कथा आयुर्वेदाची

………………………………………………………………………………………………….

कथा आयुर्वेदाची

आयुर्वेद म्हंटले की, सर्वाना आजीबाईचा बटवा आठवतो. पण आयुर्वेदाची ओळख तेवढ्यापुरती मर्यादित नाही. आयुर्वेद हे आयुष्याचे शास्त्र आहे. शिवाय ते आयुष्याचे विज्ञान आहे. अनादी, अनंत आणि शाश्वत अशा आयुर्वेदाची जी जन्मकहाणी…

………………………………………………………………………………………………….

                  आटपाट नगर होते हिमालयाच्या पायथ्याशी,
                   त्याठिकाणी जमले होते सर्व विद्वान महर्षि,
                   चर्चा होती कसा करावा रोगांशी सामना,
                   तेव्हा तेथ अवतरले स्वयं ब्रह्मा,
                   ब्रह्माने दिले जगाला वरदान,
                   तोच पुढे झाले आयुर्वेद महान!!

अशी आयुर्वेदाची भूलोकावर अवतरण्याची कथा आहे. ब्रह्माने आपले आयुर्वेदाचे ज्ञान या ऋषिगणांना दिले, त्यांनी मग या शास्त्राचे सखोल चिंतन करुन, परीक्षण करुन, निरीक्षणे मांडून वेगवेगळे ग्रंथ समुदाय तयार केले. त्यातील काही मुख्य ग्रंथसंपदा म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांगहृदय इत्यादी. यालाच आज आपण आयुर्वेद म्हणून ओळखतो. साक्षात् ब्रह्मापासून अवतरल्यामुळे हे ज्ञान अनादि अनन्त आणि शाश्‍वत असे मानले जाते.

खरंतर आयुर्वेद आज आपल्या घराघरात पोहोचला आहे. आपल्या आजी-पणजीपासून काही ना काही औषधांचे ज्ञान आपल्याला असते. परंपराच आहे म्हणा! उदाहरणच द्यायचे झाले तर तुळस किंवा अडुळसा खोकला झाला की या औषधींचा रस मधातून दिल्याने गुण येतो. हे प्रत्येक आईला माहित असते. लघवीच्या तक्रारींवर धणे-खडीसारखेचे पाणी सर्रासपणे घेतात. इतकेच काय तर लग्नाच्या आधी हळद लावण्याची प्रथा आहे. ती कशासाठी हो? तर नववधूची कांती सतेज, प्रसन्न दिसावी म्हणून. हे एकप्रकारे सौंदर्यशास्त्र झाले ना! त्याचप्रमाणे दुष्टशक्ति-दुष्टविचारांपासून तिचे रक्षण व्हावे म्हणून. इतका आयुर्वेद आपल्या रक्तात भिनला आहे. मात्र आता तर काही जण थेट असा सवाल करतात – आयुर्वेद हे खरंच विज्ञान आहे का? कि केवळ एक प्रथा-परंपरा आहे? त्यामध्ये खरंच शास्त्र आहे का?

उत्तर आहे – हो! आयुर्वेद हे एक विज्ञान आहे, महान शास्त्र आहे, आपल्या घराघरात जे परंपरा म्हणून ज्ञान दिसते तो तर या महान सागरातील एक लहानसा थेंब आहे.

