डॉ. सुभाष मार्लेवार यांच्याविषयी…

dr_subhash_marlewar_photoडॉ. सुभाष गणपतराव मार्लेवार हे रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, वरळी, मुंबई येथे स्त्रीरोग-प्रसुती तंत्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.एम.एस. (१९८४) आणि एम.डी. (स्त्रीरोग आणि प्रसूती तंत्र -१९९४) ची पदवी संपादन केली. स्त्रीरोग विशेषज्ञ म्हणून त्यांनी आतापर्यंत हजारो महिलांचे यशस्वी उपचार केले आहेत.
‘आयुर्वेद’ ही संकल्पना जनमानसात रुजावी, प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत आयुर्वेद, योग, अध्यात्म याला स्थान द्यावे या उद्देशाने डॉ. मार्लेवार यांनी ‘मनोवांच्छित संतती व आयुर्वेद’, ‘सुरक्षित मातृत्व’, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘मला आई व्हायचंय’, ‘मला बाबा व्हायचंय’, ‘ज्येष्ठत्वाच्या वाटेवर’ अशा पुस्तकांचे लेखन तसेच सुखाचा शोध – भाग १ व २ (लेखक वैद्य विजय पोतदार), जेष्ठत्वाचा कानमंत्र (लेखक वैद्य सु. रा. साले, जनी मनी आयुर्वेद (लेखक वैद्य नंदकुमार मुळ्ये), आयुर्वेद प्रथमोपचार (लेखक वैद्य नंदकुमार मुळ्ये) या पुस्तकांचे संपादन केले आहे. विविध मासिक-नियतकालिकांमधून ते नियमित आरोग्यविषयक लेखन करतात. इतकेच नव्हे तर आपला कामाचा व्याप सांभाळत महाराष्ट्राच्या अनेक गावांत त्यांनी ११०० हून अधिक आरोग्य शिबिरे भरवली आहेत. महिला, मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यासंदर्भात मार्गदर्शनपर व्याख्यानेही दिली आहेत. याशिवाय आयुर्वेदाशी संबंधित अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते नेहमीच  सहभाग घेत असतात.
डॉ. मार्लेवार यांना आतापर्यंत वैद्य शिरोमणी पुरस्कार (अखिल भारतीय सेवा संघ- १९८९), आदर्श शिक्षक पुरस्कार (अखिल भारतीय अध्यापक महासंघ, दिल्ली), साहित्य पुरस्कार (आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई) याने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच महिला व बालकल्याण राज्यमंत्री वर्ष गायकवाड आणि आरोग्यमंत्री डॉ. दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते डॉ. मार्लेवार यांचा महिला आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी विशेष सत्कार करण्यात आला आहे. तरडगावच्या महानुभाव आश्रमचे श्री महंत राहिरकर बाबा आणि नांदेडच्या महानुभाव आश्रमचे जामोदेकर बाबा यांनी देखील डॉक्टरांच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ध्यान मंदिर या संस्थेचे ते संस्थापक आहेत. या संस्थेच्या नांदेडस्थित आरोग्यधामाच्या माध्यमातून आयुर्वेद, योग, अध्यात्म ही निरामय जीवनपद्धती लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ते विविध उपक्रम राबवत असतात. आपल्याकडे आधुनिक शास्त्राचा मोठा प्रभाव आहे. असे असताना प्राचीन आयुर्वेद शास्त्राचा वारसा जपत ‘जावू तेथे आरोग्य नेऊ’ असा डॉ. मार्लेवार यांचा नेहमीच प्रयत्न असतो.