आयुर्वेदाची सौंदर्य संजीवनी

मानवी आयुष्यात गेलेली संपत्ती, राज्य परत मिळू शकते. परंतु गेलेले शरीर मात्र परत मिळू शकत नाही. म्हणून मानवी शरीराच्या सौंदर्य प्राप्तीसाठी आयुर्वेदोक्त उपचार करावेत. हितकारक आहार-विहार व आचरण हा आरोग्याचा धर्म आहे. केवळ मदतीचा हात एव्हढेच औषधोपचाराचे महत्व आहे.

   

 सौंदर्य संजीवनी प्राप्त करण्यासाठी निसर्गाशी एकरूप होणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारची कृत्रिम सौंदर्यप्रसाधने वापरून सौंदर्य प्राप्ती होत नाही. कारण अशा सौंदर्यप्रसाधनांमध्ये कृत्रिम द्रव्यांचा वापर केला जातो. त्यामुळे सौंदर्यांची कायमची हानी होऊ शकते. सौंदर्य प्रसाधने व वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक सर्जरीने सौंदर्य बदल करता येतात, असे प्रयत्न करू नयेत, असे नाही. विज्ञानातील प्रगतीचा फायदा अवश्य घ्यावा. परंतु आपली संस्कृती, आपल्या देशातील आयुर्वेदिक शास्त्र, योग निसर्गोपचार, ऋतुचर्या, दिनचर्या, शरीर प्रकृती, हवामान, दोषधातु आणि मल ह्या सर्व बाबींचा विचार करायला हवा. १–२ वेळा सुंदर दिसण्यासाठी आपल्याकडे जे मौल्यवान आहे त्याला इजा पोहचू देऊ नये. आयुर्वेदोक्त दिव्य वनस्पती व जीवनपद्धतीत बदल केल्यामुळे सौंदर्य संजीवनी प्राप्त होऊ शकते. ह्यासंदर्भात प्रकृतिविचार, महाभूते, दोषधातुविचार, ऋतुचर्या, दिनचर्या ह्या जीवनपद्धतीचा सौंदर्य वृद्धीसाठी कसा उपयोग होतो ह्याचा साकल्याने विचार ह्या लेखात आपण करणार आहोत.

मनुष्य देहाला जोडणारी पंचमहाभूते

विश्वाचे निर्माण पंचमहाभूतांपासून होते. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश जेव्हां आत्मतत्वाशी एकरूप होतात तेव्हा मनुष्याची निर्मिती होते. आपणास दिसणारा सृष्टीतील प्रत्येक पदार्थ ह्याच महाभूतांनी बनलेला असतो. मनुष्य देहाची निर्मिती होत असताना पंचमहाभूत विकारांचा समतोल समुदाय चैतन्याचा आधार बनून माझ्या तुमच्यासारखा माणूस बनतो. ह्या मनुष्य देहाला चार प्रकारे महाभूते जोडली जातात.

– मातापित्यांच्या बीजातून येणारी महाभूते

– लिंग देहाबरोबर आलेली महाभूते

– गर्भधारणेनंतर मातेच्या आहार रसातून

– जन्मानंतर आहार आणि श्वसनाद्वारे.

प्रत्येक अवस्थेत पंचमहाभूते मनुष्याच्या जीवनाशी संबधित असतात व त्या प्रमाणे शरीराशी संयुक्त होणारी पंचमहाभूते सुयोग्य असतील तर सौंदर्य प्राप्ती होऊ शकते. ह्याउलट जोडली जाणारी महाभूते अयोग्य असतील तर शरीरामध्ये बिघाड उत्पन्न होतो. पंचमहाभूतांचा केवळ अध्यात्माशी संबंध आहे असा गैरसमज लोकांनी करून घेतलेला आहे. हे संयुक्त नाही असे वाटते.

