महानुभाव पंथ : आचार धर्म

महानुभाव पंथ स्वीकारण्यापूर्वी, त्याचे अनुयायी होण्यापूर्वी ‘महानुभाव पंथ’ या पदाचा अर्थ जाणून घेवूया. ‘महान् अनुभावस्तेजो बलं वा यस्य स महानुभावः’ म्हणजे मोठा आहे अनुभव म्ह. तेज किंवा बल ज्याचा तो महानुभाव आणि पंथ म्हणजे मार्ग-रस्ता. अर्थात मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग म्हणजे ‘महानुभावपंथ’. महानुभाव पंथाचा स्वीकार करणे म्हणजे मोठ्या तेजयुक्त लोकांच्या मार्गावर चालून स्वतः मोठे, तेजयुक्त बनणे.

महानुभावपंथीय बनण्यासाठी प्रथमतः ‘‘द्यूतं प मद्यं पिशितं च वेश्या पापर्द्धि चौर्य परद्वार सेवाll’’ म्हणजेच द्यूत, मद्य, मांस, वेश्या, शिकार, चोरी, परद्वारसेवा या सात दुर्व्यसनांचा सर्वथा परित्याग केला पाहिजे. तसेच एका परमेश्वराचीच अनन्यभक्ती करण्याची दृढ प्रतिज्ञा गुरूच्या समोर परमेश्वरापुढे केली पाहिजे. जोपर्यंत मनुष्य तशी प्रतिज्ञा करीत नाही तोपर्यंत त्याला महानुभावपंथाचा गुरुवर्य गुरुमंत्र सांगत नाही व तो महानुभाव पंथाचा अनुयायी बनू शकत नाही.

प्रत्येक धर्मात प्रविष्य होण्यापूर्वी काही तरी संस्कार करावयाचा असतो. जसे की, ख्रिस्ती धर्मात ‘बातीस्मा’ नावाचा संस्कार झाला म्हणजे मनुष्याला ख्रिस्ती म्हणतात. असे प्रत्येक धर्माचे काही विशिष्ट संस्कार आहेत. एखादा सामान्य संघ निवडायचा तरी त्याचा वेष धारण करावा लागतो. तसेच महानुभाव पंथ स्वीकारण्यापूर्वी सप्त दुर्व्यसने सोडण्याची व परमेश्वराची अनन्यभक्ती करण्याची दृढ पतीज्ञा करावी लागते.

* परमेश्वरचरणांकित ‘विशेषा’ची स्थापना –

महानुभाव पंथाचा प्रतिज्ञापूर्वक अनुयायी झाल्यानंतर त्याने परमेश्वराव्यतिरिक्त इतर देव-देवतांची उपासना सर्वथा सोडून दिली पाहिजे. घरातील देव्हाऱ्यात देवी-देवतांच्या मूर्ती असतील तर त्या एखाद्या देवळात नेऊन ठेवाव्यात. त्यांची अवहेलना, तिरस्कार किंवा भंग करता कामा नये. जो कोणी देवमुर्तीचा भंग करतो त्याला एक हजार वर्षापर्यंत ‘जडत्व’ नावाचा नर्क भोगावा लागतो, असा महानुभावपंथाचा कायम सिद्धांत आहे.  देव्हाऱ्यातील देवी-देवता यथासांग देवळात सोडल्यानंतर देव्हाऱ्यात/देवपाटावर श्रीकृष्ण, श्री दत्तात्रेय, श्री चांगदेव राऊळ, श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधर स्वामी या पाच परमेश्वर अवतारांपैकी कोणत्याही परमेश्वराच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या ‘संबंधी’ पाषाणाची किंवा त्या पाषाणाच्या घडलेल्या मूर्तीची स्थापना करावी. ज्या वस्तूला परमेश्वरावतार मुद्दाम स्पर्श करतात त्या वस्तूंत परमेश्वराची कृपा शक्ती व माया शक्ती कार्यरूप होत असते. इतर देव-देवतांच्या घडीव-कोरीव मूर्तीची किंवा एखाद्या धोंड्याला शेंदूर लावून मानलेल्या प्रतिमेची पूजा जोपर्यंत होत राहते तोपर्यंतच त्या मूर्ती-प्रतिमेत अधिष्ठात्री देवतेचे अधिष्ठान-सामर्थ्य कायम असते. काही दिवस पूजा बंद राहिली तर अधिष्ठात्री देवतेचे अधिष्ठान सामर्थ्य त्या प्रतिमे-मूर्तीतून निघून जाते. ती सामर्थ्यहीन बनते. पण परमेश्वर चरणांकित पवित्र पाषाणाचे तसे नाही. शकडो वर्षे त्याची पूजा केली नाही तरी त्याची पवित्रता, त्यात असलेली कृपा व माया या दोन शक्ती सृष्टीचा संहार होईपर्यंत नष्ट होत नाही. म्हणूनच त्याला विशेष महत्व आहे. परमेश्वरचरणांकित पवित्र पाषाणाची किंवा मूर्तीची म्हणजेच ‘विशेषा’ची स्थापना देव्हाऱ्यात केल्यानंतर दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ त्याची पूजा अवश्य करावी. ती केल्याशिवाय अन्न-पाणी ग्रहण करू नये.

