सूर्यनमस्कार – सर्वांगसुंदर योगाभ्यास

……………………………………………………………………………………………………………

सूर्यनमस्कार – सर्वांगसुंदर योगाभ्यास

विचाराला आचाराची जोड दिल्यास कुटुंब सुसंस्कारित होते व नव्या राष्ट्र्निर्मितीला चालना मिळते. योग हा शारीरिक संघटनांबरोबर एकमेकांची मने जोडतो. अलीकडे किशोर आणि युवा संस्कृती एकत्रित कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे, समूहाकडून व्यक्तीकडे आणि त्यानंतर एकाकीपणाकडे धाव घेत आहे. अशा परिस्थितीत चित्तवृतींचा विरोध करण्यासाठी योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही असे वाटते.

……………………………………………………………………………………………………………

शालेय अभ्यासक्रमात योग-आयुर्वेदाचा समावेश करणे अलीकडे गरजेचे झाले आहे. तसे केल्यास संस्कृतीचे संवर्धन होईल व युवा मने निकोप होतील. पर्यायाने राष्ट्रविकास होईल. रोग होऊन त्याचे निराकरण करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे.

सूर्यनमस्कार हा धर्म व जाती पलीकडचा विचार आहे. सूर्य सगळ्यांनाच समान प्रकाश देतो. ज्याप्रमाणे वृक्ष जलसिंचन करणाऱ्यास व तोडणाऱ्यास समान सवलती देतो, त्याप्रमाणे सूर्यनमस्काराचे फायदे दोघांनाही आहेत.

सूर्यनमस्काराच्या विविध अवस्थांमध्ये शरीराच्या प्रत्येक भागाचा सूक्ष्म व्यायाम होऊन देहाग्नी प्रगट होतो व अवयवामध्ये चंचलता प्राप्त होते. त्यामुळे पुढे आपण सूर्यनमस्कारासंदर्भात संक्षिप्त माहिती पाहणार आहोत.

सूर्यनमस्कार हा सर्व व्यायाम प्रकारात श्रेष्ठ व्यायाम प्रकार आहे. या व्यायाम प्रकाराला धार्मिक अधिष्ठान आहे. प्रातःकाळी पूर्व दिशेकडे तोंड करून अत्यंत शांत चित्ताने भगवान सूर्यनारायणाची पूजा, स्तुती करत सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.

सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करताना म्हंटले आहे की,

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने I

जन्मांतरसहस्रेषु दारिद्र्य नोपजायते II

जे दररोज सकाळी सूर्यनमस्काराचा व्यायाम करतात, त्यांना या जन्मीच नव्हे तर पुढे अनेक जन्मापर्यंत दारिद्र्य शिवत नाही.

सूर्यनमस्कारापासून आरोग्याची, अग्नीपासून संपत्तीची, शंकरापासून ज्ञानाची इ विष्णूपासून मोक्षप्राप्तीची इच्छा धरावी असे मत्स्यपुराणात म्हंटले आहे. सूर्यनमस्कार म्हणजे भगवान सूर्यनारायणाला अष्टांगानी केलेला नमस्कार होय.

सूर्यनमस्कारात एकूण १२ अवस्था असून त्या प्रत्येक अवस्थेतून शरीराच्या प्रत्येक अवयवाला चांगला व्यायाम मिळतो. १२ अवस्थांचा एक सूर्यनमस्कार होतो व २५ नमस्कारांचे एक आवर्तन होते. सूर्यनमस्कार व योगासने यांचा अतिशय जवळचा संबध असून सूर्यनमस्कारात सुरुवातीला व शेवटी फक्त नमस्कार असून बाकीच्या दहा अवस्था म्हणजे १० आसनेच आहेत.

12-Sun-Salutations

प्रत्येक सूर्यनमस्कार घालताना पुढे जी सूर्याची बारा नावे दिली आहेत त्यापैकी नमस्काराच्या वेळी एक घ्यावे.

