महानुभाव : ईश्वरावतारांची सामाजिक कामगिरी

महानुभाव संप्रदाय हा महाराष्ट्राच्या परमार्थरुपी आकाशात उगवलेला एक तेजस्वी तारा आहे. उच्च वर्णाच्या वादपटू ब्राम्हण पंडितांपासून ते म्हाताऱ्या-कोताऱ्या अडाणी बाया-बापड्यापर्यंतच्या समाजाच्या सर्व स्तरातल्या मानवी जीवांना या ताऱ्याच्या प्रकाशाने परमार्थाची, ईश्वरकृपेच्या प्राप्तीची स्पष्ट वाट दाखवलेली आहे आणि या वाटेने प्रवास करून ते जीव कृतार्थ झालेले आहेत. हा संप्रदाय म्हणजे ईश्वर व जीव यांना जोडणारा सेतू आहे आणि या सेतूचा उपयोग करून असंख्य जीव तरून गेलेले आहेत. अशा या महानुभाव संप्रदायातील ईश्वरावतारांची सामाजिक कामगिरी कशी झाली हा आपल्या चर्चेचा विषय आहे.  त्यातही पाच अवतारांपैकी श्रीकृष्ण व श्री दत्तात्रेय या पहिल्या दोन अवतारांना आपल्या अवतारकक्षेच्या बाहेर ठेवायचे आहे. कारण सामाजिक कामगिरी हा विचार उदयास येण्यापूर्वीचे हे अवतार आहेत. पुन्हा या दोघांच्या सामाजिक कर्तुत्वाचे आलोचन करायचे तर त्याने एव्हढा मोठा प्रदेश व्यापला जाईल की तो एका व्याख्यानात समावेश करणे कठीणच. शिवाय श्रोत्यांच्या अपेक्षेच्या बाबतीत चांगदेव राऊळ, गोविंद्प्रभू व श्री चक्रधर स्वामी या तीन विभूतीच आहेत. तेव्हा त्यांच्या सामाजिक कामावर प्रकाश टाकूया. त्याआधीची पार्श्वभूमी थोडक्यात…


१. मोक्ष – जीवनाचे ध्येय

सामाजिक कामगिरी ही एक अशी वस्तू आहे की जी आपल्या देशातील नव्हे, आपल्या परंपरेतील नव्हे, ती बाहेरून पश्चिमेकडून आलेली आहे. प्राचीन काळी ती तिकडेही नव्हती. ही आधुनिकतेची निपज आहे. ती तिकडे आधी अविर्भूत झाली आणि मग तिकडून इकडे आली. प्रचीन काळी जीवनाच्या सर्व भागांवर धर्माची हुकुमत होती. धर्माचे अधिराज्य होते. धर्माला दोन अंगे होती. एक आडवे – सामाजिक, राजकीय आणि दुसरे उभे – पारलौकिक. पहिले व्यक्त तर दुसरे अव्यक्त. या दोहोंत अव्यक्तच मुख्य. कारण अव्यक्तातूनच व्यक्त प्रकट होते आणि ते पुन्हा अव्यक्तातच विलीन होते.