* पूजा करण्याचा विधी –        

दररोज सकाळी स्नान करून अगोदर त्या ‘विशेषा’च्या पुढे पाच साष्टांग नमस्कार घालावेत. नंतर आपले दोन्ही हात वस्त्राने गाळलेल्या पाण्याने धुवून स्वच्छ करावेत. ओले हात पुसण्यासाठी एक निराळे वस्त्र नेहमी देवपाटाजवळ असू द्यावे. त्याने आपले ओले हात परिमार्जन म्हणजे पुसले केले जातात म्हणून त्याला ‘परिमार्जन’ असे म्हणतात. हात कोरडे केल्यावर आपल्या अंगावरील कपड्यांचा स्पर्श होऊ देऊ नये. देवपाटावरील ‘विशेष’ आपल्या हातावर ठेऊन तो ज्या परमेश्वराचा चरणांकित असेल त्या परमेश्वरावताराने केलेल्या लीळेचे मनात स्मरण करावे. ‘परमेश्वराच्या सेवा संबंधास माझा दंडवत’ असे म्हणावे आणि कायेने नम्र होऊन आपले मस्तक तीन वेळा त्या ‘विशेषा’वर ठेवावे. नंतर त्यावर यथाशक्ती दूध, दही, केळे, साखर वा मध या पंचामृताने स्नान करवावे. शुद्ध वस्त्राने पुसून त्याला सुवासिक अत्तर लावावे. केशराचे सुगंधित चंदनी गंध लावून अक्षता वाहाव्यात. सुवासिक पुष्पे अर्पण करावीत. उदबत्ती वा सुवासिक धूप दाखवावा. पंचारती किंवा एकारती डावीकडून उजवीकडे सात वेळा ओवाळावी. आरती ओवाळीत असताना ‘जयतु मंगलमंगलः परम मंगलरूपः’ असे तोंडाने म्हणावे.

प्रार्थना –

हे प्रभो ! विभो ! सच्चिदानंदघन परमेश्वरा ! करुणार्णवा ! तुं दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू आहेस. तु आर्तदानी, अनिमित्तबंधु, जीवोद्धरण-व्यसनी, शरणागतवज्रपंजर आहेस. तु अनाथनाथ, भक्तवत्सल, पतितपावन, नित्यमुक्तीदायक आहेस. तू सकलगुणनिधान, सर्वसाक्षी . अच्युत, अविनाशी, मंगलकारक आहेस. मी मूळ सृष्टीपासून अनंत जन्माचा अनाचारी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सरादि अनेक दोषांनी नखशिखांत भरलेला आहे. अनंतसृष्टीचा प्रमादिया असून कुटील, अधम, पामर, क्रूर, निष्ठुर, हिंसक, वंचक, पातकी-घातकी, राजसी, तामसी, अहंकारी, अविचारी, दोषदर्शी, वर्मस्पर्शी, गुरु-द्रोही,, मार्ग-द्रोही, विश्वासघातकी व अपवित्राहून अपवित्र आहे. किंबहुना मी सर्वदोषांचे आगर आहे. माझ्याकडून कळत-नकळत जी पापे घडली असतील त्या सर्वांची सद्यान्तः करणाने क्षमा करावी जी ! इष्टक्रिया घडवून सकळ अनिष्टांपासून रक्षावे जी ! आपले ज्ञानदान, प्रेमदान, भाक्तीदान देऊन व सेवा – दास्य घडवून मज अपवित्राते पवित्र करावे जी ! या दुःखमय संसारापासून सोडवून मज किंकराला आपल्या आनंदस्वरूपी पावन करावे जी !