जगातील सर्व द्रव्य, मग ती आयुर्वेदिक असो वा अन्य, ही पांचभौतिकच असतात व मनुष्य देहाला औषधासारखी उपयुक्त असतात. मानवी देहावर होणारे द्रव्याचे परिणाम तपासून त्या द्रव्याची गणना आयुर्वेदीय परिभाषेत केली जाते. प्रकृतीमानाप्रमाणे आयुर्वेदिक वनस्पतीद्रव्य पोटातून घेतल्यास व काही पथ्य पाळल्यास चांगले परिणाम दिसून येतात असे वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. गेल्या वीस वर्षापासून आयुर्वेदिक औषधी द्रव्याचा वापर विविध अवस्थामध्ये मी करित आहे. सौंदर्य जोपासनेसाठी वेगवेगळ्या टिप्स लेखामध्ये अन्यत्र दिलेल्या आहेतच.

 

 द्रव्ये अवस्था           गुण                            उपयोग 

पार्थिवद्रव्य          गुरु, स्थूल, स्थिर                      शरीराला वजन, आकार, स्थिरता, दृढता येते

आप्य                    शित, गुरु, मंद, सांद्र                 स्निग्धता, तृप्ती, उत्साह वाढतो      

तेजस                    रुक्ष, तीक्ष्ण, विशद, सूक्ष्म      उष्णता, कांती, वर्ण, तेज, पचनशक्ती सुधारते

वायवीय               रुक्ष, विशद, लघु                        देहामध्ये चपलता येते      

आकाशीय            सूक्ष्म, विशद, लघु                    शरीरामध्ये सच्छिद्रत्व व लाघव येते  

सौंदर्य प्राप्ती करून घ्यायची असेल तर औषधी द्र्व्यातील पंचमहाभूतांकडे डोळे उघडून पाहा. अंतर्मुख होऊन मनन, चिंतन करा म्हणजे सौंदर्य संजीवनी प्राप्त करून देणारी द्रव्य व द्रव्याचा खजिना जसा आहे तशा स्वरुपात तुमच्या हाताशी येईल.

 

 प्रकृती व सौंदर्य  –

एकाच घरात एकाच आईबाबांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलामुलींमध्ये वैचित्र्य आढळते. कोणी गोरा तर कोणी काळा कोणी उंच तर कोणी बुटका एकीचा बांधा कमनीय तर दुसरीचा बेढब, प्रत्येकाच्या आवडीनिवडी देखील वेगळ्या असतात. ह्या सर्व गोष्टी गर्भाधानाच्या वेळी मातापित्यांची शारीरिक स्थिती, गरोदरपणातील आहार विहार संस्कार ह्या सर्व गोष्टींवर अवलंबून असतात. प्रकृतीमुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडते. आता थोडक्यात प्रकृतीबद्दल माहिती घेऊया.

वातप्रकृती

वातप्रकृतीची व्यक्ती उंच व कृश असते. त्वचा कृष्णवर्णाची, मळकट, रुक्ष, हातापायाच्या त्वचेवर चिरा पडलेल्या, केस, नखे, दात, हातपाय रुक्ष आणि मळकट असतात.

पित्तप्रकृती

पित्तप्रकृतीच्या व्यक्ती गव्हाळ वर्णी, सडपातळ असतात. नखे, डोळे, ओठ, हातपाय, जाड रुंद असतात. अंगावर अवेळी सुरुकुत्या पडतात. केस कमी व मृदू असतात. त्वचेवर तीळ, पुळ्या आणि वांग असतात.

कफप्रकृती

अशा व्यक्ती सुदृढ आणि बांधेसूद असतात, वर्ण गोरा असतो, केस दाट, कुरळे असतात. त्वचा स्निग्ध, तुकतुकीत असते. वातपित्त, वातकफ, कफपित्त प्रकृतींमध्ये त्या त्या दोषांप्रमाणे मिश्र लक्षणे आढळतात.

सम प्रकृतीच्या व्यक्ती

सम प्रकृतीच्या व्यक्ती उत्तम सौष्ठवयुक्त, श्याम वर्णाच्या असतात, आरोग्य नीट राहण्यासाठी व सौंदर्य संजीवनी प्राप्तीसाठी म्हणजे वार्धक्यापर्यंत तरूण दिसण्यासाठी देश आणि प्रकृती यांच्या विपरीत गुणाचा अंगिकार करावा लागतो.