अव्याक्तादिनी भूतानि व्यक्त मध्यानि भारत
अव्याक्तानिधना न्येव तत्र का परिदेवना
अमृतानुभवामधल्या एका चरणाचे मला येथे स्मरण होत आहे. आमोद सुनास जालें. आमोद म्हणजे सुवास. हा अव्यक्त. त्याचा आस्वाद घेण्याकरिता तोच नासाच्या म्हणजे नाकाच्या रूपाने व्यक्त झालेला आहे. धर्मात अव्यक्त आणि व्यक्त यांचा समुचित संयोग आहे. म्हणूनच धर्मात जीवनाचा पूर्ण विचार आहे. मोक्ष हे मानवी जीवनाचे एकमेव साध्य आहे आणि धर्म हे त्याचे साधन आहे. मानवी जीवनाचे मोक्षाचे साध्य सफल करण्यास सहाय्य करण्यासाठीच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या लोकी अवतरलेले आहेत. सामान्य माणूस जन्माला येतो तो वासनेतून आणि वासनेसाठी. पण भगवंत अवतरतो तो करुणेतून आणि अविद्याग्रस्त जीवांचा उद्धार करण्यासाठी. त्यांच्यावर करुणा करण्यासाठी. करुणा हे परमेश्वराचे व्यसनच. ‘एथ जीव उद्धरीजेति हेची व्यसन.’ तो निरवयव निराकार परमात्मा कृपावश होऊन सावेव साकार होतो. करुणेपोटी मुमुक्षांना आपले सान्निधानी देतो. सान्निधानी असताना मुमुक्षु परमेश्वरी अवताराचे दास्य करतो. ते दास्य मोचक म्हणजे मोक्षदायक ठरते. इराणमध्ये अकराव्या शतकात ‘कीमियाए सआदत’ या नावाचा एक अत्यंत उच्च श्रेणीचा पारमार्थिक ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. इस्लाम धर्माचे जगप्रसिद्ध दार्शनिक मियां मुहफर गाजली साहब यांनी हा ग्रंथ रचलेला आहे. भगवंतांचे निरपवाद, निरपेक्ष, निस्सीम दास्य करणे, अखंड, उभा जन्म त्या दास्यातच राहणे, भगवंतांचा आश्रय, त्याचा आधार हेच जीविकेचे एकमेव साधन बनविणे हेच धर्माचे मुलभूत सार आहे असे या ग्रंथात म्हटले आहे. एकदा महम्मद पैगंबर ध्यानस्थ बसले होते. त्या ध्यानात त्यांना असे दिसले की साधना, तपस्या वगैरे काही न करता हजारो पुरुष अनायास मुक्तीपदाला जाऊन पोहोचले आहेत. त्यांनी विचारले, हे पुरुष कोण आहेत? तेव्हा आकाशवाणी झाली की, मंत्र, तंत्र, जादूटोणा या असल्या गोष्टीवर अजिबात विश्वास न ठेवता, त्यांचे सहाय्य न घेता, भगवंताचे दास्यम भगवंताचा भरोसा हेच ज्यांनी आपल्या जीवनाचे सारसर्वस्व मानलेले आहे. नव्हे आपले जीवनच मानलेले आहे असे हे पुरुष आहेत. जीवाला भगवंतांचे अव्यभिचारी, एकनिष्ठ, अखंड दास्य करणे आवडत नाही. भगवंताच्या कृपाशक्तीवर पूर्ण भरवसा ठेवायला तो तयार होत नाही. प्रभुचरणी संपूर्ण शरणागती त्याला साधत नाही, कारण सर्वज्ञ चक्रधर स्वामी सांगतात :
‘‘जीव स्वार्थपरु’’ : ईश्वरी जीव निल्लळ होती.’’
जीव आपल्या स्वार्थाचा, आपल्याला मिळवावयाच्या विषयानंदाचा विचार करित असतो. तो ईश्वराविषयी उदासीन असतो. श्री चक्रधर स्वामी आपल्या सान्निधानातल्या साधकाच्या, मुमुक्षाच्या जीवनात क्रांती घडवून आणतात. आमुलाग्र परिवर्तन घडवून आणतात. जसे परिवर्तन आरिस्टोटलच्या ट्राजेडीच्या नायकाच्या जीवनात साकार झालेले दाखवलेले असते. आरिस्टोटलने त्यासाठी पेरीपीटीआ peripeteia हा ग्रीक शब्द वापरलेला आहे. इंग्रजीत त्याचे reversal of the situation, revarsal of fortune, revolution असे भाषांतर करण्यात आले आहे. मराठीत ‘पालट’ या सध्या शब्दाने हा अर्थ सुचवता येण्यासारखा आहे.  श्री चक्रधर स्वामी साधकाचे जीवन पालटवून टाकतात. त्यांच्या जीवनात revarsal of fortune घडवितात. revolution चा प्रकाश आणतात. ते जीवाला म्हणतात, विषयाचे सेवन केले नाही तर तु मरणार आहेस काय? तू जर विषयसुखाच्या आहारी जाशील तर तु अनंत तापांना आश्रय देशील. ती सुखे तुझ्या नरकाला कारणीभूत होतील.
