व्यायामाचे महत्त्व जाणा!

व्यस्तता ही आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनली आहे. सकाळी अंथरुणातून उठल्यापासून रात्री अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत प्रत्येकजण काही ना काही कामात व्यस्त असतो. महिलांना घरकाम-जेवणाची, पुरुषांना कामाची तर मुलांना शाळा-कॉलेजची गडबड असते. या सगळ्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. नियमित व्यायामाने आरोग्य स्वाथ्य टिकवून ठेवता येते.
बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो. चाकरमान्या लोकांची जीवनशैली तर अधिकच गुंतागुंतीची असते. नोकरी – व्यवसायाचे ठिकाण घरापासून 50 कि.मी. पेक्षाही जास्त असते. त्यांचा वेळ येण्या -जाण्यातच जातो. घरापासून रेल्वे, रेल्वे स्टेशनपासून टॅक्सी किंवा रिक्षाचा प्रवास, रेल्वे प्रवासातील ढकला ढकली यातच दमछाक होते. रात्री घरी येण्याला 8-10 वाजतात, असे लोक म्हणतात की, आम्हाला व्यायामाची काय गरज आहे. पण हा व्यायाम नसून फक्त ओढाताण आणि दमछाक आहे. या दगदगीने व्यायामाचे फायदे साध्य होतील का? हा प्रश्नच आहे. शरीराची दमछाक ज्या क्रियेने होते, तो व्यायाम असा एक सार्वत्रिक समज आहे.
शरीरा – आयास – जननं कर्म व्यायाम उच्यते।‘ (अ.सं.सू 362)
ज्यांना आयुर्वेदाविषयी थोडीफार माहिती आहे. अशा व्यक्ती वरील सूत्राचा आधार घेऊन व्यायाम करण्याचे टाळतात आणि युक्तिवाद सुरू करतात, की स्टेशन गाठण्याची घाई, चेंगराचेंगरी, धक्का-बुक्की डब्यात शिरण्यासाठी मुसंडी प्रयोग या सर्व गोष्टीमुळे शरीराला श्रम होतातच की, मग वेगळा व्यायाम काय करायचा? पण ही धारणा योग्य नाही.
व्यायाम म्हणजे काय
लाघवं कमसामर्थ्य दितोग्निमेदसःक्षयः। 
विभक्त घनगात्रत्वं व्यायामात् उपजायते ॥ ” (अ.सं.सू.3/62-63)
ज्या शरीरश्रमाने शरीराला हलकेपणा येतो. जडपणा नष्ट होतो, शक्तीचे काम करण्याची ताकद येते, पचनशक्ती वाढते, अवयव वेगवेगळे स्पष्ट उठून दिसतात. स्नायू स्पष्ट व्यक्त होतात तो म्हणजे व्यायाम.
व्यायामाची योग्य मात्रा – 
हेमंत व वसंत ऋतूमध्ये अर्ध्य शक्ती व्यायाम करावा. व वर्षभरातील इतर काळामध्ये अर्ध्य शक्तीपेक्षा कमी व्यायाम करावा. आयुर्वेदातील व्यायाम हा स्वस्थ्यासाठी आहे. मिस्टर किंवा मिस युनिव्हर्स होण्यासाठी नाही. व्यायामासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ योग्य व्यायाम सर्वांनीच करायचा असे बंधन नसले तरी आरोग्याची कामे न करणाऱ्या प्रत्येकाने सूक्ष्म व्यायाम करावा.
व्यायाम कोणी करू नये ?
1. वातपित्तदोषाचे आजारी
2. आठ वर्षाखालील मुले
3. वृध्द
अर्धशक्ती म्हणजे काय?
तोंडाने श्वास घ्यावा लागतो. काखेत, नाकावर, कपाळावर, पायावर, सांध्यांना घाम फुटतो. ही अर्ध्यशक्ती व्यायामाची लक्षणे आहेत.
