योगमहर्षि पतंजली

भारतीय ज्ञानपरंपरेत पतंजली ऋषींना विशेष स्थान आहे. योग, व्याकरण आणि वैद्यकशास्त्र या तीन क्षेत्रातील त्यांचे कार्य अलौकिक समजले जाते. त्यांना नृत्य, संगीत या विषयातही चांगली गती होती. पतंजली एक प्रकांड पंडित आणि महान विद्वान होते. त्यांच्या प्रतिभेची झेप अफाट होती…

 

भारतीय ज्ञानपरंपरेत ज्या महान प्राचीन ऋषीमुनींनी प्रगाढ तत्वज्ञान निरुपले ते सर्व पूर्णतः निरिच्छ असल्याने त्यांनी आपल्याविषयीची कोणतीही माहिती नमूद करून ठेवलेली नाही. योगसुत्रांचे भाष्यकार पतंजली मुनी यांच्याबाबतीत हीच गोष्ट लागू होते.

पतंजलींप्रती आदर व्यक्त करणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे.

योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन l

योSपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलीं प्राजलिरानतोSस्मि ll

आबाहू पुरुषाकारं, शंखचक्रासी धरीणाम् l

सहस्र शिरसं श्वेतं, प्रणयामि पतंजलीं ll         

याचा अर्थ, चित्तशुद्धीसाठी योग, वाचाशुद्धीसाठी व्याकरण आणि शरीरशुद्धीसाठी वैद्यकशास्त्र देणाऱ्या मुनीश्रेष्ठ पतंजलींना माझा नमस्कार असो. ज्यांचे कंबरेखालील शरीर मनुष्यरुपी आणि कमरेखालील शरीर सर्परुपी आहे व ज्यांनी हातात शंख, चक्र व असि धारण केली आहे त्या सहस्रशीर्ष असलेल्या शेषावतारी पतंजलींना माझा नमस्कार असो.

पतंजलींच्या जन्माबाबत आख्यायिका

पतंजलींच्या जन्माबाबत एक अर्थगर्भ आख्यायिका सांगितली जाते. १९व्य शतकात रामचंद्र दीक्षित यांनी लिहिलेल्या ‘पतंजली चरितम’ या काव्यात त्याचा उल्लेख सापडतो.

एकदा भगवान शंकरांनी सर्व देवांना आपले तांडव नृत्य पाहण्यास बोलावले. ते पाहताना भगवान विष्णूंचे अंग जड झाले. विष्णू ज्या शेषावर शयन करतात त्या शेषाला हा फरक जाणवला. त्याने कारण विचारले तेव्हा विष्णू म्हणाले की, नृत्यातील एकाग्रता व तल्लीनतेमुळे तसे घडले. तेव्हा शेषाने नृत्य शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली. विष्णूंनी त्याला सांगितले की, योग्य वेळी तुला पृथ्वीवर पाठवले जाईल. गौणिका नावाची एक योगिनी आपण जीवनभर अर्जित केलेले योगविषयक ज्ञान कोणाला द्यावे अशा विवंचनेत होती. ती ते ज्ञान सूर्याला अर्पण करणार होती. ती अर्घ्य देत असताना तिच्या ओंजळीतील जलात तिला एक छोटा सर्प दिसला. त्याने मनुष्यरूप धारण केले व ते ज्ञान आपल्याला मिळावे अशी तिला विनंती केली. तो सर्प म्हणजे शेष होता. तो अंजलीत पत झाला. ओंजळीत पडला म्हणून त्याचे नाव पतंजली असे पडले. त्याने त्या योगीनीकडून ज्ञान प्राप्त केले व ते जगासमोर आणले. त्यांनीच पाणिनीच्या व्याकरणावर महाभाष्य लिहिले. आयुर्वेदावर चरक संहिता लिहिणारे चरक म्हणजे पतंजली ऋषीच असावे असे मानले जाते.

श्रीविष्णूंनी सांगितल्याप्रमाणे पतंजलीन आपल्या पृथ्वीवरील कार्याचे स्मरण झाले. ते दक्षिणेतील चिदंबराच्या देवळात गेले. तिथे ते गुरूगृही राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महाभाष्य शिकवत असत. त्यांचा एक दंडक होता. ते अतुल तेजस्वी होते. शिष्यांना त्रास होऊ नये म्हणून ते पडद्याआड बसून शिकवत. एकदा कुतूहलापोटी विद्यार्थ्यांनी पडदा उचलला असता सर्व शिष्य त्यांच्या तेजाने भस्म झाले. एक शिष्य योगायोगाने बाहेर गेला असल्यामुळे वाचला. त्याच्यामार्फत व्याकरणाचे ज्ञान भर्तृहरीपर्यंत पोहोचले. भर्तुहरीने ‘वाक्यप्रदीप’ या ग्रंथात त्याचा उल्लेख केला आहे.

