महानुभाव पंथीय वाङ्मय

तेराव्या शतकातील दोन प्रमुख संप्रदाय म्हणून प्रामुख्याने महानुभाव व वारकरी संप्रदायाचा उल्लेख केला जातो. दोन्हीच्या उपासना पद्धती वेगवेगळ्या मात्र उपास्य दैवत एकच, श्रीकृष्ण. धर्म प्रबोधनाचे कार्य लोकवाणीतून प्रकट व्हावे यासाठी ज्ञानदेव- श्री चक्रधर स्वामींनी अविश्रांत मेहनत घेतली. तसेच खूप उपहास सुद्धा सोसला. श्री चक्रधर स्वामींनी व त्यांच्या शिष्यांनी मराठी मनाशी संवाद करण्यासाठी मऱ्हाटमोळ्या लोकभाषेचे माध्यम स्वीकारल्याने त्यांना आपली भक्ती भावना संक्रमित करता आली. तेराव्या शतकातील जनसामान्यांवर महानुभाव साहित्याचा अशाप्रकारे प्रभाव पडलेला दिसून येतो.

 

अविरत श्रद्धा आणि मराठी मन यात शतकानुशतके अखंडपणे एक जिव्हाळ्याचे नाते पाहायला मिळते. मग ही श्रद्धा कमरेवर हात ठेऊन विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठ्ठलाविषयी असू दे किंवा सांब शिवाविषयी, एकवचनी रामाविषयी वा गौतम बुद्धांविषयी, भगवान महाविरांविषयी वा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींविषयी. मराठी मानाने ही श्रद्धा मनापासून जपलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात, नगरा नगरांत संतवाणीचा व महानुभाव वाङ्मयाचा प्रवाह सतत गतिमान झाल्याचे दिसून येते.

तेराव्या शतकातील दोन प्रमुख संप्रदाय म्हणून प्रामुख्याने महानुभाव व वारकरी संप्रदायाचा उल्लेख केला जातो. एक द्वैतभक्तीतत्वाचा पुरस्कर्ता तर दुसरा अद्वैततत्वाचा. दोन्हीच्या उपासना पद्धती वेगवेगळ्या मात्र उपास्य दैवत एकच, श्रीकृष्ण. दोन्ही संप्रदायाच्या प्रवर्तकांनी तसेच प्रचारकांनी अभंगाच्या, पदांच्या, धवळ्याच्या, विराण्याच्या रूपाने हा प्रवाह गतिमान केलेला आहे. एकप्रकारे हे सर्व भक्ती साहित्यच आहे.

हे सर्व भक्तीसाहित्य ज्या ज्या माध्यमांतून अभिव्यक्त होत गेले ते महाराष्ट्राच्या लोकभाषेचे माध्यम ठरले. धर्म प्रबोधनाचे कार्य लोकवाणीतून प्रकट व्हावे यासाठी ज्ञानदेव- श्री चक्रधर स्वामींनी अविश्रांत मेहनत घेतली. तसेच खूप उपहास सुद्धा सोसला. परमार्थिक सुख हे समाजातील सर्व – तळागाळातील घटकांना लाभायला हवा हे या धर्म प्रबोधनामागील मुख्य सूत्र होते. यासाठी श्री चक्रधर स्वामी-ज्ञानदेवांनी लोकभाषेला धर्म भाषेचे स्थान दिले. मराठी मनाशी संवाद करण्यासाठी मऱ्हाटमोळ्या लोकभाषेचे माध्यम हेच प्रभावी माध्यम होते. श्री चक्रधर स्वामींनी व त्यांच्या शिष्यांनी आपल्या लेखनासाठी ही योजना आखल्याने त्यांना मराठी मनाशी जवळीक साधता आली, आपली भक्ती भावना संक्रमित करता आली. त्यांना त्यांचे उन्नयन व उद्बोधन करता आले. तेराव्या शतकातील जनसामान्यांवर महानुभाव साहित्याचा अशाप्रकारे प्रभाव पडलेला दिसून येतो.

महानुभाव साहित्याचा प्रभाव पडण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी मराठी माणसाला आपले घरदार सोडून रानावनात जाऊन बसायला सांगितले नाही. व्रत-उपासतापास करायला सांगितले नाही. तीर्थयात्रा करीत बसायला सांगितले नाही. प्रपंचाचा त्याग करायला सांगितले नाही. उलट प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय साधायला सांगितला. त्याचप्रमाणे या साहित्याने महारष्ट्रातील जनमानसाला भाबडे, अंधश्रद्ध बनवले नाही.