‘‘विखो न सेवी तरी जीवु काइ गा मरतु असे ll
निरोध साहिलेया अधिका योग्यता होए : दक्षता होए ll
विषया अनंता तापसी आश्रयो नरकासी हेतु ll’’
ते त्याला सांगतात, आता तू आपले जीवन बदल, दृष्टी बदल, वृत्ती बदल, आवड बदल. ही कशी बदलायची ?
देवाची आर्ती होआवी :
विषयांची निवृत्ती होआवी : देहाची अनास्था होआवी.’’
‘‘विषयाचा संगु न करावा :’’
परधर्म हे तुझे जीवन आहे हे तु लक्षात घ्यावे. ‘परधर्म तुमचे जीवन की गा : ‘मुक्त होऊ इच्छीनाऱ्या जीवाच्या बाबतीत श्री चक्रधर स्वामींची अपेक्षा अशी आहे की, त्याने आपले समग्र जीवन परमेश्वरमय बनवून टाकावे. परमेश्वराजवळ संपूर्ण शरणागती ही त्याची नित्याची स्थिती असावी. केवढ्याही भीषण आपत्ती आल्या तरी ती स्थिती अभंग राहावी. स्वामी आदेश देतात,
‘‘कर्म: धर्म: विधी: विखो: परीत्यजौनि परमेश्वरा शरण रिगावे :’’
‘‘जीवें परमेश्वराधीन होआवें : जन्मजीवित परमेश्वरा देयावें :
धड तुटलेयाही जीवें परमेश्वरातें न सोडावें ll’’
डॉ. अ. ना. देशपांडे
(क्रमशः)
*********************
 

२.आधी आत्मसिद्धी मग समाजशुद्धी

जीवाच्या जीवनात जर अशी आत्यंतिक स्वरुपाची, पराकोटीची परमेश्वर शरणागती घडून आली तर त्याच्या जीवनात उद्भवणारे सर्व सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय प्रश्न संपून जातात. एकदा जीव पूर्णपणे परमेश्वराच्या अधीन झाला की त्याचा वेगळा सामाजिक, आर्थिक उद्धार करावा लागत नाही. पारमार्थिक उद्धार झाला की जीवाचा सर्वांगीण उद्धार होऊन जातो. त्याच्या जीवनातील सर्व समस्या सुटून जातात.
खरे म्हणजे परमेश्वराधीनता ही तरुणपणीच, ज्याकाळी विषय सुखाच्या आकर्षणाचा बहर असतो त्याचकाळी यावयास हवा. स्वामी म्हणतात, ‘‘जोची अवसरु विषया तोची ब्रह्मविद्येII’’ आधी परमार्थ सिद्धी मग तिच्या अलौकिक प्रकाशात जीवनसाधना. आधी आत्मज्ञान. जीवनाचे ध्येय जे मोक्ष त्याच्या सफलतेसाठी प्रथम त्याचे संपादन. ‘‘आत्मज्ञाने मोक्षु’’. मग त्या आत्मज्ञानाच्या दिव्या अधिष्ठानावर जीवनाची उभारणी.