शेषावतारी प्रतिमा

पतंजलींची प्रतिमा सहसा सापडत नाही. महाराष्ट्रात पुण्याजवळ कोरेगावनजीक शेषावताराचे देऊळ आहे. तेथील मूर्ती या स्वरुपाची आहे. कंबरेखाली साडेतीन वेढे असलेला आणि डोक्यावर फणा काढलेला शेष म्हणजे पतंजली अशी ही मूर्ती आहे. हे साडे तीन वेढे म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती. ही मूर्ती साधकाला प्रकृतीच्या पलीकडे जायला शिकवते. पतंजलींची मूर्ती अध्यात्मिक. अधिभौतिक व आधिदैविक ताप दर्शवून योगतपाने त्यापासून मुक्त होण्यास सुचवते. योग, व्याकरण, आयुर्वेद याद्वारे चित्तशुद्धी, वाकशुद्धी व शरीरशुद्धी करून घेत कैवल्यप्राप्तीचे ध्येय गाठण्यास सांगते. डाव्या हातातील शंख साधनामार्गात येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्यास सुचवते. उजव्या हातातील चक्र संकटांपासून रक्षण करण्याचे आश्वासन देते. तलवार म्हणजे असि हे शूरत्वाचे प्रतिक असून ती साधनामार्गातील मुख्य शत्रू अहंकार याचा नाश करण्यास शिकवते. डोक्यावातील फणा हा सहस्रमार्गाचा निदर्शक असून योग ही जरी एकच साधनापद्धती असली तरी त्यातील साधना हजारो आहेत.

पतंजली योगसूत्रे

भारतीय वेद्ग्रंथात योगविषयक ज्ञान जागोजागी विशद केलेले आहे. भारतीय तत्वज्ञान सांगणाऱ्या सहा दर्शनापैकी योग हे एक दर्शन आहे. त्याचा विस्तार, उपनिषदे, हठयोग, घेरंड-शिवसंहितेत झाल्याचे दिसते. पतंजलींनी या ज्ञानची सूत्रबद्ध मांडणी केली. त्याला अष्टांग साधनेच्या चौकटीत बसवले. यम-नियमांचा तक्ता बनवला. त्यामुळे ज्ञान संपादनाचा मार्ग निश्चित झाला. विखुरलेले ज्ञान एका जागी संकलित झाले. ते प्राप्त करून घेण्याच्या पायऱ्या निश्चित झाल्या.

काहींना योग म्हणजे वृद्धावस्थेत, संसारापासून अलिप्त राहून, एकांतवासात जाऊन करायची साधना वाटते. काहींना तो एक व्यायामप्रकार वाटतो. तर काहींना ती स्नायूदुखीवरील उपचार पद्धती वाटते. काहींना प्राणायाम म्हणजे हृदयरोगावरील, श्वसनाच्या आजारासंबंधी उपचार पद्धती वाटते. पण योगाकडे इतक्या हलक्या आणि मर्यादित दृष्टीने पाहणे योग्य नाही. योग हे एक संपूर्ण शास्त्र आहे. ते शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घालून स्वतःचे व समाजाचे जीवन अर्थपूर्ण करणारे एक स्वतंत्र तत्वज्ञान आहे. आसने व प्राणायाम ही योगाची काही अंगे आहेत. ती म्हणजे योग नाहीत.

पतंजली ऋषींना त्यांच्या योगविषयक कार्याबद्दल विशेष ओळखले जाते. पतंजलींनी सूत्रबद्ध केलेली योगसूत्रे ही एक असामान्य कलाकृती आहे. कमीत कमी शब्दांत, चार पादात समाधी, साधना, विभूती आणि कैवल्य या चार प्रकरणात आणि १९६ सूत्रात एक पूर्ण शास्त्र मांडणे हे फक्त व्याकरणकार पतंजलीच करू शकतात. प्रत्येक शब्द अर्थपूर्ण व पुनरावृत्ती न करता योग्य ठिकाणी वापरणे ही किमया पतंजलीच करू शकतात. विभूतीपाद योग हा पतंजली स्वतः थोर विभूती होते हेच सिद्ध करतो.