श्री चक्रधर स्वामींचा लौकिकाच्या कक्षा सांभळून पारलौकिकाचा वेध घेण्याची महत्वाकांक्षा विलक्षण होती. श्री चक्रधर स्वामींचा कालखंड हा महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. देवगिरीच्या यादवांची कारकीर्द त्यावेळी चालू होती. यज्ञयाग आणि असंख्य सामान्य व शुद्र देवतांची उपासना समाजात बोकाळत होती. समाजाचा बहुतांश वेळ व्रत वैकल्ये, कर्मकांड यामध्ये जात होता. चातुर्वर्ण्याची मिरासदारी समाजात वाढली होती. याचे सर्वांगीण दर्शन ‘दृष्टांत पाठ’, ‘लीळा चरित्र’ इ. ग्रंथांतून दिसून येतो.

श्री चक्रधर स्वामींनी ज्ञान व भक्तीचा समन्वय करून आपल्या द्वैती तत्वज्ञानाचा प्रसार केला. देव पूजेचा निषेध करून चातुर्वर्ण्यावर जोरदार हल्ला चढवला. महानुभाव संप्रदायात स्त्री- क्षुद्र, ब्राम्हण, क्षत्रिय अशा सर्वांनाच सन्यास घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक असल्याने या संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी लोकभाषेचा स्वीकार केला. श्री चक्रधर स्वामींनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते.

वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ हे दोन्ही आजपर्यंत धार्मिक दृष्टीने अगदी समांतर चालत आले आहेत. दोहोंचे साध्य एकच असले तरी दोहींच्या आचरणात आणि विचारात खूप अंतर असल्याने दोन्ही संप्रदाय कधीही एकत्र येऊ शकले नाहीत.  महानुभावांची एकेश्वरनिष्ठा, आचारविचारातील सुसंगती आणि भक्तीला असलेली ज्ञानची जोड ही तत्कालीन मध्यमवर्गीय समाजाच्या सहज पचनी पडणारी नव्हती. महानुभावांनी तसे हेतुपूर्वक प्रयत्नही केले नाहीत. धर्म प्रचार करणे हा त्यांचा उद्देश नव्हताच. याउलट वारकरी संप्रदायाने धर्मप्रचाराची फळी उभी केली. त्याचे कारण बहुजन समाजाला आकर्षित करणे हे होते. बहुजन समाजाला ज्ञानची फारशी गरज वाटली नाही. म्हणून त्यांच्या भावनिक चौकटीत समाजातील बहुजनवर्ग अधिक समाविष्ट होत गेला.

वारकरी पंथाच्या या भावनिक आहाराला तत्कालीन शास्त्री-पंडितांनी मात्र प्रतिसाद दिला नाही. श्रुती प्रामण्य, वेद प्रामाण्य मानणारा ब्राम्ह्णवर्ग कर्मकांडाच्या वैदिक परांपरेबाहेर पडून कर्मकांड नाकारणाऱ्या महानुभावांकडे आकर्षित झाला हे विशेष. तो वारकरी पंथाकडे आकर्षित झाला नाही. चक्रधर स्वामींच्या मागे आलेली सर्व मंडळी ही बुद्धिवादी, विद्वान व पंडितांच्या सभांमधून मान्यता पावलेली, साहित्यिक मंडळी होती. त्यामुळे त्यांनी श्री चक्रधर स्वामींना स्वीकारण्यामागे विचारांची एक बैठक होती. वैदिक धर्माचा अभ्यास करणाऱ्या या पंडितांना वेदांतातून वेगळेपण असलेल्या या संप्रदायाचा विचार पटला. त्यांना वेदांच्या मर्यादा समजल्या. ही उणीव भरून निघण्याची शक्यता त्यांना महानुभाव तत्वज्ञानात दिसली.

महानुभाव वाङ्मय हे पंथीय असून पंथ प्रवर्तकांची चरित्रे, लीळा, वचने, आख्यायिका, पंथीय तत्वज्ञान व आचारधर्म यांचे जतन करणे आहे. श्री चक्रधर स्वामी व श्री नागदेवाचार्य यांनी मराठीच ग्रंथरचना करण्याचा उपदेश दिला. सामान्यजनांचा उद्धार ही या पंथाची प्रमुख प्रेरणा असून हे ग्रंथ देवनागरी लिपीतच झाले आहेत. पुढे काही दिवसांनी हे वाङ्मय सांकेतिक लिपीत आणि कालांतराने पुन्हा देवनागरीत आले.