लोकमान्य टिळक म्हणायचे, ‘‘आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवू. ते एकदा मिळाले की सामाजिक सुधारणा सहज येतील. जसा सुईमागून दोरा येतो तसा. यातून अध्यात्मिक अर्थाचा ध्वनीही काढता येण्यासारखा आहे. एकदा राज्य म्हणजे राजेपण हस्तगत झाले की, मग सगळे आपोआप मिळाले. जीवाच्या दृष्टीने आत्मा हा राजा आहे. तो प्राप्त झाला की सगळे मिळाले. हे राजेपद मिळवण्यासाठी जीवाला आपल्या जीवनाभोवतीचे सर्व ऐहिक, प्रापंचिक पाश तोडून टाकावे लागतात. त्यांच्या दृष्टीने मग,
‘स्वदेशसंबंधु त्याज्य : स्वग्रामसंबंधु त्याज्य :
संबधीयाचा संबंधु तो विशेषतः त्याज्य : II
त्याला पूर्णपणे ‘‘नीरसा : निराशा : निराश्रया होऊनी असावे’’ लागते. सर्वथा निस्संग व्हावे लागते.
डॉ. अ. ना. देशपांडे
(क्रमशः)
*********************

३. आधी ईश्वारीप्रेम मग समाजप्रेम

आधी ही निःसंग अवस्था. आधी ही संपूर्ण परमेश्वरधीनता. मागाहून अन्य साधनांचा, सुधारणांचा विचार. हाच क्रम योग्य. पण होते काय की, जगातले बहुतेक सर्व समाजनेते, राष्ट्रनेते हे वरचेवर लोकांना केवळ सदाचरणाचे धडे देत असतात. लोक सदाचरणी झाले की जीवनातल्या सर्व समस्यांवर मात करता येईल असे त्यांना वाटते. हा उलटा क्रम झाला. मागे घोडे आणि समोर टांगा ठेवल्यासारखे हे झाले. खरे म्हणजे एकदा का व्यक्तिगत जीवनात आणि पर्यायाने समग्र लोकजीवनात ईश्वराच्या प्रगाढ अ अभंग श्रद्धेने संपन्न असलेल्या त्याच्यावरील दिव्य, निर्मळ, शुद्ध प्रेमाचे रेज प्रकट झाले की तेथील दुराचरणाचा अंधार काहीही न करता आपोआप नष्ट होऊन जाईल. ईश्वरी श्रद्धा उत्पन्न करणे, ईश्वरी प्रेम निर्माण करणे म्हणजे जीवाच्या जाणिवेची, त्याच्या संज्ञाशक्तीची, त्याच्या Consciousnessची पातळी उंचावणे आहे. संज्ञाशक्तीचा Consciousness चा स्तर उंचावला की तो अपोआप नीतिमान होतो. जसे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, ‘‘जयाजिये लीळेमाजी नीती I जीयाली दिसे II’’
आधी ईश्वरसाधना मग सदाचार साधना याच क्रमाला ऋग्वेदानेही उचलून धरलेले आढळते. तेथे जो मंत्र आहे, तो आपण तुकड्या तुकड्यांनी पाहू.
