ग्रंथ परिचय – आचार्य कवीश्वर भास्कर भट्ट बोरीकर महानुभाव कृत उद्धवगीता

Udhavgitaमराठी साहित्याच्या दालनातील समृद्धतेला पूर्णत्व प्रदान करणारं साहित्य म्हणजेच महानुभावीय साहित्य होय. मराठी साहित्याच्या प्रांतात सर्वांग परिपूर्ण गुण-वैशिष्ट्यांनी युक्त सुमारे साडे सहा हजार ग्रंथांचे योगदान महानुभाव संप्रदायाचे आहे.

स्वातंत्रपूर्व पाकिस्तान- उत्तर भारतात या पंथाचे आचार्य १४ व्या शतकात पोहोचले. तेथे त्यांनी या धर्माची तत्वे मराठी भाषेत रुजवली, संगोपित केली, याची साक्ष आजही त्या प्रांतात अनेक मठ-मंदिरे आणि हजारो भक्त परिवार देत आहेत.

चिंतन आणि स्मरण भक्तीतून ईश्वरीय अधिष्ठान प्रती श्रद्धा समर्पित करून भावनांना शब्दबद्ध करणारे हे कवी तत्वाचे व्यासंगी जाणकार होते. व्याकरणाच्या शिस्तप्रियतेचा गंध त्यांच्या अक्षरांना होता.

महानुभावांच्या प्रमुख सात काव्यग्रंथांपैकी उद्धवगीता हा अत्यंत मोलाचा आणि महत्वपूर्ण ग्रंथ होय. ज्ञान भक्ती आणि वैराग्याच्या त्रिवेणी संगमावर सुचीर्भूत होण्याचा लाभ या ग्रंथाच्या पठणाने नक्कीच लागेल असा त्यातील अलंकारोपमा चित्तवृत्तीला प्रसन्नता प्रदान करतात. विस्तारभयास्तव थोडक्यात त्याबाबतची ढोबळ माहिती पुढे देत आहे.

भास्कर भट्ट यांचे चरित्र

भास्कर भट्ट हे परभणी जिल्ह्यातील बोरी या गावचे राहणारे. केशवाचार्य नावाचे एक वैदिक पंडित त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरु होते. भास्कर भट्ट यांची श्रीनागदेवाचार्यांशी भेट झाल्यानंतर त्यांनी त्याच भेटीत नागदेवाचार्यांकडून उपदेश घेऊन महानुभाव पंथाची दीक्षा स्वीकारली. नागदेवचार्यांचे ते फार आवडते होते. पुढे नागदेवाचार्यांनी भास्कर भट्ट यांना कवीश्वर असे नाव ठेवले.

भास्कर भट्ट हे रूपाने अतिशय सुंदर होते. ते शिवण आत घालून वस्त्र घालीत. त्यामुळे अधिकच सुंदर दिसत. त्यामुळे आचार्यांनी त्यांना दशा बाहेर राहतील अशा रीतीने वस्त्र घालावयास सांगितले. तेव्हापासून ते शिवण बाहेर ठेऊन वस्त्र घालू लागले. भास्कर भट्ट दिसायला जसे सुंदर होते तसेच ते विद्वानही होते. विशेष करून संस्कृत भाषेचा आणि साहित्याचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. पंथात प्रविष्ट झाल्यानंतर अन्य पंथीय विद्वानांशी वाद करून त्यात त्यांचा पराजय करणे हा त्यांच्या हातचा मळ असे. अगदी इतका की, प्रत्यक्ष आपल्या पूर्वाश्रमीच्या गुरूचा देखील पराभव करून त्यानाही आचार्यांनी आग्रह करून दीक्षा दिली. परंतु पुढे काही कारणास्तव त्यांना हाकलून देण्यात आले.

