पातंजल योगसूत्रे

‘पातंजल योगसूत्रे’ हा महर्षी पतंजलींनी सिद्ध केलेला भारतीय योगपरंपरेतील एक महत्वाचा ग्रंथ आहे. कोणत्याही टप्प्यातील प्राथमिक योग करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘योगसूत्र’ समजणे आवश्यक आहे.

 

 ‘‘स्वल्पाक्षरम् असंदिग्धम् सारवत् विश्वतोमुखम्!’’

अर्थात कमीत कमी अक्षरात साराने युक्त अर्थाच्या प्रकटनासोबत साधकाला विषयाकडे अभिमुख करणारी रचना म्हणजे सूत्र होय.

माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात व भारतात २०० च्या वर योग संस्था कार्यरत असून या सर्व संस्थांशी माझा पत्रव्यवहार झालेला आहे. यात मुंबई येथील निंबाळकर यांची संस्था, लोणावळ्याची बी.के.एस.अय्यंगार यांची संस्था, दिल्ली येथील मुरारजी योग इन्स्टिट्युट तसेच भारत शासनाची जनकपुरी येथील योग संशोधन संस्था, नाशिक येथील मांडलिक यांची संस्था अशा अनेक संस्था देश-विदेशात कार्यरत आहेत म्हणून आपण आज जागतिक योगदिन साजरा करू शकतो. ही पातंजल ऋषींची कृपा आहे असे मला वाटते.

अधिक विवेचनात न जाता योगविषयक क्रिया सोडून पतंजलींच्या सूत्रांचा गाभा व त्याविषयीचे थोडक्यात विवेचन या लेखात आपण पाहणार आहोत. पतंजली योग्सुत्रात एकूण ४ पादासंबंधात वर्णन आढळते.

१) समाधीपाद – चिंतनाविषयीचे विवेचन

२) साधनापाद – साधनाविषयीचे विवेचन

३) विभूतीपाद – योगसाधनेतून प्राप्त होणाऱ्या सिद्धीचे वर्णन

४) कैवल्यपाद – यात मुक्तीविषयीचे वर्णन आहे.    

* समाधीपाद –

सामान्य जीवनातून योगिक जीवनाकडे जाण्याचा मंगलमय क्षण ‘’मंगल शासनम्’’

आता ‘अथ योगानुशासनम्’

‘अथ म्हणजे आता – योग म्हणजे एकत्रीकरण, अनुशासन म्हणजे शिकवण.

 योग निश्चितवृत्तिनिरोध: –

चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग. योगसाधनेमुळे साधक मनात उठणाऱ्या तरंगाना अलिप्त ठेऊ शकतो. अशा अनेक सूत्रांचे वर्णन समाधीपादामध्ये करण्यात आलेले आहे.

 ईश्वरप्रणिधानाद्धा l

ईश्वराला विनाशर्त समर्पण केले असताना चित्तवृत्ती निरोधावस्था साधणे शक्य होते. समाधीपादात यम, नियम, आसन, प्राणायाम या आठही अंगाना स्पर्श करणारी सूत्रे आहेत.

 * साधनापाद –

तप स्वाध्याय ईश्वरप्रणिधान या तीन महत्वाच्या क्रिया या अध्यायात वर्णन केलेल्या आहेत.

तपः स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि क्रियायोगःl

पूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी साधनेविषयीची तळमळ आणि त्यासंग हे तप होय. अभ्यासपूर्ण निरंतर धडपड म्हणजे स्वाध्याय अस्तित्वाप्रती विनाशर्त म्हणजे ईश्वरप्रणिधान.

तस्य सप्तधा प्रान्तभूमौ प्रज्ञा l

प्रज्ञा म्हणजे सर्वंकष ज्ञान. अवधानाच्या लक्षपूर्वक प्रवाहामुळे साधकाला सजगतेच्या सात अवस्थांचे ज्ञान होते.

१) देहाबद्दलची सजगता        

२) प्राणाबदलची सजगता

३) मनाबद्दलची सजगता

४) बुद्धीबद्दलची सजगता

५) शहाणपणाविषयीची सजगता (अनुभूत प्रज्ञा)

६) ऋतुंभरा प्रज्ञा (परिपक्व)

७) आत्म्याचे स्वरुपात स्थित होणे (आत्म प्रज्ञा)

याशिवाय अष्टांग योगाचे वर्णन साधनाप्रादामध्ये आहे.

यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोsष्टावद्रानि ll

* विभूतीपाद –

या पादामध्ये योगसाधनेद्वारा प्राप्त होणाऱ्या साफल्यतेविषयी वर्णन आहे. अंतरंगातील

विषयाबद्दल आणि ध्यान धारणेविषयी माहिती मिळते.

‘‘देशबन्धचित्तस्य धारणा ll’’

धारणा, अवधान व एकाग्रता धारण करण्याची प्रक्रिया, या एकाग्र अवधानासाठी अवश्य असणारा बिंदु देहाबाहेर अथवा देहांतर्गत कुठेही असू शकतो. 

‘‘तत्र प्रत्ययैकतानता ध्यानं ll’’

आधीच्या सूत्रात वर्णन केल्याप्रमाणे एकाग्र अवधान दीर्घकाळ टिकवले गेल्यास त्याचे रुपांतर ध्यानात होते. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये यापासून स्वतःला मुक्त करून जो साधक द्रष्टापर्यंत पोहोचतो त्याला थोडक्यात समाधी म्हणतात.

‘‘भुवनज्ञानं सूर्ये संयमात् ll’’

‘‘चन्द्रे ताराव्यूहज्ञानम् ll’’

‘‘ध्रुवे तद्गतीज्ञानं ll’’

माझ्या मते ही तिन्ही सूत्रे अत्यंत गहन असून समजून घेण्यासारखी आहेत. सर्व विश्वे आपल्या शरीरात शिरोस्थानापासून पादतलापर्यंत अभिव्यक्त होतात. नाभीपासून वरच्या बाजूला सात चक्रे आहेत. अफाट पसरलेल्या विश्वाचे ज्ञान योग्याला प्राप्त होते. अलीकडे प्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ, खगोलशास्त्रज्ञ हे सुद्धा योगाच्या भाषेत दार्शनिक आहेत. यानंतरच्या सूत्रामध्ये देह आणि त्याच्या आंतरिक व्यवस्थेबद्दल पतंजली मांडणी करत आहेत. योगाच्या सहाय्याने योगतज्ञ एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करू शकतात. मंडणमिश्रा व शंकराचार्य यासंदर्भातील आपल्या सर्वाना माहिती असेलच.

 * कैवल्यपाद –

हा पाद योगज्ञानाचे अंतिम सर म्हणून मानला जातो. भावनिक आंदोलनापासून मुक्ती म्हणजे मोक्ष.

‘‘जन्मौषधिमन्त्रतपः समाधिजाः सिद्धयः ll’’

कैवल्यपादामध्ये हे सूत्र वर्णन केलेले दिसते. काही विशिष्ट मंत्रोच्चार स्वयंशिस्त यामधून साधकाला सिद्धी प्राप्त होते.

‘‘जातिदेशकालव्यवहितानामप्यानन्तर्य स्मृतिसंस्कार योरेकरूपत्वात् ll’’  

अनादी काळापासून वसत असलेले संस्कार सांप्रत जीवनावर कसे परिणाम घडवतात याचे वर्णन या सूत्रात आहे. शाश्वत जगात राहण्याच्या ओढीतून, महत्वाकांक्षेतून वासनांचा जन्म होतो. चित्तातील अविद्येचे जोपर्यंत खंडण होत नाही तोपर्यंत हे संस्कार संग्रहित राहतात.

या पादामध्ये चित्ताबद्द्लच्या अवस्थेचे वर्णन केलेले आहे. तीव्र आंतरिक तळमळीने केलेल्या योगसाधनेतून चित्ताची मशागत होते व चित्त शुद्ध होऊन ‘मी म्हणजे आत्मा नाही’ याची जाणीव साधकाला होते.

‘‘ततः कलेशकर्मनिवृत्ती ll’’

धर्ममेध समाधी संपन्न झाल्यानंतर दुःखाचा अंत होतो. वेदनादायक कृती व विचारांपासून योगी तटस्थ राहतो. कोणत्याही प्रकारचे क्लेश निर्माण होणार नाहीत याची काळजी योग घेत असतो. संतांनी वर्णन केलेली ‘आता उरलो उपकारापुरता’ अशी अवस्था जिवंत अवस्थेत लाभते त्यालाच कैवल्य असे म्हणतात. 

 

डॉ. सुभाष मार्लेवार,

एम.डी. (आयु.)

आयुर्वेद, योग, अध्यात्म समुपदेशक, मुंबई

मोबा. – ९८१९६८६२९९ 

 

(पूर्वप्रसिद्धी – महानगरी वार्ताहर, योग विशेषांक, जून २०१५)