अंतर्गाम्य – ‘जिवंता’चीच पूजा करा

शास्त्रं ही तुमच्याबाबत संकेत आहेत की, तुम्ही नव्या गुरूचा शोध घ्या, अन् शास्त्रं म्हणजे या गोष्टीचाही संकेत आहेत की जुन्या गुरूपासून मुक्त कसं व्हायचं. अन् शास्त्राचंही स्वत:चं असं शास्त्र आहे. व्यवस्था आहे. त्या पाऊलखुणा आहेत. त्यांच्या दिशांचा जर तुम्ही नीट उपयोग करून घेतलात तर तुम्ही बरंच काही प्राप्त करू शकाल. नवं शोधून काढाल. जुन्यातून मुक्त व्हाल अन् जुन्याशी जोडलेलं राहण्याचा हाच मार्ग आहे. सतत नव्यात प्रवेश करण्याचा हाच मार्ग आहे. मग कृष्णाशी तुमचं नातंही तुटणार नाही. नाही तर प्रेताशी तुमचं नातं जुळून राहील अन् जीवनाशी तुटून जाईल. तुम्ही ज्योत संपून गेलेल्या दिव्याची पूजा करीत राहाल अन् दुसऱ्या दिव्यात जळत असलेल्या ज्योतीकडे तुम्ही पाठ करून असाल!

पूजा दिव्याची थोडीच होते, पूजा तर ज्योतीची होते. म्हणून जेव्हा तुमचा दिवा विझून जाईल. तेव्हा तुम्ही हा आग्रह नका धरू की, मी तर याच दिव्याची पूजा करेन. मग तुम्हाला या गोष्टीचा तर विसरच पडलेला असेल की तुम्ही ज्योतीचीच पूजा करायला आला होतात. दिव्याची नव्हे. हो, दिव्याचीदेखील पूजा झाली होती. पण ती ज्योतीसाठी तेव्हा ती ज्योत संपून गेल्यावर मग आता त्या दिव्याचं… मग तो कितीही भारी असो. हिऱ्यामोत्याचा असो. सोन्याचा असो – त्याचा काय उपयोग?

अन् जर तो दिवा चाणाक्ष असेल… असायलाच हवा. नाही तर मग त्यात ज्योत असणार नाही… तर तो तुमच्यासाठी संकेत ठेवून जाईल. अशासाठी की तुम्ही पुन्हा पुन्हा ज्योत शोधून काढावी… मग ती ज्योत कुठेही जळो. कुठल्याही दिव्यात… त्याचं रंगरूप वेगळं असेल. माती वेगळी असेल. तो दिवा सोन्याचाही असेल. धातूचा असेल. तो कशाचा तयार झाला असेल काही सांगता येणं शक्य नाही. पण ज्योत तर तीच असेल.

शास्त्र ही ज्योत ओळखण्याची युक्ती आहे. मोलाची आहे. पण जर तहान असेल तरच तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल अन् जर तहान नसेल तर ते तुमच्या उरावरचे ओझं ठरेल.

अनेक लोक तर शास्त्राच्या ओझ्यानेच मरून जातात. खूप थोडेसे लोक शास्त्राचा उपयोग करू शकतात.

लोक मला विचारतात की, आपण गीतेचे स्पष्टीकरण का करता आहात. गीतेवर का बोलता आहात? तर ते याचसाठी की तुम्ही ती उमगण्याचा प्रयत्न केलात, तर ती अगदी सरळसोपी आहे. तिच्यात काहीही अडचण नाहीये.

मी तुम्हाला गीता समजावतो आहे. ते अशासाठी की, कृष्णाची सूत्रं तुमच्या लक्षात यावी अन् तुम्ही उरावर गीतेचं ओझं वाहत राहू नये. तिचा बाण तुम्हाला दिसावा की पुढे जायचं आहे. ‘जिवंत’ शोधायचं आहे.

‘जिवंता’चीच पूजा करा. मृताची पूजा करू नका. कारण ‘जिवंत’ असलेल्यातच तुम्ही त्याला शोधून घ्याल – ज्याची पूजा तुम्ही मृतात केली असती अन् ज्याला तुम्ही कधी प्राप्त करू शकला नसता.

 

वैद्य सुभाष मार्लेवार

एम.डी. (आयु.)