महानुभावांचे पंचकृष्ण

महानुभाव पंथात सगुण व साकार अशा परमेश्वराची उपासना सर्वश्रेष्ठ मानली गेल्याने त्यांच्याशी संबद्ध अशा सर्व स्थावर जंगम वस्तू पवित्र व वंदनीय ठरतात. महानुभाव पंचकृष्ण मानतात. त्याचीच माहिती या भागात आपण करून घेणार आहोत.

B66BvjbCIAAZRkT

१) श्री दत्तात्रेय प्रभू –

महानुभावांच्या पंचकृष्णात पहिले नाव श्रीकृष्ण चक्रवर्तींचे असले तरी अग्रक्रमाने पहिले श्री दत्तात्रेय प्रभू आहेत.  श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार त्रेतायुगात झालेला असला तरी तो कोणत्याही एका विशिष्ट युगाचा अवतार नसून चातुर्युगीचा प्रमुख अवतार आहे असे महानुभाव मानतात. त्यांचे अमोघ दर्शन म्हणजे प्रत्यक्ष बोधच होय. हे बोधरूप दर्शन श्री दत्तात्रेय प्रभू ज्यांना देतात त्याला ते स्वतःप्रमाणे अदृश्य करून सदेहीच अपरोक्ष ज्ञानच अधिकारी करतात. त्यांचे दर्शन ज्याने ज्ञानाधिकार व प्रेमाधिकार जोडला असेल त्यालाच होते. किंबहुना श्री दत्तात्रेय प्रभूंनी उच्चारलेला शब्द व त्यांनी दिलेला वर पूर्णतः खरा होतो. म्हणूनच त्यांच्या दर्शनाला ‘अमोघ’ म्हंटले जाते. श्री चक्रपाणी वा चांगदेव यांना त्यांनी एकदा माहूर येथे व्याघ्रवेशात दर्शन देऊन त्यांच्याकडून शक्ती स्वीकार करविला. पुढे श्रीचक्रपाणीपासून किंवा चांगदेव राऊळांपासून श्री गोविंदप्रभूंनी व श्री गोविंदप्रभूंपासून श्री चक्रधरांनी शक्तीस्वीकार करविला. म्हणजेच श्री दत्तात्रेय, श्री चांगदेव राऊळ – श्री गोविंदप्रभू – श्री चक्रधर अशी अवतार परंपरा ठेऊन श्री दत्तात्रेय प्रभू त्या परंपरेतील मूळ स्थानी होतात.

२) श्रीकृष्णचक्रवर्ती –

पंचकृष्णांपैकी पहिला परमेश्वर अवतार म्हणजे श्रीकृष्णचक्रवर्ती. तो परमेश्वराचा पूर्ण अवतार असून तो गर्भीचा उभायदर्शी अवतार मानला जातो. देवकीच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्याने केलेल्या लीळा श्री चक्रधर स्वामींनी आपली शिष्या महादाईसा हिच्याकडे कथन केल्या. त्याच द्वापरीच्या लीळा किंवा द्वापरचरित्रे म्हणून प्रसिद्ध आहेत.

श्री कृष्णाच्या ठायी अनेक शक्ती विराजमान होत्या. कारण तो पूर्ण परमेश्वर अवतार होता. पण त्याचबरोबर तो मानवदेहधारी होता आणि महानुभाव विचारसरणीनुसार परमेश्वर मनुष्यावतार घेतो तेव्हा मनुष्याचे सर्व देहधर्म व जीवधर्म स्वीकारूनच तो घेतो. श्री चक्रधर स्वामींच्या शब्दात तो चालता बोलता देव आहे. यादृष्टीने श्रीकृष्णाच्या स्वभावातील मातृभक्ती, मित्रप्रेम, समता. व्यवहारचातुर्य, विनोद बुद्धी, मार्मिकता इ. गुण उल्लेखनीय आहेत. श्रीकृष्णाचे हे द्विविध दर्शन महानुभाव वाड्मयात सर्वत्र घडते.