 

धातुविचार व सौंदर्य

जन्माला येण्याचा उददेश सफल होईपर्यंत आपली सुरक्षा करण्यासाठी धातु कवचकुंडलाप्रमाणे काम करतात. आपण जे खातो त्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे ७ धातु निर्माण होतात. देहाच्या पोषणासाठी धातूची आवश्यकता असते. धातूंपासून देहाचे सर्व अवयव व इंद्रिये निर्माण होतात. सम अवस्थेत असलेले धातु देहातील आपले काम उत्तम रीतीने बजावतात. फळे व दूध एकत्र करून खाणे, फास्ट फुडचा बेसुमार वापर, नियम न पाळता दही खाणे ह्या सर्व गोष्टींचा धातूंवर परिणाम होतो. त्याचा परिणाम त्वचेवर होऊन सौंदर्यात बिघाड होतो. धातु दुबळे झाले तर रोग निर्माण होऊन वाढतात. ह्यापूर्वी आपण महाभूते दोष, धातु ह्यांची थोडक्यात माहिती पाहिली. आता धातुसार प्रकृतीचे थोडक्यात वर्णन पाहूया. सात धातु व सात्विक मन अशा एकूण आठ सारप्रकृती व तेवढ्याच असार प्रकृती असतात.

रससार व्यक्ती   ह्यांची त्वचा सुकुमार, गौरवर्णीय, प्रसन्न, तुकतुकीत असते

रक्तसार व्यक्ती – अशा व्यक्ती सुकुमार, अल्पबळाच्या व कष्ट सहन न करणाऱ्या असतात. ह्यांचे कान, डोळे, तोंड, हातापायांचे तळवे लाल रंगाचे असतात.

मांससार व्यक्ती  कपाळ, डोळे, गाल, हनुवटी, मान, खांदे, हाताची बोटे घट्ट आणि मांसल असतात.

मेदसार व्यक्ती  ह्या व्यक्ती शरीराने मोठ्या अवजड व तेलकट त्वचा असलेल्या असतात.

अस्थिसार व्यक्ती  ह्या व्यक्ती उत्साही, सतत उद्योगी असतात.

मज्जासार व्यक्ती – सडपातळ असून त्यांच्या त्वचेचा वर्ण गव्हाळ व स्निग्ध असतो.

शुक्रसार व्यक्ती  श्रीमंत, दीर्घायुषी, प्रसन्न व तेजस्वी असतात.

सर्व धातुसार –  असलेल्या व्यक्ती पाहण्यास क्वचित मिळतात. समाजाच्या मानसिक सौंदर्यासाठी प्रत्येक व्यक्ती सारवान असणे आवश्यक आहे. रसायन चिकित्सेने धातुसारत्व मिळवता येते.

 

मलविचार

आधुनिक शास्त्र, दोष व मलाचा विचार करत नाही. असे असले तरीही मल व मूत्रप्रवृत्तीसाठी वेगवेळ्या प्रकारची औषधे वापरली जातात. वयाबरोबर चेहऱ्यावरील त्वचेला सुरकुत्या पडतात, आतड्याची रुक्षता वाढते. मल जेव्हां क्षीण होतो तेव्हां मृत्यु अटळ असतो. मलाच्या दुर्लक्षित दालनाचे दर्शन आपण करून घेऊया. अन्नपचनानंतर रसरक्तादी सात धातूंच्या शोषणानंतर पोषण होते व नंतर उरलेला भाग म्हणजे मल होय. किट्टाला मलस्वरूप येऊन ते देहाच्या बाहेर जाईपर्यंत त्यावर शोषणाचे संस्कार होत असतात. हा मल शरीरात तसाच राहिला तर ओटीपोटात जड वाटणे, पोट फुगणे, छाती व कुशीत वेदना होणे इ. लक्षणे निर्माण होतात. ही अवस्था सुधारण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची रेचके, एनिमा इत्यादि उपचार घेतात व त्यामुळे त्यांच्या शरीराचे सौंदर्य बिघडते.

