महानुभाव पंथाचे तत्वज्ञान

भारतात मध्ययुगीन काळात अनेक धर्मपंथांचा प्रसार झाला. त्यामुळे धार्मिक जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. याकाळातील सामाजिक – सांस्कृतिक जीवन धर्म प्रधान होते. महानुभाव पंथाची स्थापना ज्या यादव काळात झाली त्याकाळात प्रामुख्याने नागपंथ, लिंगायत हे पंथ जोर धरु लागले होते. हे सर्व पंथ भक्तिमार्गाचा पुरस्कार करणारे असले तरी त्यांच्यात कमालीची भिन्नता होती. या सर्व पंथांच्या प्रवर्तकांनी आपली एक विशिष्ट विचार संहिता, आचार संहिता निर्माण केली आहे. त्याला एक तात्विक अधिष्ठान असून या तत्वांवरच त्यांच्या धर्मपंथाची इमारत उभी आहे.

तत्वज्ञान म्हणजे काय ?

तत्वज्ञान म्हणजे तत्वासंबंधीचे ज्ञान. ‘तत’ म्हणजे जे काही आहे ते सर्व, या ‘तत’चा ‘तत’पणा म्हणजे तत्व. जसे मनुष्याचा मनुष्यपणा म्हणजे मनुष्यतत्व, तसे ‘तत’चे सार म्हणजे तत्व होय. जे अस्तित्व आहे त्याचे सार अथवा अर्थ त्याचे वास्तव स्वरूप शोधणे म्हणजे तत्वज्ञान होय. यावरून तत्ववेत्त्यांच्या अनुभवाचे सकस आणि सखोल चिंतन म्हणजे तत्वज्ञान असे म्हणता येते. तसेच तत्वज्ञान म्हणजे ईश्वराविषयीचे यथार्थ ज्ञान होय. तत्व म्हणजे अंतिम सत्य. या अंतिम सत्याचा शोध महानुभावीय तत्वज्ञानात घेण्यात आला आहे.

महानुभाव पंथाचा उदय

महानुभाव पंथ हा विदर्भातील वर्हाड प्रांतात १२ व्या शतकात उदयाला आलेला एक विचारप्रवाह आहे. तोपर्यंत हिंदू धर्मातील ‘एकोहं’ या तत्वाला सर्वत्र मान्यता होती. मी तोच आहे किंवा जीव आणि शिव यात कुठलाही भेद नाही अशा स्वरुपाचे विचार रूढ झाले होते, यालाच ‘अद्वैतवाद’ असे म्हणतात. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘द्वैत’ म्हणजे दोन. जे दोन नाही म्हणजे एकच आहे असा तत्वविचार म्हणजे अद्वैतवाद. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांनी एकेश्वर मताचा पुरस्कार करून द्वैतवादाची स्थापना केली.

चक्रधर स्वामींच्या मते ‘जीव-शिव’ किंवा ‘आत्मा-परमात्मा’ या गोष्टी पूर्णतः भिन्न आहेत. श्रीचक्रधर स्वामींनी चार पदार्थांचे प्रतिपादन केले आहे त्या म्हणजे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. यासंदर्भात श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, ‘‘या चारही पदार्थ परस्परांपासून भिन्न असून ते शेवटपर्यंत भिन्नच राहणार. त्यांच्यात किंवा त्यातील कोणत्याही दोहोंत ऐक्य होणे कधीच शक्य नाही.’’ म्हणूनच महानुभाव तत्वज्ञानाला द्वैत असे म्हणतात.

डोळ्यांनी दिसणाऱ्या सृष्टीच्या मागे काय रहस्य आहे किंवा सृष्टी रचनेमागील ईश्वराचा उद्देश काय हे महानुभाव तत्वज्ञानात पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ‘संहार’ ही संकल्पना काय आहे हेही या तत्वज्ञानात स्पष्ट केले आहे. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य ही साधुपुरुषांची तत्वत्रयी चक्रधर स्वामींनी संगीतली आहे.

महानुभाव पंथाचे तत्वज्ञान

महानुभाव पंथ हा मोक्ष मार्ग असल्यामुळे त्याचे तत्त्वज्ञानही मोक्षप्रधान आहे. या तत्वज्ञानाचा ‘ईश्वरप्राप्ती’ हाच प्रतिपाद्य विषय असल्यामुळे अगोदर ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे क्रमप्राप्त होते. कारण विश्वात प्रत्यय घडून येणाऱ्या अनेकविध घटनांनी जीवमात्राला विषम प्रमाणात भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखांदी द्वंदांनी विचारी माणूस अंतर्मुख होतो आणि तत्वचिंतन करू लागतो. ईश्वरवाद, दैववाद, कर्मविषयाक इत्यादी निरनिराळ्या गोष्टींचा विचार करून जीव, जगत व परमेश्वर याविषयी गूढ उलगडण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच निरनिराळे सिद्धांत, निरनिराळ्या प्रकारचे तत्व प्रतिपादन करण्याचा प्रयत्न होतो.