३) श्री चांगदेव राऊळ –

पंचकृष्णांपैकी तिसरे परमेश्वरावतार श्री चांगदेव राऊळ किंवा श्री चक्रपाणी हे होत. त्यांच्या या दोन नावांमागे दोन विशिष्ट कारणे आहेत. श्री चांगदेव सुरुवातीपासून मनाने विरक्त होते. त्यामुळे कमळाईसेशी लग्न करूनसुद्धा ते तिच्यापासून दूरदूरच राहिले. पुढे आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा सर्व भर त्यांच्यावर पडला. त्यांच्या उदासी वृत्तीमुळे त्यांचे मन प्रपंचात रमले नाही. म्हणून त्यांनी गृहस्थाश्रम सोडून अवधूतच वेश धारण केला व भिक्षव्रत स्वीकारले. मग काही दिवस माहूर येथे राहून ते यात्रेकरूंच्या बरोबर द्वारवतीला आले. तेथे राहून त्यांनी जीवांचा उद्धार करण्याचे कार्य केले. त्यांना नेहमीच सर्वांप्रती समतुल्य राहिले. ‘शुद्राच्या घरी आरोगण’ आणि ‘अंत्यजाचा घरी क्रीडा’ करायला त्यांना मुळीच संकोच वाटत नसे. त्यांच्या दैवी सामर्थ्याची कीर्ती दूरवर पसरली होती. त्यांची गाथा ऐकून काऊरगावची कामाख्या नावाची एक हठयोगी त्यांच्याकडे आली व त्यांना रतीसुखाचे आव्हान देऊन त्यांच्या गुफेच्या दाराशी सात दिवस धरणे धरून बसली. शेवटी ती ऐकत नाही असे पाहून श्री चांगदेवांनी योगसामर्थ्याने ठायीच्या ठायी देहत्याग केला व आपला तो अवतार संपवून त्याचवेळी भडोच येथे स्मशानात आणलेल्या प्रधानपुत्र हरपाळदेव यांच्या मृतदेहात प्रवेश केला आणि त्यांनी नवीन अवतार स्वीकारला. श्री चांगदेव राऊळांनी धारण केलेला हा नवीन अवतार म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक ‘श्री चक्रधर’ होत.

महानुभावांच्या विचारसरणीप्रमाणे श्री चांगदेव राऊळ यांचा गर्भावतार असून तो आच्छाद्नीचा अवरदृष्यावतार होता. म्हणजेच श्री दत्तात्रेयांपासून पर आणि अवर या उभयशक्तींचा स्वीकार करताना त्यांनी यापैकी परशक्ती आच्छादली व अवरशक्ती प्रकट केली. लीळाचरित्र ‘एकांक’ या भागातील पहिल्या चार लीळा श्री चांगदेव राऊळ यांच्याविषयी आहे. शिवाय श्री चक्रपाणी चरित्र म्हणून त्यांचे स्वतंत्र लीळांचे चरित्रही उपलब्ध आहे.

४) श्री गोविंदप्रभू –

श्री गोविंदप्रभू हे महानुभावांच्या पंचकृष्णांपैकी चौथे परमेश्वरावतार होत. त्यांनी वऱ्हाडात रिद्धपूर (ऋद्धीपूर – महानुभावांची काशी) प्रांती काटसूर या गावी एका कण्व ब्राम्हणाच्या घरी शके ११०९ मध्ये अवतार धारण केला. त्यांच्या आईचे नाव नेमाईसे व वडिलांचे नाव अनंतनायक होते. आई लहानपणीच वारल्याने त्यांचे पालन पोषण त्यांच्या मामा व मावशीने केले. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे उपनयन संस्कार होऊन शिक्षणासाठी ते रिद्धपुरास आले. शेवटपर्यंत ते तिथेच होते. म्हणूनच पंचकृष्णाच्या नामावलीत त्यांचा उल्लेख हा ‘ऋद्धीपुरीचे श्री गुंडम र ऊळ’ असाच होतो. कारण त्यांचे मूळ नाव गुंडम वा गुंडी असे ठेवले होते.

श्री गोविंदप्रभू यांचा हा परमेश्वरावतार म्हणजे ‘आच्छादनीचा परदृश्यावतार’ होता. वस्तुतः पर आणि अवर अशा दोन्ही विद्या जाणणारा अर्थात ‘उभयदृश्या’ असूनही त्याने आपल्या ठिकाणची अवरविद्या आच्छादून केवळ परविद्या प्रगट केली आहे.  त्याला ‘आच्छादनीचा परदृश्यावतार’ म्हणून संबोधले जाते. हा अवतार ‘दवडण्याचा अवतार’ होता. आपल्या मातेच्या गर्भातून दुसऱ्या एका जीवाला दवडून त्यांच्या जागी स्वतःच अवतार घेतला होता. श्री गोविंद प्रभूंनी श्री चांगदेव राऊळ यांच्याकडून शक्ती स्वीकार केला व ऋद्धीपूरात परत येऊन ते जीवोद्धारणाचे कार्य करीत काळ काढू लागले.