 • ओम मित्राय नमः

 • ओम रवये नमः

 • ओम सूर्याय नमः

 • ओम भानवे नमः

 • ओम खगाय नमः

 • ओम पुष्णे नमः

 • ओम हिरण्यगर्भाय नमः

 • ओम मरीचये नमः

 • ओम आदित्याय नमः

 • ओम सवित्रे नमः

 • ओम अर्काय नमः

 • ओम भास्कराय नमः


सूर्यनमस्काराची पहिली अवस्था

Sun-Salutations_01सरळ, ताठ उभे राहा. शरीर सरळ एका रेषेत ठेवा. नजर नाकाच्या टोकावर स्थिर करा. या अवस्थेस दक्षासन असे म्हणतात.

फायदे –

 • मन स्थिर होते.

 • पायांना व कमरेला शक्ती मिळते.


सूर्यनमस्काराची दुसरी अवस्था –

Sun-Salutations_02दोन्ही हात अशाप्रकारे जोडा की, हाताचे अंगठे छातीला स्पर्श करतील. श्वास घ्या. सरळ, ताठ उभे राहा. यात नमस्कारास सिद्ध होत असल्याने यास नमस्कारासन असे म्हणतात.

फायदे –

 • शरीर व मन सुदृढ बनते.


सूर्यनमस्काराची तिसरी अवस्था –

Sun-Salutations_03यात हात उंच करा व मागे न्या. मान मागे घेऊन नजर वर आकाशाकडे लावा. शरीर जितके मागे वाकवता येईल तितके वाकवा. श्वास घ्या. छाती फुगवा. या अवस्थेस पर्वतासन असे म्हणतात.

फायदे –

 • खांदे, छाती मजबूत होते.

 • भूक लागते.

 • श्वसनाचे विकार दूर होतात.


सूर्यनमस्काराची चौथी अवस्था –  

Sun-Salutations_06या अवस्थेत पुढे झुकून गुडघ्यात पाय ण वाकवता श्वास रोखून धरून दोन्ही हात पायाजवळ व कपाळ गुडघ्याजवळ टेकवा. सुरुवातीला हे कठीण वाटेल, परंतु नंतर सरावाने त्यात सहजता येईल. या अवस्थेस हस्तपादासन असे म्हणतात.

फायदे –

 • हस्तपादासनातील सर्व फायदे होतात.

 • शरीर सुंदर, सुडौल बनून चेहऱ्यावर तेज येते.


सूर्यनमस्काराची पाचवी अवस्था –

Sun-Salutations_05या अवस्थेत श्वास घ्या व उजवा पाय अशा रीतीने मागे न्या की गुडघा व बोटे जमिनीला लागतील. डाव्या पायाचा गुडघा डाव्या हाताच्या बगलेत घेऊन डोके वर करून जितके मागे घेता येईल तितके न्या. श्वास रोखून धरा. सूर्यनमस्काराच्या या अवस्थेस एकपाद प्रसरणासन असे म्हणतात.

फायदे –

 • घसा, मान, छाती या अवयवांवर ताण पडत असल्यामुळे या अवयवांचे कार्य सुधारते. घशातील थायरॉइड ग्रंथींचे कार्य नियमित होऊन त्यातून योग्य प्रमाणात स्राव पाझरतात.

 • जठराग्नी प्रदीप्त होत असल्याने भूक चांगली लागते.

 • शौचास साफ होते. पोटाचे आजार बरे होतात.

 • कंबर, पाय, जननेंद्रीय यांचे कार्य चांगले होते.


सूर्यनमस्काराची सहावी अवस्था –     

Sun-Salutations_06या अवस्थेत डावा पाय उजव्या पायाप्रमाणे वा उजव्या पायाच्या बरोबर मागे न्या. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना चिकटू द्या. डोके, कंबर व शरीराचा मागचा भाग ताठ व सरळ रेषेत येतील याची काळजी घ्या. दोन्ही हाताचे पंजे व दोन्ही पायाची बोटे यावर संपूर्ण शरीराचा भार येईल याची काळजी घ्या. या अवस्थत भूधारासन होते.

फायदे –

 • हात, पाय मजबूत होतात. गुडघ्याची क्रिया चांगली होते.

 • कंबरेचे रोग होत नाहीत व झाले असल्यास बरे होतात.