हे सौंदर्य टिकविण्यासाठी अभ्यंग, बस्ती, आहार, विहार, दिनचर्या इ. पालन करणे आवश्यक असते. मलशुद्धी नाही झाली तर चेहरयावर सौंदर्यप्रसाधने लावून आपण सुंदर दिसतो का हे तपासून पहा ?

देहाचे सौंदर्य वाढविण्यासाठी त्याची देखभाल करणे आवश्यक असते. त्यासाठी आरोग्यशास्त्राचे नियम पाळणे आवश्यक आहे. आयुर्वेदाची सर्वश्रेष्ठता आज जगमान्य होत आहे. आधुनिक वैद्यक फक्त जन्माचा व शरीराचा विचार करते. स्वस्थवृत्ताचा फारसा विचार ह्या शास्त्रात दिसत नाही. “दुनिया जाये तेल लेने ऐश तू करे” अशी वृत्ती ह्या शास्त्राची दिसते. सर्व तपासण्या नॉर्मल ECG, 2D Echo   सगळं काही within normal limit असूनही इंद्रियाची दमछाक करणारी लालसा थांबत नाही. जीवनाची कुतरओढ चालूच असते. ह्या गोष्टी आरोग्य देऊ शकत नाहीत मग सौंदर्याची बातच येत नाही. बाह्य सौंदर्यापासून मनाच्या सौंदर्यापर्यंत सौंदर्य संजीवनी प्राप्त करण्यासठी दिनचर्या, ऋतुचर्या यांची गरज असते. तेव्हां त्याकडे आपण दृष्टीक्षेप वळवूया.

 

दिनचर्या :-

१) सकाळी लवकर उठणे, सकाळच्या वेळी देहामध्ये पृथ्वी आणि जल ही दोन महाभूते असतात. त्यावेळी कफ बलवान असतो त्यामुळे व्यायाम करावा. १५ वर्षापुढील सर्व व्यक्तींनी १५ मिनिटे प्राणायाम व ध्यानधारणा करावी. ह्यामुळे कफाचे शमन होते.

२) दुपारी जल व तेज महाभूते शरीरात असतात, पित्त जोर करू लागते. अशा वेळी जेवण करावे.

३) सायंकाळी वायु व आकाश महाभूते प्रबल असतात. त्यामुळे वाताची वाढ होते. त्यामुळे सात्विक व हलका आहार घ्यावा. जागरण करू नये. रात्रीचे जेवण शक्यतो ७ च्या आत करावे. ह्या सर्व नैसर्गिक परिवर्तनाचा विचार दिनचर्येत केला आहे.

 

ऋतुचर्या :-

सौंदर्य संजीवनी प्राप्तीसाठी ऋतुचक्राचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. खालील चित्रातून ऋतुचक्राची आपणास कल्पना येईल.

[“देही आरोग्य नांदते” वै. पाध्ये गुर्जर” पुस्तकातून साभार]

ऋतुमानाचे पृथ्वीवर जसे परिणाम होतात तसेच शरीरावर पण होतात. शरीरावरील परिणाम बाह्यत्वचेवरून जाणवायला लागतात. चेहरा, नाक, डोळे, केस ह्या सर्व गोष्टींची सौंदर्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. ऋतु बदलानुसार पाउस पडतो, थंडी पडते, महापूर येतात. सुनामीच्या लाटांमुळे पृथ्वीही नृत्य करू लागते. ह्यापासून सुरक्षित राहण्याची व्यवस्था आपण करतो. शरीराच्या सुरक्षेसाठी अशाच ऋतुचर्येची व्यवस्था निसर्गाने करून ठेवली आहे. ऋतुनुसार आयुर्वेदोक्त शोधन व दिनचर्येचे पालन करावे म्हणजे सौंदर्य प्राप्त होते.

 

केसांची काळजी कशी घ्याल ?