व्यायाम प्रकार – 
* चालणे – व्यायाम प्रकार अनेक वर्णन केलेले असतील तरी सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालणे. दररोज सकाळी उठल्यावर 5 ते 7 च्या दरम्यान मोकळया हवेत सावकाश चालण्याचा सराव करावा. दमछाक होईल अशा प्रकारे चालू नये. पाठीचा कणा ताठ ठेवून सैल कपडे परिधान करुन पायामध्ये मोजे आणि बूट घालून चालावे. दररोज किमान 45 मिनिटे चालण्याने शरीर रोगमुक्त होते.
हे शक्य नसल्यास आठवडयातून 4 वेळा 30 मिनिटे चालावे.
काही लोक Trade mile वर चालण्याचा व्यायाम करतात. ट्रेडमिलवर चालण्यामुळे खालील फायदे होऊ शकतात.
– पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा तीनही ऋतूत चालण्याचा व्यायाम अखंड करता येतो.
– फावल्या वेळात चालता येते.
– ट्रेडिमिलवर चालताना रहदारी व मित्रमंडळींचा त्रास होत नाही.
– चित्त एकाग्र ठेवता येते. प्रसंगी संगीताचा आस्वाद घेता येतो.
* सायकलिंग – हा ऍरोबिक्स प्रकारातला व्यायाम आहे. प्रतितास 15-20 किमी वेगाने सायकल चालवल्यास अनेक फायदे होऊ शकतात. हृदय आणि रक्ताभिसरण यांचे कार्य सुधारते. मांडीचे स्नायू, पोटरीचे स्नायू, नितंब यांना फायदा होतो. हृदयविकार, हर्निया असणाऱ्यांनी सायकलिंग करू नये.
* पोहणे – सर्व वयोगटातील लोकांसाठी पोहणे हा व्यायाम सहज सुलभ आहे. या व्यायामामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम घडतो. जमिनीवरील व्यायामापेक्षा कमी कष्टप्रद असा व्यायाम आहे. पाण्यामध्ये कमी शक्तीमध्ये जास्त व्यायाम होतो. पाठीचे स्नायू, वक्षीय स्नायू, हात आणि पाय या सर्वांना समप्रमाणामध्ये व्यायाम घडतो.
* सूर्यनमस्कार – आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचे असेल तर तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे. यासाठी सूर्यनमस्कार हा व्यायाम घरच्या घरी कुठल्याही साधनांचा वापर न करता करता येतो. हा व्यायाम दमछाक न करणारा व शरीराची लवचिकता वाढवणारा आहे. तज्ञ मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्काराचा सराव करण्यास हरकत नाही.
ताकद वाढविणारे व्यायाम. – 
टेकडी चढणे, मैदानी खेळ खेळणे, नृत्य करणे, धावणे, जोर बैठका काढणे, वजन उचलणे असे व्यायाम आलटून करावेत. कोणताही व्यायाम करताना FITT याचा विचार करावा.
व्यायाम आणि नियम
बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायामाला वेळ मिळत नाही हे तत्त्वतः खरे असले तरीही सर्व व्यस्त जीवनातून किमान अर्धा तास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण आजारी पडल्यानंतर प्रत्येकाला दवाखान्यात ऍडमिट होण्यासाठी डॉक्टरच्या मर्जीप्रमाणे वेळ मिळतोच त्यामुळे हे टाळायचे असेल तर स्वतःबद्दल आकर्षक, बांधेसूद, चपळ, उत्साही व्यक्तिमत्त्व डोळयासमोर आणा.
व्यायाम करताना खंड पडू देऊ नका. आवड असली म्हणजे सवड मिळते. सवय लागेपर्यंत कष्ट करा नंतर आपोआप नियमितता टिकेल. व्यायाम करण्यासाठी गुगल फिटसारखे ऍप डाऊनलोड करा. म्हणजे व्यायामाचे रेकॉर्ड ठेवता येतात.
व्यायामाचे फायदे –
* मानसिक ताण-तणाव कमी होते.
* हाडाची बळकटी वाढते. सांध्याचे आरोग्य सुधारते.
* अभ्यासात एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.
* स्वतःबद्दलचे मत सुधारते
निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंब, निरोगी संस्था, निरोगी राष्ट्र यासाठी व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नाही.
 
डॉ. सुभाष मार्लेवार
एम.डी. (आयु)