* परमेश्वर स्मरण करण्याचा विधी –

यथेष्ट पोटभर खाऊन सूर्योदय होईपर्यंत ऐसपैस निजून राहू नये.  रात्रीच्या पश्चात प्रहरी उठावे. तो सारस्वत काळ असतो. त्याकाळी परमेश्वराचे स्मरण करावे, अशी श्री चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना आज्ञा केली आहे. परमेश्वराचे नामस्मरण केल्याशिवाय जो दिवस लोटला तो वांझ गेला म्हणून समजा. त्यादिवशी काहीच कमाई केली नाही. दिवस वांझ जाऊ नये म्हणून निदान १५ माळा तरी परमेश्वराचा जप केलाच पाहिजे. १०८ मण्यांच्या माळेने १५ माळा जप एका प्रहरात आटोपतो. रात्रीचा पश्चात प्रहर अगदी शांततेचा व स्वस्थतेचा असतो. त्या प्रहरातच जप करावा.

* गुरूंची आवश्यकता –

अज्ञानी जीवाला गुरुंवाचून ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही, म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी गुरु करणे आवश्यक आहे. समर्थ रामदास म्हणतात,

जंव नाही ज्ञानप्राप्ती l तंव चुकेना यातायाती l

गुरुकृपेविण अधोगती l गर्भवास चुकेना ll३५ll

असो जयासि मोक्ष व्हावा l तेणें सद्गुरू करावा l

सद्गुरूविणें मोक्ष पावावा l हें कल्पांती न घडे ll४४ll (दा.बो. ५.१)

परंतु गुरु हा ‘गृणाती-उपदिशति-इति गुरुः’ म्हणजे जो उपदेश करतो तो गुरु – या व्युत्पत्ती प्रमाणे ‘गुरु’ पदाला योग्य असावा. एवं जो उपदेश करून शिष्याच्या मनाचे समाधान करू शकेल असाच गुरु पाहिजे. पण असा गुरु विरळाच असतो. म्हणून म्हटले आहे,

गुरवो बहवः सन्ति शिष्यवित्तापहारकाः l

गुरवो विरलाः सन्ति शिष्यसंतापहारकः ll

शिष्यापासून दक्षिणा उपटणारे गुरु पुष्कळ असतात. पण शिष्याचा संताप हरण करणारे गुरु विरळच असतात. अशा गुरूचा शोध करून त्यापासून गुरुमंत्र घ्यावा. तो घेताना शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही.

शिष्यमाहूय करुणा कृपया दीयते यदा l

तत्र लाग्नादिकं किंचिन्न विचार्थं कथंचन ll          

सर्वे वारा ग्रहाः सर्वे नक्षत्राणि च राशयः l

यस्मिन्नहनी संतुष्टो गुरुः सर्वे शुभावहः ll

गुरूने शिष्याला बोलावून जेव्हा अनुग्रह दिला जातो तेव्हा दिन शुद्धी आदी मुहूर्ताची जरुरी नाही. ज्या दिवशी गुरु संतुष्ट होतो त्यादिवशी सर्व वार, गृह, नक्षत्र आणि राशी शुभ होतात.

* गुरूला परमेश्वर समजू नये –

गुरूला परमेश्वरभक्त समजून त्याच्या ठायी परम प्रीती करावी. पण त्याला परमेश्वर समजू नये. इतर पंथात ज्ञानदेव, तुकाराम यांसारख्या गुरूला अवास्तव महत्व दिल्याचे दिसते. इतके की ते मेल्यावर त्यांची समाधी बांधून तिची पूजा करून त्यांच्या नावाने भजन केले जाते. पण महानुभावपंथीयाने आपल्या गुरूची किंवा कोणत्याही श्रेष्ठ पुरुषाची समाधी बांधून तिची पूजा-अर्चा करू नये. कारण समाधीची पूजा म्हणजे प्रेतपूजा होय. प्रेताची पूजा करणारे लोक तामस असतात आणि तामस लोक नरकात जातात. असे भगवंतांनी,

‘‘प्रेतान भूतगणांश्चन्ते यजन्ते तामसा जनाः’’

‘‘अधोगच्छति तामसाः’’ (गी. १४.१८) या वाचनात सांगीतले आहे.

भागवतातही (११.१०.२८.) म्हटले आहे,

पशुं विधीणालभ्यं प्रेतभूतगणान् यजन् l

नरकानवशो जंतुर्गत्वा यात्युल्बणं तमः ll    

‘‘वेद्विधीने पशुला मारणारा व प्रेतभूतगणांची पूजा करणारा प्राणी अवश्य नरकात जाऊन घोर अंधकाराला प्राप्त होतो.’’ गुरु हा ज्ञानी असल्यामुळे त्याचे (सू. वि.१४३) या स्वामींच्या वचनानुसार आदरार्थ पूजन करावे.