केसोबासांची महानुभावीय ग्रंथरचना

* सूत्रपाठ – केसोबासंच्या सूत्रपाठ या ग्रंथाची रचना इ. स. १२८० च्या सुमारास झाली. या ग्रंथात १२५५ सूत्रे असून महानुभावीय पंथाचे सर्व तत्वज्ञान त्यात समाविष्ट आहे. प्रत्येक सूत्रातील अमुल्य विचार त्यात समाविष्ट झाला आहे. या ग्रंथातील एकेक सूत्र म्हणजे एक एक प्रभावी औषधी मात्रा आहे.

* मूर्तीप्रकाश – इ.स. १२८९ साली या ग्रंथाची रचना केसोबासांनी केली. यात श्री चक्रधर स्वामींच्या गुणांचे व मूर्तीचे अत्यंत भक्तीभाव युक्त वर्णन केलेले आहे. श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचे निरुपण हृदयंगम पद्धतीने केलेले असून संसारात पोळलेल्या जनसामान्यांचा उद्धार करण्यासाठी ही ग्रंथरचना झालेली आहे. केसोबासांनी हा ग्रंथ प्रथम संस्कृतमध्ये लिहिला. नंतर नागदेवाचार्यांच्या आदेशानुसार या ग्रंथाची सर्वांगीणरित्या जनसामान्यांसाठी मराठीत रचना करण्यात आली.

* दृष्टांतपाठ – श्री चक्रधर स्वामींच्या उक्ती व त्यांनी सांगितलेले दृष्टांत याचे संकलन व स्पष्टीकरण केसोबास यांनी केलेले आहे. इ.स. १२८० च्या सुमारास या ग्रंथाचे लेखन झालेले असावे. सिद्धांत – सूत्रपाठात एकूण १६०९ सूत्रे असून लक्षणपाठ, आचारमालिका, विचार मालिका अशा तीन भागात त्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यातील ११४ दृष्टांतांना स्पष्टीकरणार्थ द्राष्टांतिकाचा भाग जोडून केसोबासांनी दृष्टांतपाठ रचला. एकप्रकारे दृष्टांतपाठ हे श्री चक्रधर स्वामींच्या उद्धरण सिद्धांतावरील जणू एक उपनिषदच आहे. आपले तत्वज्ञान सर्वसामान्यांना सहज कळावे म्हणून श्री चक्रधर स्वामींच्या लोकजीवनातील दृष्टांत देतात. ही उपदेशपर लोककथाच आहे. सूत्र व दृष्टांत यातून सूचित केलेले तत्व म्हणजे ‘द्राष्टांतिक’ होय. पारमार्थिक निष्कर्ष हा यातूनच निघतो.

* स्मृतीस्थळ – या ग्रंथाचे लेखन नागदेवाचार्य यांच्या निर्वाणानंतर म्हणजे इ.स. १३०८ साली झाले. यात २६१ स्मृती संग्रहित केलेल्या आहेत. कै. य. खु. देशपांडे यांनी स्मृतीस्थळाचा उल्लेख हा ‘नागदेवाचार्य चरित्र’ असा केलेला आहे. विशेषकरून श्री चक्रधर स्वामींच्या वचनांना ‘श्रुती’ म्हणतात. तर श्री नागदेवाचार्य यांच्या वचनांना ‘स्मृती’ संबोधतात. श्री नाग्देचार्यांनी श्री लक्ष्मीधरभट, श्री केसोबास व पं. श्री म्हाइंभट या ग्रंथकारांना प्रेरणा दिली. श्री चक्रधर स्वामींनंतर श्री नाग्देवाचार्यांनी पंथ प्रसाराचे व पंथीय संघटकांचे कार्य केले. ते प्रथम चक्रधर स्वामींचे विरोधक होते. नंतर ते त्यांचे शिष्य झाले. श्री चक्रधर स्वामींनी त्यांची पाच वेळा परीक्षा घेतली व सहाव्या वेळी जोगेश्वरी जवळील खड्कुली येथे त्यांना दीक्षा दिली. त्यांना श्री चक्रधर स्वामींचा सहवास लाभला. ते श्री गोविंद प्रभूंजवळ सुद्धा जाऊन राहिले. शेवटी निंबा येथे राहून त्यांनी या पंथाचा प्रसार केला.

स्मृतीस्थळाचे लेखन हे एखाद्या लेखकाने केलेले नसून ते अनेकांच्या पाठाचे संकलन आहे. नरेंद्र व परशराम हे मूळ लेखक व मालोबास व गुर्जर शिवबास हे संस्कारकार आहेत.