भास्कर भट्ट यांनी केशवाचार्यांप्रमाणे इतर अनेकांना वाद-विवादात पराजित केले होते. एकदा तर त्यांनी नागदेवाचार्य यांच्याशी चर्चा करणाऱ्या एका विद्वानाला निरुत्तर केले. तसेच एकदा पैठणला असणाऱ्या संन्याशांना देखील त्यांनी पराभूत केले. त्याच सुमारास पैठणला असणाऱ्या एका विद्वानाला भास्कर भट्ट यांनी त्याच्याच सभेत जाऊन त्यांच्या श्लोकावर आक्षेप घेऊन आपण स्वतः त्या श्लोकावर व्याख्यान केले व सर्व श्रोत्यांना आश्चर्यचकित करून सोडले. जेव्हा त्या विद्वानांनी त्यांच्याविषयी  पृच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी तत्काळ शीघ्र कवित्व करून ‘तद् भास्करोहं कविः’ असा आपला परिचय करून दिला. सहा महिन्यात अनेक पंडितांना निरुत्तर करून भास्कर भट्ट यांनी माहूर हे संस्थान पंथाच्या अधिकारात आणले. हे त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य ठरले.

एक दिवस ते नागदेवाचार्य यांच्याशी आवेश पूर्वक धर्मचर्चा करीत होते. ते पाहून केशोबासांनी त्यांना शिक्षापण केले व अधिकरणाशी असा वाद न घालवण्याविषयी सांगितले. यावरून असे दिसते की, भास्कर भट्ट नुसतेच पढिक पंडित नव्हते. तर ते वाद-विवाद कुशल विमशर्क होते. त्यांच्या ठिकाणी उत्तम वकृत्व होते. आपल्या वकृत्वात ते असा रस निर्माण करीत कि त्यामुळे श्रोत्यांचे अंतःकरण चंद्र्मय होई. श्रोते तल्लीन होऊन देहभान विसरत. असा प्रकारचे भास्कर भट्ट यांचे वाकचातुर्य पाहून त्यांना भागवतावर प्रवचन करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचे व्याख्यान चालू असताना नागदेवाचार्यांचे अंतःकरण द्रवे आणि अवघे चंद्र्मय होई.

भास्कर भट्ट यांचे ग्रंथ कर्तृत्व

अन्वयस्थळकारांनी भास्कर भट्ट यांच्या नावावर १२ ग्रंथ नमूद केलेले आहेत.

 • निर्वचन स्तोत्र

 • पूजा अवसराचे २७ श्लोक

 • प्रास्ताविक ३९ श्लोक

 • नरविलाप स्तोत्र

 • अवतार घटक

 • गद्य चालिःसात पाच श्लोक

 • श्रिया अष्टक

 • विरहाष्टक

 • जयाष्टक

 • श्रद्धापुरीचे ४० श्लोक

 • शिशुपाळ वध

 • एकादशस्कंध (उद्धवगीता)

काव्याचे नाव

प्राचीन महानुभाव पंथात प्रस्तुत काव्य एकादशस्कंध या नावाने प्रसिध्द आहे. त्यासाठी या काव्याचे संपादक वि. भी. कोलते यांनी स्मृतीस्थळ व प्रस्तुत काव्यातील दोन उदाहरणे दिली आहेत कि ज्यावरून उद्धवगीता या ग्रंथाचे नाव एकादशस्कंध असे होते हे स्पष्ट होते.

 • वृद्धाचारामध्ये ‘काविश्वरी एकादश करणे’ असा सरवळा असून त्याखाली ‘मग कवीश्वरबासी एकादश कंद केला’ असा निर्देश आहे.

 • तसेच प्रस्तुत काव्यातील ३६ व्या ओवीत ‘पुरण गगनीचा कुमोदबंधुः जो एकी जे एकादशस्कंधुः तेथ किजैल प्रबंधुः मुनिजनालागी’ असा उल्लेख आहे.