भारतीय तत्वज्ञानाच्या क्षेत्रात द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही सिद्धांत आद्य शंकराचार्यांपासून प्रचलित आहे. श्रीचक्रधर स्वामींच्या काळात श्री मध्वाचार्य होऊन गेले. दोघांनीही पूर्ण द्वैताचा  पुरस्कार केला. पण त्यांची इतर तत्वे एकमेकांपासून भिन्न आहेत. संसार हा दुखःरूप, पापमूल आणि अनित्य आहे. अशा या दुखःमय संसारातून सुटका कशी करून घ्यावी यासाठी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे तत्वज्ञान आकारास आले आहे.

महानुभाव तत्वज्ञानाप्रमाणे जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे. ते अनादी असून कधीही नष्ट होत नाही. जीव जसे अनेक आहेत. तसेच देवताही अनेक आहेत. या देवतांमध्ये उच्च – नीच असा क्रम आहे. देवतांमध्ये माया ही सर्वात श्रेष्ठ देवता आहे. विश्वदेवता तिच्यापेक्षा कनिष्ठ असून त्यापेक्षा अष्टभैरव लहान आहे. तसेच स्वर्गीच्या देवता त्यापेक्षा कनिष्ठ असून कर्मभूमीच्या देवता सर्वात लहान आहेत. या सर्व देवता सचेतन असून त्यांच्या ठिकाणी ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य व प्रकाश या पाच प्रकारांची समृद्धी आहे. या सर्व देवतांना परमेश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान असून त्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय जाणण्यास उत्सुक असतात. कोणतीही देवता परमेश्वर होऊ शकत नाही अथवा मोक्षही देऊ शकत नाही. महानुभावांचे असे प्रतिपादन असल्यामुळे त्यांनी देवतांची उपासना ताज्य मानली आहे.

महानुभावांच्या तत्वज्ञानातील तिसरा पदार्थ प्रपंच असून त्याची दोन स्वरूपे आहेत. एक अव्यक्त आणि दुसरा व्यक्त. मूळ प्रपंच ८ घटक तत्वांनी बनला आहे. त्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंच महाभूते आणि सत्व, तम, रज हे तीन गुण समाविष्ट आहेत. यालाच महानुभावांनी ‘अष्टधा प्रवृत्ती’ असे म्हटले आहे. यांच्यापासून सगळा प्रपंच विस्तारला आहे. अव्यक्त प्रपंच ईश्वराच्या इच्छेप्रमाणे व्यक्त होतो, म्हणजे कार्यरूप होतो व सृष्टीसंहाराच्या वेळी तो पुन्हा आपल्या अव्यक्तात म्हणजे कारण स्वरुपात जातो. कार्यरूप प्रपंच खोटा व अनित्य आहे असे महानुभावांचे मत आहे.

महानुभावांच्या तत्वज्ञानातील चौथा पदार्थ परमेश्वर असून तो अनादी, अनंत आहे. महानुभाव ईश्वर हा शब्द अव्यक्त स्वरूपासाठी वापरतात. तर व्यक्त झालेल्या ईश्वरी अवताराला परमेश्वर असे संबोधतात. परमेश्वर हा निराकार असून तो शुद्ध आहे. ज्ञानमय, आनंदमय आहे. सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाशरूप व दया-माया, कृपा. करुणा इत्यादी अनंत गुण त्याच्या ठायी आहेत. जीव, देवता आणि प्रपंच या तिन्ही पदार्थांचे नियमन करणारी ती सर्वोच्च सत्ता आहे. परमेश्वराच्या या सृष्टीरचनेमागील एकच हेतू आहे तो म्हणजे जीवाचा उद्धार करून त्याला ईश्वर स्वरुपात पाठवून मोक्ष प्राप्त करून देणे. यासाठीच तो वारंवार अवतार धारण करीत असतो. म्हणूनच त्याला सृष्टीरचना, संहार, जीवोद्धारण यांसारखी कार्ये करता येतात.

ज्ञान म्हणजे काय?

