अंतर्गाम्य – नम्रतेचा खरा अर्थ

नम्र आणि विनयशील या शब्दांचा शब्द कोशांमधला अर्थ असा दाखवलाय की, ‘‘स्वतःमधले दोष अथवा उणीवा जाणीवपूर्वक दाखवणारा! अहंकारी, आग्रही, अरेरावी नसलेला असा सभ्य माणूस!’’ हा अर्थ खरा आहे का?किंवा यापेक्षा कुठली वेगळी व्याख्या आहे का?

शब्दकोशातला अर्थ सांगतो, ‘‘गर्विष्ठ नसणं!’’ पण मी गर्विष्ठ नाही असं जो कोणी म्हणतो, तो एक गर्वाचाच भाग असतो. कारण तो अगदी मोठ्यानं या गर्विष्ठ नसण्याची घोषणा करत असतो आणि त्यावर जर तुम्ही म्हणालात, ‘‘मी तर तुझ्यापेक्षा विनयशील आहे. नम्र आहे. तुझ्यापेक्षा कमी गर्विष्ठ आहे.’’ तर मग त्याला अपराधी वाटायला लागतं. तो गर्विष्ठ असतोच, पण मागच्या दारानं. म्हणजेच आपण गर्विष्ठ नसण्याचा मुखवटा घेणं! पण खऱ्या विनयशील माणसाला गर्व, अभिमान याची साधी ओळखही नसते. एखादं लहान मूल जणू! लहान मुलाला गर्व, अभिमान म्हणजे काय ते तरी माहित असते का?

शहाणा माणूस याच निष्पाप अवस्थेत राहत असतो. तो गर्विष्ठ नसतो किंवा त्याला गर्व नसतोही. त्याला कोणत्याच गोष्टीबद्दल महत्व नसतं, पण अहंकारी माणूस मात्र आपण गर्विष्ठ नसण्याचा देखावा स्वतः करत करत वागत असतो.

नम्र आणि विनयशील या शब्दांचा शब्दकोशातला आणखी एक अर्थ. ‘स्वतःच्या मनाविषयी आग्रही नसणारा… जो माणूस स्वतःच्या मताविषयी आग्रही नसतो, तो ओघानंच स्वतःचा मत मनातल्या मनात दडपून टाकणारा असतो… तो आग्रह जातो कोठे? तिथे ‘स्व’ असतोच. तो माणूस त्या अहंकाराविषयी आग्रह नाही धरणार. पण तो दडपून टाकण्याचे प्रयत्न करणार. पण दडपलेला अहंकार जास्त भयानक असतो. आग्रही असण्यापेक्षा तो दडपून टाकणे जास्त भयंकर. कारण दडपला गेलेला अहंकार हा साठला जातो आणि तो कुठल्याही क्षणी उसळणाऱ्या ज्वालामुखीसारखा बनून जातो.

खराखुरा नम्र माणूस, त्याला आग्रहीपणा जसा माहित नसतो, तसं एखादी गोष्ट दडपून टाकणंहि माहित नसतं. एखादा गुलाबाचं फूल सकाळच्या सूर्यप्रकाशात उमलतं आणि वाऱ्याबरोबर स्वतःचा सुगंध सगळ्यांना देत राहतं… याला ते फूल आग्रही मताचे असते असं तुम्ही म्हणाल? ती तर एक नैसर्गिक क्रिया असते. त्यामध्ये मुद्दामहून आग्रही असण्याचा प्रश्नच येत नाही. कुणी त्या फुलाला पाहो अथवा न पाहो. त्याला काही फरक पडत नाही. किंवा त्याच्या जवळून कुणी गेलं काय आणि नाही गेलं काय… काहीच फरक पडणार नाही.

ते फूल नेहमीप्रमाणे उमलणार, वाऱ्याबरोबर डोलणार, उन्हा-पावसातसुद्धा आपला सुगंध पसरवणार…

सगळं काही नैसर्गिक!

शब्द्कोशांबरोबर विचार-विनिमय न करता तुम्ही स्वतःबरोबर विचार केला पाहिजे. तिथ तुम्हाला एखादी व्याख्या नाही सापडणार… तर तिथे सापडेल नम्रतेचा खराखुरा अर्थ, खराखुरा विनय! आणि ते सापडेपर्यंत दुसऱ्या कशावर समाधानही मानू नका.

धार्मिक, अध्यात्मिक अनुभवाचा विचार करता असं दिसून येतं की, सगळे शब्दकोश त्यादृष्टीनं निरर्थक आहेत… कारण अध्यात्म हा भाषेचा भाग नाहीच, तर तो भाषेपलीकडे असलेल्या अनुभूतीचा भाग आहे.