* महदंबा – कालखंड – इ.स. १२३३ ते १३०२. आद्य मराठी कवयित्रीचा मान हा महदंबेकडे जातो. तिलास महदाईसा असेही म्हणतात. तिचे मूळ नाव रुपाई. महदंबेच्या नावावर ‘धवळे’ व ‘मातृकी रुक्मिणी स्वयंवर’ या दोन प्रसिद्ध काव्यग्रंथाचे कर्तुत्व आलेले आहे. ‘धव’ म्हणजे लग्नात गावयाची – वर विषयक गीते किंवा ‘धवळा’ वृत्तातील मुक्त ओवीतील गीते.

कृष्ण – रुक्मिणी विवाहावरील मराठीतील पहिले काव्य. जे मातृकी रुक्मिणी स्वयंवर होय. या काव्यात श्री कृष्णाच्या सौंदर्य रूपाचे व विवाहातील सोहळ्याचे सुंदर व सरस वर्णन आलेले आहे.

धवळ्यातील पूर्वार्ध महदंबेने ८३ कडव्यांमधून रचला. उत्तरार्धाची ६५ कडवे ही महदंबेसह म्हाइंभट व लक्ष्मीन्द्रभट यांनी रचली. श्रीकृष्णाच्या भेटीने रुक्मिणीची झालेली अवस्था महदंबेने अत्यंत उत्कृष्टपणे रचली आहेत.

* साती ग्रंथ (काव्य ग्रंथ) – महानुभावांच्या सती ग्रंथात श्रीकृष्णभक्तीचे उत्कट वर्णन आलेले आहे. हे सर्व काव्यग्रंथ व्युत्पन्न व व्यासंगी पंडित कवींनी लिहिलेली आहेत. हे काव्यसंग्रह म्हणजे जणूकाही प्रबंध काव्ये आहेत.

१) रुक्मिणीस्वयंवर – नरेंद्र

२) शिशुपालवध – भास्करभट्ट बोरीकर

३) उद्धवगीता – भास्करभट्ट बोरीकर

४) वच्छाहरण – दामोदर पंडित

५) सह्याद्रीवर्णन – रवळोबास

६) ज्ञान प्रबोध – पंडित विश्वनाथ

७) ऋद्धीपूरवर्णन – नारायण पंडित उर्फ नारायणबास

या सातही महानुभावीय ग्रंथांचा सखोल विचार केल्यास हे सर्व ग्रंथ भिन्न भिन्न कालखंडात होऊन गेले. यातील भाषाशैली अगदी सारखी आहे. विषयाचे स्व्रूप भिन्न असून काही भाग हा आख्यानक स्वरूपाचा तर काहीसा तात्विक स्वरूपाचा आहे. यातील एक स्थलवर्णन, एक व्यक्तीवर्णनपर आहे तर तीन श्रीकृष्णचरित्रपट आहेत. श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रावर मात्र एकही ग्रंथ नाही. विशेषतः ‘शिशुपालवध’ या शृंगार काव्याग्रंथाचा यात समावेश करणे हेद्खील एक आश्चर्यच ठरले. ‘रुक्मिणीस्वयंवर’ या काव्यग्रंथालाही कवी नरेन्द्रांच्या पंथ प्रवेशानंतर मान्यता या ‘साती ग्रंथात’ नंतरच मिळाली आहे. तेव्हा या सर्व ग्रंथाचा विशेष असा कोणताही निकष नसून केवळ योगायोगाने त्याची एकत्र मोट बांधली आहे, असेदेखील म्हणता येणार नाही. पंथनिष्ठा व श्री चक्रधरभक्ती या सर्व ग्रंथात पूर्णपणे आली आहे.

महानुभाव पंथात या ‘साती ग्रंथांना’ मराठी साहित्याच्या दृष्टीने आकाशातील सप्तर्षी असल्याप्रमाणे मानाचे स्थान आहे.

थोडक्यात सांगायचे तर, महानुभावीय वाङ्मयाच्या संपूर्ण विवेचनातून हे लक्षात येते की, महानुभाव ग्रंथकारांनी मराठी भाषेतच गद्य, पद्य ग्रंथांची एक अभिनव परंपरा महाराष्ट्रात जोपासली असून श्री चक्रधर स्वामींच्या प्रमुख प्रेरणेने व पंथाच्या प्रसाराने बहुजन समाजाला व सामान्यांना प्रेरणा मिळून तत्कालीन समाजातील वास्तववादी जीवनाचा अ अध्यात्मिक वारसा पूर्णपणे जपण्याचा त्याचप्रमाणे सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब या वाड्मयात पूर्णपणे उमटलेले दिसते. महानुभावीय वाङ्मय जे सकळा व सुंदरा लिपीत बद्ध झाले त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्राचे सर्वांगीणरित्या दर्शन महानुभाव वाड्मयात घडताना दिसते.

*****************************