ह्यात केस धुण्यासाठी शिकेकाई, रिठा, त्रिफळा, नागरमोथा ह्या वनस्पतींचा वापर करावा. त्यामुळे केसांच्या ग्रंथींना रक्तपुरवठा चांगला होतो. केसांची वाढ चांगली होते. केसांमध्ये होणारा कोंडा निघून जातो. त्यामुळे सर्वांना ह्या औषधांचा काढा बनवून केस धुवावेत. म्हणजे केस चांगले वाढतात व केस गळणे, तुटणे ह्या समस्या दूर होतात. शिवाय कोरफडीचा चीक केसांना लावल्यास केशवर्धनासाठी मदत होते, डोक्यातील खाज पण कमी होते. जुन्या मृत पेशींना नष्ट करून नवीन पेशींना उत्तेजित करण्याचे खास तत्व कोरफडीमध्ये आहे. केस धुतल्यानंतर केसाला तेल लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी ब्राम्ही, भृंगराज, जास्वंद, कचूर सुगंधी, मेहंदी, माका, आवळा, तुळस ह्या द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरावे. वेगवेगळ्या केश प्रकारावर वेगवेगळी औषधीद्रव्य वापरून तेल बनवता येते. केसांचे आरोग्य प्रकृतीवर पण अवलंबून असते.

केसांचा व्यायाम :-

केसांना व्यायाम मिळणे तितकेच महत्वाचे आहे. बोटाच्या टोकांनी केसाखालच्या त्वचेवर गोलाकार दाब देणे, वर्तुळाकार पद्धतीने दाब देणे, डोक्यावर थापट्या मारणे, केसांतून बोटे फिरवणे अशा प्रकारांनी केसांना व्यायाम देता येतो. योग्य आहार, आयुर्वेदिक औषधे आणि महत्वाचे म्हणजे ध्यान. ह्यामुळे केसांचे सौंदर्य राखता येते.

 

त्वचेची  निगा :-

आपण सुंदर दिसावं अस कोणास वाटत नाही? निरोगी त्वचा हा एक आरोग्याचा आरसाच आहे. आपल्या शरीरात डोके, तळपाय, तळहात, पाठीचा भाग, पोटाचा भाग, ह्यात वेगवेगळ्या प्रकारची त्वचा असते. त्वचेचे रुक्ष, तेलकट, नैसर्गिक, ओली, सुरकुतलेली असे प्रकार पडतात. आपल्या सभोवतालचा निसर्ग स्वतःच सौंदर्यतज्ञ आहे. निसर्गामध्ये वेगवेळ्या प्रकारच्या वनस्पती नियोजनपूर्वक वापरल्या तर फायदा होतो. सर्वत्र सहज मिळणाऱ्या आयुर्वेदिक औषधी वेगवेगळ्या कारणासाठी वापरता येतात. त्यासाठी खालील वनस्पतीजन्य गोष्टी उपयुक्त ठरू शकतात.

केसांच्या स्वच्छतेसाठी – आवळा, हिरडा, बेहडा, कोरफड, लिंबू;

केस निर्जंतुक करण्यासाठी – लिंबाची साल, बावची, संत्र्याची साल, दारुहरिद्रा;

त्वेचेवरील मृतपेशी काढण्यासाठी – कोरफड, पपई;

त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठी – मंजिष्ठा, दारुहरीद्रा, अनंतमूळ, रक्तचंदन;

त्वचेवरील सुरकुत्या काढ ण्यासाठी – नागरमोथा, पपई, कोरफड;

चेहऱ्यावरील तेलकटपणा घालविण्यासाठी लेप – ज्येष्टमध, मुलतानी माती, कचूर सुगंधी;

त्वचेची रूक्षता घालविण्यासाठी – चंदन, हरिद्रा, अनंतमूळ.

तारुण्यपीटिकासाठी आयुर्वेदिक औषधी –

अलीकडे जीवनशैलीतील बदलामुळे तरुण्यापीटीकांचे प्रमाण वाढलेले आहे. चेहऱ्याची अस्वच्छता व निगा न राखल्यामुळे तारुण्यपीटिका होतात. तरुण्यापीटीकांसाठी उपुक्त असणाऱ्या वनस्पती बाह्यचिकित्सेसाठी व पोटात घेण्यासाठी वापरता येतात. आयुर्वेदातील पुरातन ग्रंथांमध्ये ह्यासाठी अर्जुनसालीचा उपयोग सांगितला आहे. रक्तपित्त आणि रक्त विकारामध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो. ह्याशिवाय वेगवेगळ्या औषधी वापरता येतील. अर्जुनसाल, ज्येष्ठमध प्रत्येकी ५ ग्रॅम, मंजिष्ठा, रक्तचंदन, नीम, अनंतमूळ, नागरमोथा, तुळस प्रत्येकी २ ग्रॅम मिश्रण करून त्वचेवर लेप लावावा.

