व्यक्तिविकासाचे विज्ञान आणि अध्यात्म

सामान्य माणसाला काम-क्रोधादी मनोविकार नाहीसे करून मन निर्विकार व शुद्ध करणे अशक्यप्राय आहे. म्हणून हठयोगात सांगितल्याप्रमाणे शरीरापासून सुरुवात करून मग मनापर्यंत आध्यात्मिक प्रवास करणे हे अधिक सुलभ आहे. ‘शरीर हे आत्म्याचे निधान आहे’, देह देवाचे मंदिर होय इत्यादी वचने प्रसिद्ध आहेत. देहाचे महात्म्य सांगणारी अनेक वचने सांगितली जातात. या वचनातदेखील भारतीय तत्वज्ञानाची छाया पडली आहे. चैतन्य किंवा आत्मा हा प्रधान स्थानी, देह हा दुय्यम स्थानी मानलेला आहे. तरीपण या मनोकायिक माध्यमाचे महत्व कमी होत नाही. देवाइतके महत्वाचे नसले तरी देवाचे वास्तव्य त्यात आहे.

meditation2

जीवनाचे दोन अंग आहेत. दोन प्रकारची तथ्ये आहेत. एक तथ्य असे असते की ते आधी जाणून घ्यावे लागते आणि मग त्यावर अंमल करणे. दुसरी अशीही तथ्ये आहेत की जी आधी अमलात आणली तरच ती जाणून घेता येतात. यात अंमल करणे आधी आहे आणि जाणून घेणे नंतर.

विज्ञान हे पहिल्या प्रकारचे अंग आहे. धर्म दुसऱ्या प्रकारचे अंग आहे. विज्ञानात प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते अंमलात आणता येते. धर्मात प्रथम अंमल करावा लागतो. तरच ते नंतर जाणून घेता येते. विज्ञानात ज्ञान प्रथम आणि कर्म नंतर, धर्मात कर्म प्रथम आणि ज्ञान नंतर. विज्ञान ही बहिर्यात्रा आहे. बाह्य जगताशी त्याचा संबध आहे. धर्म ही अंतर्यात्रा आहे. आंतरिक जगताशी संबधित आहे.

ते नीट लक्षात घ्या की, आपण कराल तरच समजून घ्याल. तुम्ही असा विचार कराल की आधी जाणून घेऊ, मग करू, तर तुम्ही ते कधीच करू शकणार नाही. काही असे असते की जे करण्याआधी जाणून घेताच येत नाही. जीवनात जे खोल आहे, अंतरमय आहे, आत आहे, ते केल्यानेच जाणता येऊ शकते.

प्राणशक्ती

व्यक्तिमत्व या संस्थेच्या आधुनिक मानसशास्त्राने केलेल्या निरनिराळ्या व्याख्यांपैकी एक ‘व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तनविशेष, अभिरुची, मनोवृत्ती, कृती क्षमता व गुणविशेष यांचा वैशिष्ट्यपूर्ण संगत’. योगसाधकाच्या व्यक्तिमत्वाचे पैलू