आयुर्वेदातील जे ग्रंथ आहेत ते कोण्या एका व्यक्तीने आपल्या मनाला वाटेल तसे लिहिले नाहीत. तर या तत्त्वांचे, आजारांचे, औषधांचे, त्यांच्या शरीरावर होणार्‍या परिणामांचे सखोल निरिक्षण विविध ऋषींनी केले. अनेक रुग्णांवर हे प्रयोग केले गेले. त्यानंतर एकत्र येऊन त्यावर चर्चा होऊ लागली. वेगवेगळी मते-मतांतरे, वेगवेगळे विचार एकत्र करुन ते ग्रंथस्वरुपात लिहिले गेले. त्यामुळे एकाच घटकाचे विविध पैलु समोर आले. ही एक प्रकारे Clinical research, Data presentation आणि Scientific conference नाही का? चरक संहितेत तर हा वाद किंवा चर्चा कशी असावी यासंबंधीचे नियम देखील आहेत. याला ‘तद्विद्यसंभाषा’ असे नाव आहे. वैद्याने कधीही एकांतिक विचार करु नये. एखाद्या विषयासंबंधी अनेक विद्वानांशी, गुरुजनांशी चर्चा करावी आणि आपले ज्ञान वाढवावे. यालाच आपण Knowledge update असे म्हणतो. बरं हे ग्रंथ लिहून इथेच संपले नाहीत. तर त्यानंतर इतर काही विद्वानांनी त्यामध्ये आपल्या ज्ञानाची भर टाकली- अर्थात प्रतिसंस्करण केले म्हणजेच त्याची सुधारित आवृत्ती नाही का? टिकाकारांनी पुन्हा त्यातील प्रत्येक विषयावर आपले मते मांडून, कठिण विषय समजण्यास सोपे केले. इतक्या विद्वानांच्या हाताखालून गेलेले शास्त्र खरेच पोकळ असेल का हो? विचारा आपल्या मनाला!

आधुनिक विज्ञानाच्या जशा वेगवेगळ्या शाख आहेत तशाच आयुर्वेदाच्या आठ शाखा आहेत. त्यांना आपण ‘अंग’ म्हणतो. जसे की, – कायाचिकित्सा, कौमारभृत्य, ग्रहचिकित्सा, शालाक्य तंत्र, शल्यतंत्र, विषचिकित्सा, रसायन व वाजीकरण. आज आयुर्वेद महाविद्यालयांमध्येदेखील कायाचिकित्सा (Medicine), बालरोग (Pediatric), स्त्रीरोग (Gynecology), शालाक्य (E.N.T.), शल्य (Surgery), अंगदतंत्र (Toxicology), द्रव्यगुणशास्त्र (Pharmacology)अशा अनेक विषयांमध्ये आयुर्वेद वाचस्पतीचा (M.D.) अभ्यास विद्यार्थी करतात. कारण या विषयासंबंधी विशेष ज्ञान आयुर्वेदात उपलब्ध आहे. आयुर्वेदात ‘सर्जरी’ आहे का? 100% आहे. आयुर्वेदातील धन्वंतरी संप्रदाय हा शस्त्रकर्म विशेषज्ञ आणि सुश्रुत संहिता हा या विषयातील श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. शस्त्रकर्मासाठी जी वेगवेगळी उपकरणे आज वापरतात त्यांचे वर्णन या ग्रंथात आधीच आलेले आहे. तसेच शस्त्रकर्मासाठी वैद्य तयार होण्याआधी त्याला कमळाचे देठ, काकडी, प्राण्यांचे मूत्राशय यांच्यावर शस्त्र कसे वापरावे याचे प्रशिक्षण दिले जायचे. याला योग्या विधी (Pratical Training) असे म्हणतात. यामुळे प्रत्यक्ष मनुष्यशरीरावर शस्त्रक्रिया करताना त्यांचा आत्मविश्‍वास कुठेही कमी पडत नाही. तसेच शरीराची- त्याच्या रचनेची पूर्ण ओळख होण्यासाठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात शवविच्छेदन (Dissection) करावे लागते. प्राचीन महर्षिंना मृतदेह टिकविणे, त्यांचे व्यवस्थित विच्छेदन करणे, अस्थि, शिरा, मांसपेशी यांच्या रचनेचे ज्ञान होते. बालरोगामध्ये मातेच्या उदरात बीज रोवल्यापासून त्याचा जन्म होईपर्यंत व जन्मानंतरची प्रगती कशी असावी याबद्दल वर्णन आले आहे. यालाच आपण Growth milestone असे म्हणतो. तसेच आईच्या आहार-विहारामुळे गर्भस्थ शिशुवर होणार्‍या संस्काराबद्दल देखील माहिती ग्रंथात आहे. आजच्या काळात हृदयविकारांसाठी वापरण्यात येणारे Digitalis म्हणजे ‘हृत्पत्री’चा द्रव्यगुण शास्त्रात ‘हृद्य’ म्हणून उल्लेख आहे. सर्पगंधा हे उत्तम शामक व निद्रानाशातील औषध! त्याचाच वापर आज ‘Reserpine’ म्हणून उच्चरक्तदाबामध्ये करतात.