ऋतस्य गोपा : ऋतू, सत्य, सदाचार यांचा रक्षक. सऋतू : चांगली कर्मे करणारा, दभाय न. अशा माणसाला कोणी दाबू शकत नाही. तो कोणाला भीत नाही. सः हरि अंत : त्याने आपल्या हृदयात त्रिजपवित्रा आदधे : तीन पवित्रता धारण केलेल्या असतात. स विद्वान – तो सर्वज्ञ प्रभू. विश्व भुवना, अभिपश्यति – सर्व लोकांना, धामांना, स्थानांना पहात आहे. तो अबजुष्टान, अव्रतान म्हणजे असेवनीय, असदाचारी अव्रतीना, कर्ते – अव विध्यत, गर्तेत, गड्ड्यात लोटून देतो. या मंत्रातला पारमार्थिक ध्वनी फार महत्वाचा आहे. ईश्वराचे सर्वव्यापित्व, त्याची सर्वज्ञता यातच सदाचाराचा उगम आहे. त्या न्यायकारी सर्वव्यापक सर्वज्ञ प्रभूची आपल्या प्रत्येक शारीरिक, मानसिक, बौद्धिक हालचालींवर नजर आहे, यावर ज्याचा विश्वास नाही तो मनुष्य सदाचारी होऊ शकत नाही. याच्या मुळाशी ईश्वराबद्दल भीती नाही. तर जर आपण ईश्वराच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्या आदेशाप्रमाणे वागलो तर आपले मंगलच मंगल होईल. आपले शाश्वत कल्याण होईल व त्याचे नित्यमधुर, निःस्वार्थ दैवी प्रेमही आपल्याला लाभेल अशी भावना आहे. तात्पर्य काय की फार प्राचीन कालच्या ऋग्वेदाच्या व अलीकडच्या काळातील महर्षी महेश योगींच्या सांगण्यानुसार सद्गुण साधना ही ईश्वर निष्ठेवर आधारली पाहिजे. ज्या God Consciousness ची एवढी महती गायलेली आहे तोच God Consciousness  जीवाच्या ठिकाणी उत्पन्न करण्यासाठी जीवाच्या अंतरंगात ईश्वरावरील श्रद्धेचे, प्रेमाचे, ईश्वराला अनुसरण्याविषयीच्या उत्कट तळमळीचे बीज रुजवण्यासाठीच श्री चक्रधरप्रभू अवतरले होते.
डॉ. अ. ना. देशपांडे
(क्रमशः)
*********************

४. आधी आत्मोद्धार, मग लोकोद्धार

बसल्या जागी लोकांचा, समाजाचा उधार करण्याची पात्रता येण्यासाठी जीवाला फार मोठा त्याग करावा लागतो. लौकिक जीवनातल्या सर्व आकर्षणावर, सर्व लोभ विषयांवर पूर्णपणे पाणी सोडावे लागते तेव्हा कोठे परमेश्वराच्या दरबारातले उच्च पद मिळू शकते. याबाबतीत श्रीचक्रधर स्वामींचा सिद्धांत परमार्थ सृष्टीत सर्वमान्य होण्यासारखा आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘लोकींचा श्रेष्ठ तो एथीचा नष्ट : एथीचा श्रेष्ठ तो लोकींचा नष्ट :’’ एथीचा श्रेष्ठ होण्यासाठी, त्याच्या मर्जीची खुर्ची मिळवण्यासाठी जीवाला आपला सगळं जन्मच त्याच्या चरणी अर्पण करावा लागतो. ईश्वरी कृपेचे सामर्थ्य काय आहे याचा मग त्याला अनुभव येऊ लागतो. म्हणून श्रीचक्रधर स्वामी जीवाला सांगतात, हे एक जन्म एथ दीजो कां II मा काइ होईल तें पाहिजो II, खरे असे आहे तरी काय ? कारण वस्तुतिथी – श्रीचक्रधर स्वामींनी लक्षात आणून दिलेली अशी आहे की, ‘‘हें सकळही देवांचे की : मा देवो दे तें आपुलें’’. हे सगळे जग, सगळी सृष्टी हे देवाचे आहे हे जीवाने आधी ओळखावे लागते. आधी आत्मोद्धार, मग लोकोद्धार. आहे आत्मसाधंना मग लोकसाधना. आधी ईश्वरी साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार, मग लोकांवर उपकार.