वपु : कृशत्वम् वदने प्रसन्नता ।

नादस्फुटत्वम् नयनेसुनिर्मले

अरोगता बिंदुजयोग्निदीपनम् ।

नाडीर्विशुद्धीर्हठयोग लक्षणं ।।   

अशा शब्दात हठ प्रदिपिकेनेही वर्णन केले आहे. सडपातळ बांधा, प्रसन्न वदन, मधुर भाषण, निर्मल डोळे, पूर्ण आरोग्य, विवेकी, अंगोपांगी तसेच नसा-नसाठायी निखळ पावित्र्य अशी लक्षणे सांगितली आहेत. त्यात सांगितलेली नाड्यांची शुद्धी ही मात्र काहीशी खास व वेगळी बाब आहे. नाडी ही संज्ञा शरीरातील प्राणशक्तीच्या चलनवलनाच्या सूक्ष्म स्वरूपाच्या माध्यमास वापरली आहे. नाडी संस्थेवर चित्ताच्या आविष्काराचा प्रभाव असतो. नदीबाबतचा हा फरक सोडल्यास ही लक्षण वैशिष्ट्ये आधुनिक मानसशास्त्राने सांगितलेल्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या पैलूशी मिळतीजुळती आहेत. पैलू व वैशिष्ट्ये या दोहोंमध्ये योगाच्या अंतरंग तसेच बहिरंग अशा दोन्ही अंगाचा समावेश आहे आधुनिक शरीरविज्ञानशास्त्र ‘संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या स्थूल माध्यमास चेता, नसा व मज्जातंतू म्हणून संबोधते. चेता या संज्ञेत चैतन्य अभिप्रेत आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनव्यवहारात तिची व्याप्ती स्थूल शरीर मनापलीकडे जात नाही. त्यामध्ये मानवी अस्तित्वाच्या तिन्ही पातळ्यांचा समावेश होत असतो. व्यक्तिमत्वाच्या पोषणाबाबतचा विचार करताना आपली दृष्टी या तिन्ही पातळ्यांना व्याप्त करण्याइतकी विशाल असल्याशिवाय योगसाधनेच्या प्रगतीची योग्य दिशा योग्य राहत नाही.

व्यक्तिमत्व विकासात प्राणशक्तीचा उपयोग होत असतो. आहार-विहार-प्राणायाम-कुंडलिनी जागृती या प्रत्येक घटकाचा व्यक्तीच्या जडणघडणीत समावेश असतो. प्रकृती स्वास्थ्याबाबत आहाराचा उपदेश व्यक्तिमत्व विकासात मदतरूप होण्यासारखा आहे. त्यासंबंधात काही सूत्रे, अर्थासह-

१) विदिविहितमन्नपानम् प्राणिनाम् प्राणमाचक्षते कुशलः।

– प्राण्यांचा अन्न हाच प्राण आहे. स्वस्थ राहण्यासाठी त्यांना अन्नाची आत्यंतिक जरुरी असते.

२) आहाग्निः पचती दोषानाहारवर्जितः ।

धनीन क्षीणेशु दोषेषु जीवितम् धातु संक्षये ।।

– प्राणाची अनुवृत्ती चालू राहण्यास आपणास अन्नाची आत्यंतिक जरुरी असते. तसेच जीवनास अंतराग्नीचीही आवश्यकता असते.

– आहाररुपी इंधन अग्नीला मिळाले नाही तर अग्नी टिकणार नाही.

३) ‘बलमारोग्यमायुश्च प्राणश्चाग्नौ प्रतीष्ठितः।’

– माणसाचे बल, आरोग्य अ आयुष्य हे अग्नीवर अवलंबून असतात.

४) ‘षड्ररसम् मधुरप्रायम् अग्नियात् नित्यं सर्वसाभ्याम् ।

– सर्व रसात मधुर रसाचे नित्य सेवन व्हावे याच संदर्भातील एक उपनिषिदीक उपदेश असा आहे,

‘जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म।।’

अन्न हेच जीवनासाठी पूर्णब्रह्म असून ते फक्त पोट भरण्यासाठी नसून यज्ञकर्म विधायक वा पुण्यकर्म आहे.

सप्तचक्रे –

प्राणायाम अभ्यासामुळे आसनस्थैर्य प्राप्त होणे आवश्यक आहे. कारण प्राणायाम इकडे-तिकडे हिंडत फिरत करता येईल असे अंग नाही. तसे करण्याचा प्रयत्न केला तर अपाय होतो. शारीरिक हालचाल झाल्यानंतर श्वास-प्रश्वासांची गती वाढते. वाढलेल्या श्वास-प्रश्वासांचा निरोध करणे म्हणजे निसर्गविरुद्ध आचरण करणे होय. आसनजय झाल्यावर श्वास आणि प्रश्वास यांच्या स्वाभाविक गतीचा विच्छेद म्हणजे तिचे नियंत्रण करणे हा प्राणायाम होय. प्राणायाम कसा करावा हा लेखाचा विषय नसल्यामुळे वाचकांनी इतरत्र संदर्भ बघावेत किंवा योग्य गुरूच्या सान्निध्यात प्राणायाम शिकून घ्यावा. प्राणायामामुळे मन एकाग्र होते. सत्वगुण वाढतो. मन प्रसन्न होते, इंद्रिये आपल्या स्वाधीन राहू लागतात. आत्मतत्वाचा साक्षात्कार होण्याची पात्रता येते.