श्रीकृष्णपरमात्म्याच्या –

तद्वीद्धि प्रतीपातेन परि प्रश्नेन सेवया l

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानि नस्तत्वदर्शिनः ll  (गी. ४.३४)

या वचनानुरूप ज्ञानी गुरूला प्रणिपात करून म्हणजे साष्टांग नमस्कार करून ‘बंध कसा प्राप्त होतो, मोक्ष कसा मिळतो, विद्या कोणती, अविद्या कोणती असे सर्व प्रकारचे प्रश्न करावे व ज्ञानी गुरूची सेवा करून त्यापासून ज्ञान प्राप्त करून घ्यावे. ज्ञानाशिवाय गुरूजवळ दुसरे काहीच नसते. तो ऐहिक किंवा पारलौकिक सुख देऊ शकत नाही. तो केवळ सन्मार्ग दाखवू शकतो. म्हणून तो फक्त जिवंत असेपर्यंत त्याचे पूजन करावे. तो मेल्यावर त्याची समाधी बांधून पूजा करण्याने कोणताच फायदा होत नाही. कारण तो स्वतः जीव असल्यामुळे मेल्यानंतर आपल्या शुभाशुभ कर्मानुसार मोक्षाला किंवा नरकाला गेलं असेल. मोक्षाला गेला असेल तर तो ब्राम्हनंदात मग्न असतो. तो तुमच्या हाकेकडे लक्ष देत नाही. जर तो नरकात असेल तर तो त्या नरक योनीत पडलेला असतो. म्हणजे तो मेल्यावर तुम्हा-आम्हाला काहीच देऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या नावाने भजन करण्यापेक्षा परमेश्वराच्या नावाचे भजन केले तर आत्मकल्याण तरी होईल. मात्र गुरूला परमेश्वर समजून त्याचे कधीच भजन करू नये.

* परस्पर परम प्रीती –

(सू.आ.१६६)  या वचनात श्री चक्रधर स्वामींची आपल्या अनुयायांना आज्ञा आहे की त्यांनी परस्परांत परम प्रीती करावी. कारण इतर गोत्र हे तात्पुरते गोत्र आहेत. पण अच्युत परमेश्वर त्यांच्याशी आपल्या भक्तिभावाने ज्यांनी नाते जोडले आहे व जे भक्तीच्या योगाने परमेश्वराचे आवडते पुत्र बनले आहेत ते ‘अच्युत गोत्रीय’ सख्खे बंधू होत. त्यांनी प्रेमपूर्वक सर्वांची सेवा करावी. त्यांच्यावर कोणतेही संकट कोसळले तर आपले प्राण खर्ची घालून एकमेकांचे संरक्षण करावे. (सू.आ.१२९) या सस्वामींच्या वचनानुसार परमेश्वर भक्तांची परस्पर भेट झाली तर त्यावेळी त्यांना परस्परांत इतका आनंद वाटला पाहिजे की, जितका आनंद परमेश्वर भेटल्याने होईल. कारण परमेश्वराची भेट होणे या जगत मनुष्यास दुर्लभ आहेच, पण परमेश्वराची आठवण करणारा देखील जगत दुर्लभच असतो, हे स्वामींनी (सू.आ.मा.१००) या वचनात सांगितले आहे.

* अतिथी सत्कार –

अतिथी हा परमेश्वराचा एक भक्त होय, म्हणून त्याचा सत्कार करणे हे माझे परम कर्तव्य होय या भावनेने अतिथीचा सत्कार करणे म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी प्रेमभाव व्यक्त करणे होय. परमेश्वराचा भक्त मग तो भिक्षुक असो वा गृहस्थ दृष्टीस पडताच सामोरे जाऊन त्याला ‘दुर्लाभाचा दुर्लभ’ समजून प्रथम दंडवत करावा. थोर ज्ञानी असेल तर नारळाची दर्शन भेट देऊन अगदी प्रेमभावाने परस्पर आलिंगन करावे. नंतर क्षेमवार्ता पुसावी. पाच साष्टांग नमस्कार घालून भोजनाचे निमंत्रण द्यावे. भोजनाच्या वेळी गंध, अक्षता, पुष्पे आदी साहित्याने पूजा करून अन्नाचा ‘कृष्णार्पण’ म्हणून संकल्प घालावा व आरती धुपारती करून पाच साष्टांग नमस्कार घालावेत. हा अतिथी सत्कार ‘ईश्वरार्पण’ बुद्धीनेच करावा.

* अन्नदान –

(सू.वि.मा.१०६) या वचनात स्वामींनी अन्नदानाला ‘उत्तम दान’ म्हटले आहे. कारण अन्नदानाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे अन्नावाचून मोक्षच मिळत नाही. मात्र हे अन्नदान ‘ईश्वरार्पण’ बुद्धीनेच केलेले असले पाहिजे.

***************************************