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्ञान प्राप्तीवर अधिक भर दिलेला आहे. स्वामींच्या मते ज्ञान म्हणजे – जे जसे असेल ते तसेच जाणावे. तुम्हाला या प्रपंचापासून कायमची सुटका हवी असेल तर तुम्हाला आत्मज्ञान किंवा परमेश्वराचे ज्ञान होणे आवश्यक आहे. परमेश्वरी ज्ञानामुळे जीवाची जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. फक्त परमेश्वर हा ज्ञानदाता असून केवळ त्याच्या ठिकाणी कृपा, करुणा असल्यामुळे तो साकार होतो. जीवांना आपले सानिध्य देतो आणि त्यांचा उद्धार करतो. पण ज्ञान घेण्यासाठी जीवाच्या ठिकाणी तेवढी आर्तता असायला हवी.  परमेश्वर जीवांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे ज्ञानबोध करतात. ज्ञानाच्या चार पायऱ्या आहेत. शब्दज्ञान, अपरोक्षज्ञान, सामान्यज्ञान आणि विशेषज्ञान. त्या चढून गेल्यावरच मोक्षरूपी स्वतंत्र्य प्राप्त होते अशी महानुभाव पंथाची धारणा आहे.

ज्ञान हे जसे परमेश्वर भक्तीचे साधन आहे तसेच प्रेमभक्ती हादेखील परमेश्वर प्राप्तीचा एक मार्ग आहे. परमेश्वरावर प्रेम करणाऱ्या भक्ताला त्याचे स्वरूप कायम दिसत असते. तेच आपले साध्य आहे अशी जाणीव त्याला सतत होत असते. परमेश्वराचा विरह तो सहन करू शकत नाही. भक्त हा परमेश्वर वियोगात जगणे शक्य नसल्यामुळे त्यांच्या उद्धारासाठी परमेश्वरच प्रयत्न करतात व त्याला ईश्वर स्वरूप बनवतात. तेव्हा जीव आनंदमय होतो व शाश्वत काळापर्यंत ब्रम्हानंद अनुभवतो.

श्रीचक्रधर स्वामींनी प्रापंचिक गोष्टींचा त्याग करण्याची एक रीत सांगितली असून त्याला ‘असतीपरी’ असे म्हणतात. (या नावाने एक स्वतंत्र प्रकरणच ‘सुत्रपाठ’ या ग्रंथात आले आहे.) इतर भक्ती संप्रदायाप्रमाणे महानुभाव पंथातही गुरुभाक्तीचे महत्व प्रतिपादन केले आहे. तसेच जुगार, मद्य, मांस, शिकार, चोरी व देवता भक्ती इत्यादीचा त्याग करून जो परमेश्वराला अनन्यभावाने शरण जाण्याची दृढ प्रतिज्ञा करतो तोच महानुभाव पंथाचा अनुयायी होऊ शकतो. यासाठी त्याच्यावर विशिष्ट संस्कार केले जातात,

महानुभाव पंथाचे तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ

महानुभाव पंथाचे तत्वज्ञान प्रामुख्याने सुत्रपाठ, दृष्टांतपाठ, चरित्रआबाब, लापणिक, इतिहासग्रंथ, मार्गप्रभाकर, प्रसाद्सेवा, पंचोपाख्यान इत्यादी ग्रंथातून ग्रंथित झालेले असले तरी  सुत्रपाठ, दृष्टांतपाठ आणि लापणिक या ग्रंथावरच महानुभावीय तत्वज्ञानाचे अधिष्ठान विराजित झालेले जाणवते.

सूत्रपाठ – महानुभावांचा वेद

सूत्रपाठातील प्रत्येक सूत्रातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान व्यक्त झालेले आहे. त्यामुळेच थोर साहित्यिक वा. ना. देशपांडे यांनी सूत्रपाठाला ‘महानुभावांचा वेद’ असे म्हटले आहे. सूत्र हे अतिशय लहान-लहान वाक्यांचे बनलेले असते. यातील अनेक वचने अतिशय लहान-लहान शब्दांनी मिळून तयार झालेली आहेत. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा पायाच जणू सूत्रपाठ ठरतो. सूत्रपाठातील सूत्रांची संख्या जवळपास साडे बाराशे असून ती पूर्वी, पंचकृष्ण, पंचनाम, अन्याव्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसारण, उद्धरण, असती परी , महावाक्य, निर्वचन, आचार, आचारमालिका, विचार विचारमालिका इत्यादी प्रकरणात विभागली गेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान संक्षेपाने पण समग्रतेने यातून व्यक्त झाले आहे.

******