kundalini

कुंडलिनी जागृत महत्व

प्राणायामामुळे चित्तातील रज व तमोगुण कमी होतात व शरीरातील वासना कमी होतात. चित्तातील सत्वगुणाचा ‘प्रकाशकर्ता’ हा गुण अधिकाधिक प्रगट होऊ लागतो. मग इंद्रियांची विषयाकडील ओढ कमी होऊन शरीरातील सप्तचक्र जागृत करण्याची पात्रता मनुष्यात येते. शरीरातील ७ नाडीचक्रे प्राणायामाने जागृत होतात. कुंडलिनी नावाची अतिधाय श्रेष्ठ शक्ती या चक्रात प्रसुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी जागृतीमुळेच प्रज्ञेचा उदय होतो. प्रज्ञा म्हणजे वास्तुमात्रेचे प्रकर्षाने व उत्कटतेने ज्ञान होणारी बुद्धी. या बुद्धीचा व्यक्तिमत्व विकासात त्या त्या व्यक्तीला फायदा होतो. परंतु या प्रज्ञेचा उपयोग सिद्धी प्राप्तीसाठी करू नये. कुंडलिनी जागृतीमुळे अनेक चमत्कार दिसू लागतात. साधकाला दिव्य शब्द, स्पर्श, रस, रुप, गंध इत्यादीचा लाभ होत असतो. व्यक्तीची इच्छित ध्येयापर्यंत मजल जाते. कुंडलिनी जागृतीसाठी भस्रिका, सक्रीय ध्यान इत्यादी वर्णन केले आहे. कुंडलिनी जागृतीचा लाभ वर्णन करत असताना एखाद्याचे मन जिंकण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजेच व्यक्तिमत्व लोभस होते. ऋतंभरा प्रज्ञेचा उगम होतो. या प्रज्ञेच्या सहाय्याने साधकाला अतीसूक्ष्म भूमिकावर आरूढ कसे व्हावे, निर्णय कसा घ्यावा, मार्ग कसा शोधावा याचे ज्ञान आपोआप होते. इंद्रिये अंतर्मुख होतात. कसलाही विक्षेप न येता चित्त एकाच परिणामवस्थेत टिकून राहते.

शरीर, प्राण, मन व आत्मा यांचा नित्य व अतूट संबंध म्हणजेच जीव. शरीराची शक्ती, प्राणशक्ती व मनःशक्ती या एकमेकांवर अवलंबून असतात व एका शक्तीचे दुसऱ्या शक्तीत रुपांतर करणे शक्य असते. आपले मन चिंतेने ग्रासलेले व अस्थिर असले तर आपल्या श्वासाची नाडीची गती वाढते व मन शांत असले तर श्वास व नाडीची गती कमी होते. याउलट झोपेत शरीर विश्रांती घेत असताना श्वासाची व नाडीची गती कमी होते. धावताना किंवा कष्टाचे काम करताना श्वासाची व नाडीची गती वाढते. शंकराचार्यांनी ध्यानाने मन नियंत्रित करून श्वास व नाडीची गती कमी करावी म्हणजे समाधी अवस्थेत आपोआप कुंभक साधेल असे सांगितले आहे. याउलट हठयोगाने प्राणायामाने श्वास नियंत्रित करून मन नियंत्रित करावे म्हणजे कुंभक अवस्थेत समाधी लागेल असे सांगितले आहे.