काव्याचा लेखनकाळ

सांप्रदायिक मतानुसार श्री नागदेवाचार्यांचे देहावसान शके १२२४ मध्ये झाले. त्यानंतर तीन वर्षांनी बाईदेवबासांचे देहावसान झाले. अर्थात शके १२३४ ते १२३७ च्या दरम्यान ‘शिशुपाळ वध’ व ‘उद्धवगीता’ १२३६ असा काव्याचा लेखनकाळ निश्चित केला आहे. उद्धवगीता किंवा एकादशस्कंध यात मूळ संस्कृत एकादशस्कंधातील १२६७ श्लोकांचा संक्षेप भास्कर भट्ट यांनी ८२७ ओव्यांत केला असून एकादशावरील पहिली मराठी टीका या दृष्टीने या ग्रंथाला महत्व आहे.

तृतीयाचार्यत्व 

नागदेवाचार्यांच्या देहावसानानंतर तीन वर्षापर्यंत बाईदेवबास आचार्य होते. त्यांच्यानंतर भास्करभट्ट यांना आचार्य पदाचा मान मिळाला. आपल्या कारकिर्दीत पंथीय तत्वज्ञानात्मक ग्रंथाचा अन्वय लावण्याचे महत्वाचे कार्य भास्कर भट्ट यांनी केले. नागदेवाचार्यांच्या विद्यमाने श्री चक्रधर स्वामींची वचने निवडून केसोबासांनी सूत्रपाठाअंतर्गत द्वादश प्रकरणांचा अन्वय लाविला होता. पुढे नागदेवाचार्य, बाईदेवबास, केसोबास, दामोदर पंडित हे साधक दिवंगत झाले. तशात खालशेयाची धाडी आली (इ.स.१३०८) त्यावेळी भास्कर भट्ट कोकण प्रांती गेले. बरोबर त्यांचे शिष्य परशरामबास व सर्व पोथ्यांची झोळी होती. मार्गात चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांची चीज वस्तू लुटून नेली. त्यावेळी झोळीतून लगबगीने एक पोथी परशरामबासांनी गवतात लपवली तेवढी वाचली. या पोथीत रत्नमाळा स्तोत्र, ज्ञान भास्कर स्तोत्र, ज्ञानकलानिधी स्तोत्र, नारविलाप स्तोत्र, नरेंद्र कवींचे रुक्मिणी स्वयंवर, दामोदर पंडितांचे वच्छाहरण, भास्कर भट्ट यांचे शिशुपाळ वध आणि एकादशस्कंध इतके ग्रंथ लिहिले होते ते वाचले. इतर ग्रंथ नष्ट झाले त्यात चरित्र ग्रंथ, द्वादश प्रकरणे आणि स्थान पोथी हे मुख्य होते. देशात शांतता झाल्यावर यवनांच्या स्वारीमुळे पांगलेले महानुभाव पुन्हा एकत्रित आले तेव्हा आचार्य भास्कर भट्ट बोरीकर आणि त्यांचे आणि त्यांचे शिष्य परशरामबास व रामेश्वरबास या तिघांनी मिळून स्वतःला मुखोद्रत असलेल्या द्वादश प्रकरणांचा अन्वय पुन्हा लावला. या नंतर त्यांनी लावलेला सूत्रपाठ पंथात प्रमाण मानला जाऊ लागला. तसेच लीळाचरित्र ग्रंथही भास्कर भट्ट, परशरामबास, रामेश्वरबास व नागाईसे या सर्वांनी मिळून आपणाला मुखोद्रत असलेल्या लीळा लिहून काढून लीळाचरित्र ग्रंथाची पुनर्रचना केली. लक्षणातील वचनावर कवीश्वरबासांचा पक्ष आहे. यावरून श्रीमुखीच्या वचनांचा अर्थ लावण्याचे महत्वाचे कार्यही भास्कर भट्ट यांच्याकडून झाले होते. तसेच केसोबांनी तयार केलेल्या सूत्रपाठाला पूर्वी व पंचकृष्ण हि प्रकरणे भास्कर भट्ट यांनी जोडली.