पोटात घेण्यासाठी वैद्याच्या मार्गदर्शनाखाली खालीलपैकी औषधे वापरावीत.

महामंजिष्ठादी काढा ४ चमचे  सकाळ, संध्याकाळ; त्रिफळा चूर्ण ५ ग्राम रात्री झोपताना; अभायारिष्ट ४ चमचे सकाळ, संध्याकाळ. 

ही औषधे कडू गुणधर्माची आहेत. ह्यात कडुनिंबाचा वापर करण्यात आलेला आहे. १२ व्या शतकात भावार्थ दीपिकेमध्ये कडूनिंबाचे महत्व वर्णन केलेले आहे व त्याच्या कडवटपणाला कंटाळू नये असे म्हटले आहे.

“जैसा निंब जीभे कडवटू | जै सुखालागी आपणयानं |

निंबाची आथी धनंजया | तै कडवटपणा तयालागी उबगिजे ना ||”

त्वचा सुंदर राहण्यासाठी दररोज उटणे लावावे. त्यात खालील द्रव्य वापरावेत.

चंदन ५० ग्रॅम, कचूर १० ग्रॅम, दारुहरिद्रा ३० ग्रॅम, बावची २० ग्रॅम, मुलतानी माती ५० ग्रॅम, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ २० ग्रॅम, तीळ २० ग्रॅम ह्या द्रव्यांचे सूक्ष्म चूर्ण करून डब्यात ठेवावे व दररोज स्नान करताना लहान बाळापासून आजी आजोबापर्यंत सगळ्यांनी लावावे. ह्या मिश्रणात आवश्यकते प्रमाणे १ ते २ चमचे तीळ तेल टाकावे. दररोज २० ग्रॅम पूड एका स्नानासाठी पुरते. सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी हे मिश्रण उपयुक्त आहे.

 

डोळ्याखालची काळी वर्तुळे :-

ह्या वर्तुळांसाठी दारुहरिद्रा २० ग्रॅम, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ १० ग्रॅम, मंजिष्ठा चूर्ण १० ग्रॅम ह्यांचे एकत्रित चूर्ण करून त्याची पेस्ट बनवावी व ती डोळ्याभोवती लावावी. हे मिश्रण एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. दररोज १० ग्रॅम चूर्ण पेस्ट बनवून वापरावे. पेस्ट बनविण्यासाठी लोणी, दुधावरची साय किंवा गुलाबजल वापरावे, हमखास गुण येतो.

चेहऱ्यासाठी त्वचा व अंगकांती सतेज होण्यासाठी

चंदन पावडर ५० ग्रॅम, दारूहरिद्रा ३० ग्रॅम, हळद २० ग्रॅम व काकडीचे जेल गरजेनुसार २ चमचे प्रत्येक वेळी त्वचेवर लावण्यासाठी वापरावे. हे मिश्रण (फक्त पावडर) एका काचेच्या बरणीत भरून ठेवावी व गरजेप्रमाणे अंदाजे २० ग्रॅम घेऊन त्यात १ चमचा तीळ तेल मिसळावे. १\२ कप दूध टाकले तरी चालते. हे मिश्रण हात, पाय, गळा, चेहरा ह्या ठिकाणी लावून २० मिनिटे ठेवावे. नंतर गार पाण्याने धुवावे. ४५ दिवसापर्यंत हा उपचार केल्यास कांती सतेज होऊन सौंदर्य प्राप्त होते.

 

दातांच्या आरोग्यासाठी :-

संहिता ग्रंथांमध्ये दातांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या वनस्पती वर्णन केलेल्या आहेत. त्यात बाभूळ, खैर, डाळिंब, अर्जुन, जेष्ठमध, त्रिफळा ह्यांची पावडर दररोज दंतधावनासाठी वापरावी. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास सकाळ संध्याकाळ जेवणानंतर त्रिफळाचूर्णाने गुळण्या कराव्यात व तोंड स्वच्छ धुवावे. 