डॉ. अ. ना. देशपांडे
(क्रमशः)
*********************

५. आधी एकाकी, मग लौकिकी

भगवान महावीरांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. एकदा महावीर परिषदेत बसले होते. तेथे एक आजीवक उपासकाने त्यांना विचारले, ‘‘भन्ते ! आपण पूर्वी एकटे राहत होता आणि आता आपण परिषदेत राहता, तीत सहभागी होता, हा विरोधाभास नाही काय ?’’ महावीर म्हणाले, ‘एकांगी दृष्टीने पहिले तर विरोधभास आहे, पण अनेकांच्या दृष्टीने पहिले तर विरोधाभास नाही.’’ ‘‘हे कसे?’’ ‘‘साधनाकालात मी समाजात बाहेर एकटा राहत होतो. पण आत अंतरंगात, संस्कारांनी, विचारांनी भरलो होतो. संस्कारांची परिषदच माझ्या मनात भरलेली होती. आता मी एकटा आहे. पूर्णपणे संस्काररहित आहे. आधी एकांतात तयारी, मग लोकांतात कामगिरी. अगदी हुबेहूब असाच प्रकार श्रीचक्रधर स्वामींच्या चरित्रात घडलेला आहे. श्रीचक्रधर स्वामी म्हणजे पूर्वाश्रमीचा हरीपाल देव. भरवसच्या प्रधानाचा मुलगा. हा मेल्यावर त्याच्या शरीरर चांगदेव राऊळाने – ईश्वरावताराने प्रवेश केला. तेव्हापासून एकटे, एकाकी राहण्याची ओढ त्यांना निर्माण झाली होती. रामटेकला जावयाला निघाले. बरोबरच्या माणसांना झुकांडी देऊन त्यांनी एकटे राहण्याचा आपला निश्चय खरा केला. या एकाकी अवस्थेत भ्रमण करीत असतानाच सद्गुरूंची म्हणजे गोविंदप्रभूंची गाठ पडली. त्यांची कृपा झाली. गुरुकडून शक्ती स्वीकार केला. तेव्हापासून नागाम्बिकेची म्हणजेच बाइसाची भेट होईपर्यंत स्वामी एकटे, एकाकी, अत्यंत विरक्त अवस्थेत राहिले. बाइसाला प्रेमदान केल्यानंतर त्यांचा ‘एकांक’ काल संपला. त्यानंतर ते जीवांचा पारमार्थिक उद्धार करण्याचे अवतार कार्य करण्यासाठी प्रकट झाले. आधी विरक्ती, ज्ञानशक्ती पूर्णपणे अंगी बाणली. मग स्वामींची अध्यात्मिक पातळीवर सामाजिक कामगिरी सुरु झाली.
केवळ समाजसेवा केल्याने लोकोपयोगी कर्मांचा डोलारा उभारल्याने जीवनातले सर्वश्रेष्ठ श्रेय हस्तगत होत नाही. जीवनाची सर्वांगीण सांगता साधली जात नाही. मानवी जीवनाच्या अंतिम ध्येयावर म्हणजे मोक्षावर किंवा निर्वाणावर किंवा कैवल्यावर आपली दृष्टी सदैव स्थिर ठेवण्याचा ईश्वरी अवतारांनी वा संत महंतांनी सामाजिक कामगिरीला लोकांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय असे प्रश्न सोडवण्याला आपल्या अंगीकृत कार्यात अग्रस्थान कधीही, कोणत्याही काळात दिले नाही. उपनिषदांतून हीच भूमिका व्यक्त झालेली आहे. मुंडकोपनिषदातला हा मंत्र पहा :
इष्टापूर्तं मन्यमानां वरिष्ठं
नान्यत् श्रेयो वेदयन्ते प्रमूढा : ll
नाकस्य पृष्ठं ते सुकृते अनुभूत्वा
इमं लोकं हीनतर वा विशन्ति