आयुर्वेद म्हणजे काय? याचे उत्तर केवळ वैद्यकशास्त्र इथपर्यंत मर्यादित रहात नाही. तर वैद्यकाबरोबरच ते औषधनिर्माणशास्त्र, आहारशास्त्र, पाकशास्त्र तसेच संपूर्ण जीवनाचे शास्त्र आहे. आपली जीवनशैली कशी असावी हे शिकवते आयुर्वेद आणि हे नियम न पाळल्यानेच हल्ली मधुमेह, स्थुलता, मानसिक विकार यासारख्या जीवनशैलीशी निगडीत आजारांनी आपले साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली आहे. ‘ब्राम्हे मुहूर्ते उत्तिष्ठेत्’ हा दिनचर्येचा पहिला नियम. आपला ब्रह्म मुहूर्त होतो 10 वाजता. पण तोपर्यंत सृष्टीचे घड्याळ पुढे गेलेले असते. वाताचा काळ संपलेला असतो. त्यामुळे मलविसर्जनाची क्रिया व्यवस्थित होत नाही. परिणामी मलबद्धता, अपचन, पोटात वायु धरणे इत्यादी तक्रारी डोके वर काढतात. यावर रेचक, पाचक ही औषधे आहेत. पण मूळाकडेच आजार असेल तर झाडाला वरुन खतपाणी देऊन काय उपयोग? म्हणजेच काय, आपल्या सवयींना योग्य वळण द्या आणि मिळवा निरोगी आरोग्य अगदी मोफत!

प्रत्येक शास्त्राचे काही उद्देश असतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदाचे देखील दोन उद्देश आहेत. पहिले स्वस्थस्य स्वास्थरक्षणम्। आणि दुसरे आतुरस्य विकारप्रशमनम्। म्हणजे याठिकाणी प्रथम स्थान दिले आहे, ‘स्वस्थ्य रक्षणाला’ आणि त्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, आहाराचे नियम यांचे वर्णन केले आहे. त्याही पुढे जाऊन सामाजिक आरोग्याचा विचार देखील झाला आहे. ‘जनपदोपध्वंस’. जनपद म्हणजे समाज. समाजामध्ये जलद गतीने जल, वायु, काळ (ऋतु), देश यातील बदलांमुळे पसरणारे आजार म्हणजे ‘जनपदोपध्वंस व्याधी’. अर्थात epidemic. हल्ली दहशत पसरविणारे स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, मलेरिया, कॉलरा हे सगळे याच प्रकारातील आजार. यावर प्रतिबंध जल, वायु, शुद्धिकरण, धूपन इत्यादी तसेच व्याधी उत्पन्न झाल्यानंतरचे उपाय यांचा विचार त्याकाळी सुद्धा केलेला होता. संसर्गजन्य व्याधींबद्दल वर्णन सुद्धा केलेले आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक स्वास्थ्य दोन्ही जपणार्‍या आचार रसायनाचे वर्णन चरक संहितेत आले आहे. रसायन म्हणजे दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवणारा आहार-विहार औषध यामधील एक घटक. आचार म्हणजे आपली वागणुक. स्वत:च्या स्वास्थ्यासाठी तसेच समाजाचे स्वास्थ्य राखण्यासाठी कसे वागावे, काय करावे, काय करु नये याची सखोल चर्चा आहे.

