीलता, औदार्य आणि परोपकार अशा अनेक सद्गुणांचा वास त्यांच्या ठायी होता. या आत्मीयतेमुळे ते समाजाचे मायबाप वाटत असत. सुमारे ८०० वर्षांपूर्वी जातिभेदाच्या भिंती तोडल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कर्मयोगी आणि आद्य समाजसुधारक मानले जाते.

कर्मभूमी – महाराष्ट्र, धर्मभाषा – मराठी  

त्यांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आणि मराठीला आपली धर्मभाषा. महाराष्ट्राची आणि मराठीची अस्मिता जोपासली. इहवादी आणि मानवतावादी अशी या पंथाची विचारसरणी आहे.

‘कर्मचांडाळपसी, जातीचांडाळू तो चांग’ असे त्यांच्या सुत्रपाठ (आचार्य मालिका ९१) ग्रंथात नमूद केले आहे आणि महानुभावियांनी ते कृतीतही आणले आहे. माणसाचे आयुष्य एका ठराविक चौकटीत बांधून ठेवणारे कुळधर्म, जातिधर्म, ग्रामधर्म त्यांनी ताज्य मानले. समाजाला एकजिनसी रूप देण्याचा, समरसतेचा, संघटकांचा समाजात बंधुभाव निर्मितीचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. त्यांनी त्यातूनच ऐक्यभाव जागवला.