याचा अर्थ असा की इष्ट म्हणजे यज्ञयागादी कर्मे आणि पूर्त म्हणजे विहिरी, सरोवरे, मंदिरे उभारण्याची लोकोपयोगी कर्मे हीच अत्यंत श्रेष्ठ आहेत असे मानणारे जे मूर्ख आहेत ते अशा कार्मांहून आणखी त्याहून काही श्रेयस्कर आहे हे जाणतच नाहीत. या कर्मांमुळे तज्जन्य पुण्यामुळे त्यांना स्वर्गातील सुखे भोगावयास मिळतात. पण ते पुण्य संचले म्हणजे त्यांना पुन्हा मनुष्यलोकी किंवा त्याहून हीन अशा कीटक योनीत जन्म घ्यावा लागतो. लोकांच्या उपयोगाची कामे केल्याने पुण्य मिळते. स्वर्ग मिळतो. पण ते पुण्य संपल्यावर माणसाचा अधःपात होतो हे येथे निःसंदिग्धपणे सांगितलेले आहे. त्यामुळे जीवाच्या अंतिम कल्याणाच्या दृष्टीने मानवी जीवनातले आद्य कर्तव्य ईश्वरी प्रेम संपादन वा मोक्ष वा निर्वाण वा कैवल्य हेच ठरते. आधी या आद्य कर्तव्याच्या पालनासाठी करावयाची साधना, मागाहून समाजाची, लोकांची, राष्ट्राची सेवा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत गाडगेबाबा हे लोकोपयोगी कर्मांना, उपक्रमांना प्राधान्य देणारे संत अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या शेवटच्या दिवसात मुर्तीजापुरचे श्री. नानासाहेक तिडके हर त्यांच्याजवळ होते. त्यांनी नानासाहेबांना विचारले, जीवनातील सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? बाबांचे एकंदर जीवितकार्य लक्षात आणून नानासाहेब म्हणाले, सगळ्यात महत्वाची गोष्ट जनसेवा. बाबा ताबडतोब म्हणाले, नाही. नाही. जीवनातील सगळ्यात महत्वाची गोष्ट ईश्वर भक्ती. बाबांनी नानासाहेबांना तोच प्रश्न परत विचारला आणि ईश्वरभक्ती हेच मानवी जीवनातले अग्रक्रमाचे, सर्वात महत्वाचे काम त्यांच्या मनावर बिंबविले.
तात्पर्य काय की, आधी एकाची उपासना, मग लोकांची, समाजाची, राष्ट्राची सुधारणा. त्या एकाच्या अनन्य उपासनेने अंगी नवेच, असामान्य स्वरूपाचे बळ येते आणि मग ते बळ आपोआप परमार्थनिष्ठ स्वरूपाच्या अनेक समाजोपयोगी उपक्रमाच्या रूपाने प्रकट होते. आत्मबळाचा, ईश्वरनिष्ठेचा आधार नसलेले समाजकार्य किंवा राष्ट्रकार्य म्हणजे बिनबुडाचे गाडगे किंवा बिनबुंध्याचे झाड. महात्मा गांधी राष्ट्र स्वातंत्र सिद्धीचे अपूर्व कार्य यशस्वी झाले, याला कारण त्या ईश्वरी निष्ठेचे भक्कम, अविचल अधिष्ठान होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हाच विचार निराळ्या भाषेतून मांडून असे म्हणता येण्यासारखे आहे की, कर्म हे ज्ञानानुगामी असावे. आधी ज्ञान, मग कर्म हा क्रम पाळावा. त्याने कर्माला मजबुती येते. त्याच्यात अलौकीकाचे तेज अवतरते. आणखीही निराळ्या शब्दांनी हा विचार सांगता येण्यासारखा आहे. अस्तित्व आणि व्यक्तित्व, बिंग आणि बिकमिंग. केवळ व्यक्तित्व. केवळ बेकमिंग निष्प्रभ, निरालंब, निराधार. व्यक्तिमत्वाच्या बेकमिंगच्या अविष्कारात अस्तित्वाच्या प्रभावाचा अमृतस्रोत अखंड वाहता असला पाहिजे. म्हणूनच तर श्री चक्रधरस्वामींच्या जीवाला स्पष्ट आदेश आहे की,
‘‘निरंतर परमेश्वराची आर्ति होआवी :
निरंतर परमेश्वराचा विरहो भाववा : ’’
चित-वित- काया ए तिन्ही परमेश्वरासी अर्पावी.’’
‘‘तुम्हां शयनासनिं : भोजनीं : परमेश्वरुची होआवा कीं गा.     
डॉ. अ. ना. देशपांडे
(क्रमशः)