योग हे शास्त्र भारतीयांना पतंजली ऋषींच्या आधीपासून माहित होते. महाभारतात व गीतेत त्याचा विपुल उल्लेख आढळतो. पतंजलींनी गीतेतील राजयोगाला हठ्योगाचा आयाम जोडला. त्याला तंत्रात्मक स्वरूप दिले व ते शास्त्र म्हणून क्रियारूप भाषेत बसवले. त्यासाठी सहाय्यभूत साधना म्हणून मानसिक पातळीवर अष्टांग साधना सुचवली. त्यामुळे गीता वाचून नेमके करायचे काय हा जो प्रश्न अनेकांना पडे तो सुटला.

चरक संहितेतील एक भाग पूर्णपणे योग या विषयावर आहे. चरक संहितेवर लिहिणाऱ्या चक्रपाणी दत्त यांनी चरक संहितेचे श्रेय पतंजली ऋषींना दिले आहे. ते त्याविषयी म्हणतात,

पतंजल्यं महाभाष्य चरकप्रति संस्कृतैः l

मनोक्काय दोषाणाम् हन्ति पतये नमः ll   

चरक म्हणजे हळूहळू जाणे. त्याचे दोन अर्थ आहेत. एक पूर्वी वैद्य गावोगावी जाऊन रोग्यांवर उपचार करत. दुसरा पतंजली हे शेषाचे अवतार असल्याने तो शब्द सर्पगतीकडे निर्देश करतो. भावप्रकाश या आयुर्वेदावरील ग्रंथात श्री विष्णुंची शय्या आणि आदिशेषाचा अवतार म्हणजे पतंजली असा उल्लेख आढळतो.

व्याकरणावरील महाभाष्य

व्याकरणाच्या क्षेत्रात पतंजलींनी महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथावर भाष्य आहे. व्याकरणाच्या क्षेत्रातील तज्ञ असे मानतात की, व्याकरणकार पतंजलींचा निवास सध्याच्या उत्तर प्रदेशात होता. त्यांचा काळ हा ख्रिस्तपूर्व दुसरे शतक हा होता. ते व्याकरणावर प्रवचने देत. त्यांनी पूर्वीचे नागकृपा किंवा आताचे नागकौन याठिकाणी सलग ८५ दिवस व्याकरणावर प्रवचने दिली. त्यांचे संकलन ८५ अंहिका असेलला महाभाष्य हा व्याकरणविषयक ग्रंथ होय.

वैद्यक शास्त्रातील योगदान 

वैद्यक शास्त्रात पतंजलींचे योगदान महत्वाचे मानले जाते. बंगाली साहित्यातील १६ व्या शतकातील कवी करकपादित्या यांनी पतंजलींनी मूळ चरक संहितेवर चरकपिठीका किंवा चरक साधना नावाचे भाष्य लिहिले असे सांगितले.

पतंजलींची समाधी

पतंजली ऋषींवर दक्षिण भारतही आपला हक्क सांगतो. दक्षिणेकडे पतंजली यांनी शैव परंपरेतील १८ सिद्धांपैकी एक मानले जाते. त्यांचा काल इसवी सन १० वे शतक मानला जातो. दक्षिण कैलास मानल्या जाणाऱ्या त्रिकोमल्लीतील कोनेश्वरन हे मंदिर त्यांचे जन्मस्थळ मानले जाते. त्यांनी आद्यगुरु नंदी यांच्याकडे योगाचे शिक्षण घेतले. दक्षिणी मान्यतेनुसार त्रीचीपासून ३० किमी दूर असलेले थिरूपथ्युर मंदिर म्हणजे पतंजलींची समाधी मानली जाते. याठिकाणी ब्रम्हाने १२ शिवलिंगे स्थापन केली व आपले तेज परत मिळवण्यासाठी शंकराची उपासना केली असे मानले जाते.

केवळ व्याकरण, योग, वैद्यकच नव्हे तर नृत्यविषयक क्षेत्रात पतंजलींचे ज्ञान असामान्य होते. नृत्यकलेवरील ग्रंथात पतंजलींचा उल्लेख आढळतो. काही मुद्रा पतंजलींच्या नावावर आहेत. थोडक्यात सांगायचे तर पतंजली हे एक प्रकांड पंडित होते. त्यांच्या प्रतिभेची झेप अफाट होती. त्यांना विविध विषयात गती होती. त्यांच्या ज्ञानगंगेत प्रत्येकाने न्हाऊन निघणे म्हणजे स्वतःचे जीवन धन्य करण्यासारखेच आहे !

************************