सामान्य माणसाला काम-क्रोधादी मनोविकार नाहीसे करून वर सांगितल्याप्रमाणे सुरुवात करून मग मनापर्यंत अध्यात्मिक प्रवास करणे हे अधिक सुलभ आहे.

आत्मसुख

‘शरीर हे आत्म्याचे निधान आहे’, देह देवाचे मंदिर होय इत्यादी वचने प्रसिद्ध आहेत. देहाचे महात्म्य सांगणारी अनेक वचने सांगितली जातात. या वचनातदेखील भारतीय तत्वज्ञानाची छाया पडली आहे. चैतन्य किंवा आत्मा गज प्रधान स्थानी, तर देह हा दुय्यम स्थानी मानलेला आहे. तरीही या मनोकायिक माध्यमाचे महत्व कमी होत नाही. देवाइतके महत्वाचे नसले तरी देवाचे वास्तव्य त्यात आहे. म्हणून तरी देहाचे महत्व, माहात्म्य व पावित्र्य कमी होऊ नये. हिरा लाख मोलाचा असतो, पण त्याचे कोंदणदेखील तितक्याच मोलाचे असते. राजाचा राजवाडा तितक्याच तोलामोलाचा असतो. तसेच देहाचे आहे.  मानवरुपी मनोकायिक रचना हे पवित्र आत्म्याचे वसतीस्थान आहे. या रचनेद्वाराच आत्म्याचे स्वरूप प्रगत होते. आपण आत्मा जेवढा पवित्र मानतो तेवढाच देह पवित्र मानला पाहिजे. आत्म्याची जपणूक जितकी महत्वाची तितकी जरी नाही तरी त्याच्या खालोखाल या मनोकायिक साधनाची जपणूक होणे आवश्यक आहे. चैतन्याला स्थूल रुपात प्रभावाने प्रकट करण्याचे सामर्थ्य केवळ मानवी शरीरातच आहे.

प्राण, आत्मा, चैतन्य, जीवनतत्व, लिव्हिंग फोर्स, एलन व्हायटल इ. अनेक संकल्पनांनी या आत्मतत्वाला संबोधले जाते. भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे आत्मा हा अमर, नित्य, निराकार, अकर्ता, अनंत व अपरिणाम असा मानला आहे.

नैनं छिन्दानी शस्त्राणिं, नैनं दहति पावकः (गीता २/२३)

शस्त्रांनी त्याला तोडता येत नाही, अथवा अग्नी त्याला भस्म करू शकत नाही असे आत्म्याच्या अनंत रूपाचे श्रीमद् भागवत गीतेत वर्णन केले आहे.

‘अजो नित्यः शाश्वतोsयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे’ (गीता २/२०)

तो अजन्मा नित्य, अनंत, पुराणपुरुष आहे. जरी शरीराचा नाश करता आला तरी आत्म्याचा नाश होत नाही. याठिकाणी शरीर हे आत्म्याच्या वस्त्राप्रमाणे मानले आहे. आत्मा जीर्ण शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे म्हटले आहे. शरीर व आत्मा याविषयीच्या संकल्पना मान्य करूनसुद्धा शरीराचे महत्व कमी मानता येत नाही. आत्म्याचे प्रतिबिंब बुद्धी, मन, शरीर या माध्यमातूनच व्यक्त होते यात कोणताही संदेह नाही. शरीर नसेल तर आत्म्याचे अस्तित्व असून-नसून सारखेच होईल.

योगी असो किंवा भोगी असो, मुमुक्षु असो वा सुखेच्छू असो, स्वस्थ असो वा मनोकायिक साधनाशिवाय, निरोगी शरीराशिवाय तुमचे इच्छित ध्येय कधीच पूर्ण होणार नाही. त्याकरिता मनोकायिक आरोग्याचा पाया पक्का केला पाहिजे.

– डॉ. सुभाष मार्लेवार,

पूर्व प्रसिद्धी – साप्ताहिक विवेक – जुलै २००९

***********************