बरं इतके सगळे करुन देखील आजार झालाच तर वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा आहेतच- पंचकर्म, शमनौषधी, अग्निकर्म इत्यादि. आजकाल पंचकर्म म्हणजे केवळ स्नेहन (massage), स्वेदन (steam) इतकाच प्रचार झाला आहे. पण पंचकर्म म्हणजे शरीराचे शोधन. जसे स्नानाने शरीराची बाह्य शुद्धि होते. तशी ही आंतरिक शुद्धी. पण ही कुणावरही आणि केव्हाही करता येते का? तर नाही, पंचकर्मसाठी योग्य-अयोग्य रुग्णांचे व आजारांचे परीक्षण करुन त्यानंतरच या रुग्णांसाठी कोणते कर्म हितकर आहे हे ठरविले जाते. हे परीक्षण करण्यासाठीसुद्धा शास्त्रकार काही नियम सांगतात. दर्शन, स्पर्शन, प्रश्‍न या परीक्षा वैद्याने रुग्णावर कराव्यात. त्याचप्रमाणे वय, प्रकृति, मानसिक स्थिती, बल, देश (स्थान) या सर्व गोष्टींचा देखील विचार झाला पाहिजे. नाडी, मल, मूत्र, जिव्हा इत्यादी परीक्षांचे सविस्तर वर्णन उपलब्ध आहे. आधुनिक वैद्यकाच्या ‘Hutchison’s clinical methods’ या  उत्कृष्ट पुस्तकात जे वर्णन केले आहे ते हजारो वर्षांपूर्वीच महर्षिंनी ग्रंथात मांडलेले आहे. मन आणि शरीर या दोन गोष्टी स्वतंत्र असल्या तरीही एकमेकांवर त्यांचा परिणाम होत असतो, हा सिद्धांत (तत्त्व) चरकार्यांचा, आज आधुनिक वैद्यकाने Holistic approach प्रचार केल्यावर आपल्याला त्याचे महत्त्व कळते.

आयुर्वेदाच्या पदार्थविज्ञानात ‘प्रमाण’ हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. ज्याद्वारे आपल्याला ज्ञान होते ते प्रमाण, आप्तोपदेश म्हणजे आपले गुरुजन, वडिलधारी व्यक्ती यांनी दिलेले ज्ञान. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे डोळ्यांसमोर आहे, त्याचे त्याच स्वरुपातील ज्ञान. अनुमान हे तिसरे प्रमाण. वायु आपल्याला दिसतो का? मग आपल्याला त्याचे ज्ञान कसे होते? झाडाच्या पानांची हालचाल बघून त्या ठिकाणी वायु असल्याचे समजते. म्हणजेच तेथे वायुच्या अस्तित्त्वाचे आपण अनुमान काढतो.

आजकाल आधुनिक वैद्यक सांगते कानात तेल घालू नका. अंगाला तेल लावू नका. इन्फेक्शन होते वगैरे. पण आयुर्वेदाने तर कर्णपूरण, अभ्यंग हे दिनचर्येतील नित्य उपक्रम मानले आहेत. तेल हे वातविकारामध्ये उत्कृष्ट औषध आहे. मारुतीला प्रसन्न करण्यासाठी आपण त्याला तेल चढवितो. मारुती हे वायुचे दैवत आहे. म्हणून वायुला प्रसन्न करण्यासाठी, अर्थात त्याची शरीरातील कर्म व्यवस्थित होण्यासाठी तेल हे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल यात विज्ञान कुठे आहे? तर वायु हा चचंल, रुक्ष, लघु अशा गुणांचा आहे. तेल गुरु, स्निग्ध या स्वरुपाचे. त्यामुळे वाढलेला वायु तेलामुळे नियंत्रणात राहतो. कानामध्ये वायु वाढला तर तो कानातील मळाला सुकवितो. रुक्ष करतो. त्याला खडा करतो. परिणामी हा मळ बाहेर काढण्यास कठिण होतो. कान दुखतो. तेलामुळे हा मळ मऊ होतो व त्याला कानाबाहेर काढण्यास सोपे होते. आपल्या शरीरातील सर्व हालचाली वायुमुळे होतात. सांध्यांना जर नित्य तेलाने मालीश (स्नेहन) केले, तर त्यातून कट्कट आवाज येत नाही, हाडांची झीज थांबविता येते. अर्थात् सांधे बळकट राहतात.