त्रिकालज्ञान, संजीवन विद्या, पंचमहाभूतांवर नियंत्रण, विष निर्विष करणे, भूमिगत द्रव्य शोधणे, मुक्याला वाचा देणे, अंतरिक्षातून वस्तू आणणे असे सामर्थ्य श्री गोविंदप्रभूंच्या अवतारीत्वाची साक्ष पटवून देतात. याशिवाय वैराग्याचे द्योतक असे त्यांचे नैष्ठिक ब्रम्हचर्य, त्यांची अनासक्तवृत्ती, संपूर्ण ज्ञानतत्व, सद्यत्व, क्षमाशीलता, असंग्रहवृत्ती, परोपकारबुद्धी इ. अनेक सत्वगुणांचा प्रत्यय त्यांचे चरित्र वाचताना पदोपदी येतो. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. स्वतः ब्राम्हण असूनही महार-मांगाच्या घरी त्यांनी अन्न पप्राशन केले. ‘राऊळ मातंगा महाराच्या घरोघरी वीचरतातीः’ यातून त्यांची कर्मकांडाचा व चातुर्वर्ण्याचा निषेध करणारी प्रगमनशील प्रवृत्तीच दिसून येते.

पं. श्री म्हाइंभट यांनी श्री चक्रधर स्वामींपासून प्रेरणा घेतली असली तरी प्रत्यक्ष दीक्षा ही श्री गोविंदप्रभूंपासून घेतलेली होती. श्री चक्रधर स्वामींचे गुरु श्री गुंडम राऊळ उर्फ श्री गोविंदप्रभू यांच्या आठवणी लीळा चरित्राप्रमाणे लिहून काढल्या व त्या ग्रंथाचे ‘ऋद्धीपूर लीळा’ असे नामकरण केले.

५) श्री चक्रधर स्वामी –

पंचकृष्णांपैकी पाचवा अवतार म्हणजे श्री चक्रधर स्वामी होय. महानुभाव पंथाचे प्रमुख प्रवर्तक म्हणून त्यांचा उल्लेख होतो. त्यांचे श्री चक्रधर असे नामकरण गोविंदप्रभूंनीच केले.

‘लीळाचरित्र’ हा महानुभावांचा मुख्य ग्रंथ असून त्यातील अनेक लीळा या श्री चक्रधर स्वामींसंबंधी आल्या आहेत.

श्री चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील अनेक लीळा यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन भाग पडतात. एकांक भागात त्यांनी अवतार धारण केल्यापासून ते त्यांच्या पैठण येथे आगमनापर्यंतचा वृत्तांत आला असून त्यात त्यांच्या एकाकी जीवनक्रमाचे दर्शन घडते. पैठणला ते प्रथम एकांतांतून लोकांतात आले. तेथून त्यांच्या आयुष्याचे एक निराळे पर्व सुरु झाले. हे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात विभागले असून त्यापैकी पूर्वार्धाचा प्रारंभ त्यांनी पैठण येथे आल्यावर नागम्बिकेला किंवा बाईसेला केलेल्या प्रेमदानाने व त्याचा शेवट खड्कुली येथे नागदेव व भटोबास यांना केलेल्या बोधदानाने होतो. तेथून श्री चक्रधरांच्या आयुष्याचा उत्तरार्ध होऊन तो त्यांच्या प्रयाणकाळापर्यंत चालतो व त्यांच्या ‘उत्तरपंथे गमना’ने त्यांच्या ज्ञात जीवनाची समाप्ती होते.

थोडक्यात सांगायचे तर भाषा, साहित्य, समाजदर्शन, तत्वज्ञान अशा अनेक दृष्टींनी लीळाचरित्रचे जे महात्म्य आहे त्याला अष्टपैलू हेच विशेषण शोभून दिसते. ‘लीळाचरित्र’ हा स्मरणभक्तीचा एक अतिशय सुंदर अविष्कार असून त्याला मराठी वाड्मयात तोड नाही.

**********************************