सूर्यनमस्काराची सातवी अवस्था –

Sun-Salutations_07या अवस्थेत श्वास रोखून धरून गुडघे, छाती व कपाळाचा वरचा भाग जमिनीला टेकवा. पोट व नाक जमिनीला न टेकवता ते जमिनीच्या वर ठेवा. संपूर्ण श्वास सोडून देऊन दोन्ही हात कोपरात वाकवून छातीजवळ ठेवा.

या अवस्थेत शरीराची आठही अंगे – साष्टांग  जमिनीला टेकत असल्यामुळे सूर्यनमस्कारात ही सर्वोत्तम व महत्वपूर्ण स्थिती असल्यामुळे याला अष्टांग प्रणिपातासन असे म्हणतात.


सूर्यनमस्काराची आठवी अवस्था –

Sun-Salutations_08सातव्या अवस्थेप्रमाणे शरीराची स्थिती ठेवा. फक्त हात सरळ ताठ ठेवून श्वास आत घेत डोके, छाती वर करून जितके मागे पाहता येईल तेवढे पहा. थोडक्यात कंबरेचा वरचा भाग वर उचला. श्वास रोखून धरा. ही अवस्था भूजंगासनासारखी असते.

फायदे –

 • भूजंगासनाचे सर्व फायदे होतात.

 • चेहरा तेजस्वी बनतो.


सूर्यनमस्काराची नववी अवस्था –

Sun-Salutations_09श्वास रोखून धरून या अवस्थेत हात व पाय जागेवरून न हलवता फक्त कंबरेचा भाग वर उचलून डोके खाली करून ते छातीला चिकटवा. पोट आत खेचा. या अवस्थेत भूधरासन होते.

फायदे –

 • हातापायांवर ताण पडतो. परिणामी हातापायात ताकद येते.

 • पोटाच्या तक्रारी दूर होतात.

 • मानेचे विकार होत नाहीत.


सूर्यनमस्काराची दहावी अवस्था –

Sun-Salutations_10या अवस्थेत नवव्या अवस्थेप्रमाणे हात तसेच ठेवून डावा पाय डाव्या बगलेत ठेवा. (पाचवी अवस्था) डोके व मान मागे न्या व जितके मागे बघता येईल तितके पहा. या अवस्थेत पोटावर दाब आला पाहिजे. सूर्यनमस्काराच्या या अवस्थेत एकपाद प्रसरणासन होते.

फायदे –

 • भूक चांगली लागते. पोटाच्या क्रिया व्यवस्थित होतात. पोटाचे विविध आजार बरे होतात.

 • पाठीचा कणा लवचिक होतो. हात- पाय कार्यक्षम होतात. त्यांचे आजार असल्यास ते बरे होतात.


सूर्यनमस्काराची अकरावी अवस्था –

Sun-Salutations_11ही अवस्था सूर्यनमस्काराच्या चौथ्या अवस्थेप्रमाणे आहे. श्वास सोडून कपाळ गुडघ्याला टेकवा.

फायदे – चौथ्या अवस्थेप्रमाणे


सूर्यनमस्काराची बारावी अवस्था –

Sun-Salutations_12ही अवस्था सूर्यनमस्काराच्या दुसऱ्या अवस्थेप्रमाणे आहे.

फायदे – दुसऱ्या अवस्थेप्रमाणे

सूर्यनमस्कार अत्यंत उपयोगी व महत्वपूर्ण व्यायाम आहे. सूर्यनमस्कार शरीराच्या संपूर्ण तांत्रिक मांसपेशीय तंत्रास उर्जावान बनवतो. याचा नियमित अभ्यास पूर्ण शरीरातील शुद्ध रक्ताचे संतुलित संचार तसेच सर्व प्रणालीत पूर्ण समन्वय प्रदान करतो. अशाप्रकारे हा व्यायाम साधकास संपूर्ण मानसिक आणि शारीरिक पुष्टता प्रदान करतो. शरीरास कोणतेही आजार होत नाहीत. स्वास्थ्य कायम राहते. व्यक्ती सतत कार्यशील राहते.