आयुर्वेदाच्या आहारशास्त्रात सांगितले आहे – उष्णं अश्‍नीयात्। जेवण गरम व ताजे घ्या. मन लावून जेवा. पण आपण हल्ली काय करतो? टी.व्ही. बघत जेवतो. यामुळे लक्ष जेवणाकडे पूर्णपणे रहात नाही. तसेच टी.व्ही.वरील घटनांमुळे आपल्या मनात कळत-नकळत परिणाम होत असतात. या गोंधळलेल्या स्थितीमुळे मनाकडून (मेंदूकडून) पोटातील पाचक स्रावी ग्रंथिंना चुकीचे संदेश पाठविले जातात. पाचक रस योग्य प्रमाणात स्रवत नाही. परिणामी आहाराचे पचन योग्य होत नाही आणि हे अपचन पुढील व्याधींना आमंत्रण देते.

आयुर्वेदात संशोधन नाही हा आणखी एक अपप्रार. जे प्राचीन ग्रंथात आहे, ते सखोल संशोधनाच्या अंती सिद्ध झालेले आहे. जे औषधी गुणधर्म, तत्त्व औषध तयार करण्याची पद्धत, औषधांचे शरीरातील कार्यकारी क्षेत्र या सगळ्याचा पाया इतका भक्कम होता, की आज देखील ती तत्त्व शाश्‍वत आहेत. औषधांच्या गुणधर्मात बदल झालेला नाही. भस्म तयार करण्याची पद्धत अगदी चोख हेाती. ज्या पद्धतीने जर भस्म तयार केले, तर ते सेवन केल्यानंतर किडनी किंवा इतर कुठल्याही अवयवात साठण्याची शक्यताच नाही. अशा भस्मामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. आधुनिक वैद्यक संशोधनात निरनिराळ्या जंतुंना मारण्यासाठी प्रतिजैविके (antibiotics) तयार केली जातात. बर्‍याच वेळा दीर्घकाळ वापराने जंतुंना ती सवयीची होतात व जंतु त्यांना प्रतिसाद देत नाही. मग संशोधन सुरु होते. त्याहून अधिक वीर्यवान प्रतिजैविके तयार करण्यासाठी. मग ही साखळी संपणार कुठे? तसेच या प्रतिजैविकांमुळे उपयोगी असणारे काही जंतु (bacteria)देखील मारले जातात. आयुर्वेदीय औषध या जंतुंची पोषक अशा परिस्थितीलाच प्रतिबंध करतात. त्यामुळे जंतुंची वाढ होत नाही. तसेच शरीरावर कोणतेही दुष्परिणाम (Side effects) होत नाहीत.

वास्तविक आपल्या शालेय शिक्षणात आपण ‘अ‍ॅटमस्, मॉलिक्युल्स्, सेल’ या संदर्भात शास्त्र शिकलो. त्यामुळे शास्त्राकडे आपण त्याच दृष्टीकोनातून बघतो. आयुर्वेदाच्या कोणत्याही परिभाषांची ओळख आपल्याला नसते. वात, पित्त, कफ ही काय भानगड आहे कळत नाही. परिणाम झाड-पाल्याची कडू औषधे, आजीबाईचा बटवा इतकीच आयुर्वेदाची ओळख मर्यादित रहाते. पण या हिर्‍याला इतके विविध पैलु आहेत की बघणार्‍याचे डोळे दिपून जातील. खरोखरच हे आयुष्याचे शास्त्र आहे. आयुष्याचे विज्ञान आहे, म्हणूनच –

              हिताहितं सुखं दु:खमायुतस्य हिताहितम्।

              मानं च तच्च यत्रोक्तं आयुर्वेद: स उच्यते॥

  • चरक संहिता