शेवटचे दिवस

भास्कर भट्ट यांच्याकडे पंथाचे आचार्यत्व होते तरी एके ठिकाणी राहून त्यांनी मार्ग चालविला नाही. आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांनी विशेषकरून अतनाट घालविले. एकदा त्यांना फार अशक्तपणा आल्यामुळे त्यांनी फाळणी केली व एकटेच बसून अटन करू लागले. आपल्या सोबत असणारे दंतेगोपाळबास यांना विभाग दिला. आपल्या हाडांची रांगोळी घालण्यासाठी त्यांनी शरीराची कोरडी घालण्यास सुरुवात केली. विजनात काटीच्या एका झाडाखाली शरीर शोषण करून परमेश्वराचे नामस्मरण करून ते पडून राहिले. दैव योगाने  दंतेगोपाळबास त्याच बाजूला अटन करीत असताना त्यांनी भास्कर भट्ट यांना बेसावध अवस्थेत पहिले. त्यांनी पाण्याचा बोळा त्यांच्या तोंडात पिळून सावध केले तेव्हा डबडबलेल्या डोळ्यांनी भास्कर भट्ट म्हणाले, आह गोपालाः ऐसे का केले. तेव्हा दंतेगोपाळबास म्हणाले, तुम्ही पुष्कळांना (बहुतांना) धर्म रक्षक आहात. यावेळी तुमचा देहांत व्हावा अशी श्री चक्रधर स्वामींची इच्छा दिसत नाही. म्हणूनच तुमची व माझी या ठिकाणी भेट झाली असे समजा. त्यांनतर योग्य उपचार करून दंतेगोपाळबासांनी भास्कर भट्ट यांना पूर्ण सावध केले. कालांतराने दंतेगोपाळबास यांचे चंदनवदन येथे देहावसान झाले. तेव्हा मृत्युपूर्वी दंतेगोपाळबास यांनी लिहून ठेवलेली छिन्नस्थळी भास्कर भट्ट यांना मिळाली. तसेच यानंतर सत्रसिंगी तेथे नातीनागाईसा यांचे देहावसान झाले. तेव्हा त्यांनीही लिहून ठेवलेली छिन्नस्थळी भास्कर भट्ट यांनी मिळवली. ती पाहून त्यांना फार दुखः झाले. या दोघांच्याही मृत्यूचा परिणाम भास्कर भट्ट यांच्यावर झाला व त्यांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस कडाष्टी येथे काढले. तेथील रामदरा या स्थानी राहूनच त्यांनी आपले एकादशस्कंध (उद्धवगीता) हे काव्य पूर्ण केले. त्यानंतर लवकरच त्यांचे देहावसान झाले आणि ते ईश्वरदर्शनास गेले.

ग्रंथ महात्म्य

उद्धवगीता ग्रंथात श्रीकृष्ण आणि उद्धव देवांचा संवाद आहे. म्हणजेच भक्त आणि परमेश्वराचा तो संवाद. अत्यंत गोड आणि रसाळ. भक्त आणि परमेश्वराच्या विभक्त होण्याचा क्षण. दुःखाचा आवेग, कारुण्याचा स्पर्श व्यक्त झालाय विरामाच्या पार्श्वभूमीवर.

प्रपंचाच्या विरामातूनच आत्मसाक्षात्काराचा क्षण सापडतो. म्हणून या ग्रंथाच्या श्रवणाने, पठणाने आत्मसाक्षात्कार घडतो. यथार्थता प्रकटते. अध्यात्म साधनेला बहर येतो.

यासोबत विरह व्यथेच्या अश्रूंनी पापाचा क्षाळण होऊन जीवस्वरूप शुद्ध आणि योग्य होते. जे रूप देवाला आवडते, मग भक्तही नामना साकारते.

दैनिक व्याप आणि त्रयतापाचं निर्दालन या ग्रंथ पठणाने होते. असा हा अत्यंत मोलाचा सर्वाना उपयुक्त आणि मार्गदर्शक असणारा ग्रंथ आहे.

 

श्री ब्रह्मविद्या प्रकाशन, महानुभाव आश्रम, तरडगाव

स्वागत मूल्य – रु. ३०/- मात्र