हिरड्यातून येणाऱ्या रक्तासाठी :-

नीम पावडर १० ग्रॅम, काळे मीठ ५ ग्रॅम, त्रिफळा २० ग्रॅम, लोध्र २० ग्रॅम एकत्र करून ठेवावे व  त्याने हिरड्याला हळूवार मसाज करावा.

 

स्मरणशक्तीसाठी आयुर्वेदोक्त औषधे :-

स्मरणशक्तीसाठी पुरातन काळापासून खालील दिव्य औषधींचा उपयोग केला जातो. ह्या औषधाचा वापर मी गेल्या २० वर्षापासून करीत असून ह्याच्या वापराणे मुलाचा बुध्यांक वाढण्याचे प्रमाण आश्चर्यकारक आहे. ह्यात शंखपुष्पी, ब्राह्मी, अश्वगंधा, शतावरी, ज्योतिष्मती ह्या औषधी बुद्धीवर्धक आहेत. ह्या औषधीच्या वापराने स्मरणशक्ती उत्तम राहते, बुद्धीचे जाड्य नष्ट होते. ह्यात आयुर्वेदाच्या पुरातन शास्त्रात वर्णन केलेले श्लोक सर्वांना नोंद घेण्यासारखे आहेत.

“मण्डूकपर्ण्य: स्वरस: प्रयोज्य, क्षीरेण यष्टिमधुकस्य चूर्णम |

मेध्यानिच एतानि रसायनानि, मेध्या विशेषण च शंखपुष्पी ||”

“शंखपुष्पी सरा मेध्या वृष्या मानस रोगहत् |

रसायनी कषायोष्णा स्मृतीकान्ति बल प्रदा ||

 

महिलांच्या आरोग्यासाठी :–   

आपले बाळ निरोगी व सुदृढ व्हावे असे वाटत असल्यास गरोदर राहण्यापूर्वी व गरोदरपणात खालील तक्त्यातील औषधे दर महिन्यात वापरावीत. ह्यामुळे गर्भाशय शुद्ध राहतो व “ शुद्ध बीजापोटी, फळे, रसाळ गोमटी” ह्या उक्तीप्रमाणे गर्भातील बाळाची कांती, वजन, प्रतिकार क्षमता वाढते व निरोगी, आनंदी मनाचे व्यक्तिमत्व जन्माला येते.

पुढील औषधे प्रत्येकी दोन ग्राम भरड एकत्र करून काढा करावा व खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा.

पहिल्या महिन्यासाठी – यष्टिमधू, सागाचे बी, क्षीरकाकोली, देवदारु ;  

दुसऱ्या महिन्यासाठी – आपटा, तीळ, पिंपळी, मंजिष्ठ, शतावरी ;

तिसऱ्या महिन्यासाठी – बांडगुळ, क्षीरकाकोली, गहूला, उपसरी  ;

चौथ्या महिन्यासाठी – अनंतमूळ, उपळसरी, रास्ना, भारंगमूळ, यष्टीमधू  ;

पाचव्या महिन्यासाठी – रिंगणी, डोरली, शिवण, वटांकुर व वड साल ;

सहाव्या महिन्यासाठी – पीठवण, चिकणा, शेवगा, गोखरू, ज्येष्ठमध ;

सातव्या महिन्यासाठी – शिंगाडा, कमलतंतू, द्राक्षा, नागरमोथा, यष्टीमधू, साखर ;

आठव्या महिन्यासाठी – कवठ, डोरली, बिल्व, पडवळ, उस, रिंगणी यांच्या मुळांनी सिद्ध दूध ;

नवव्या महिन्यासाठी – सारिवा, अनंता, शतावरी व यष्टिमधु ;

दहाव्या महिन्यासाठी – शतावरी, यष्टिमधु, सुंठ व देवदार

 

प्रा. डॉ. सुभाष मार्लेवार

(आयुर्वेद वाचस्पति)