अंतर्गाम्य – बदलाला सामोरे जाताना…

जीवनातला प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने जगता आला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा पुन्हा उपभोगता येणार नाही असे समजून जगले पाहिजे. त्यामुळे भांडण – तंटे, उणीदुणी यात वेळ घालवू नये. कदाचित क्षमा मागण्यासाठीसुद्धा पुढच्या क्षणाची वाट पाहावी लागेल.

उणीदुणी, सतत द्वेषाची भावना स्वतःमध्ये शब्दांचे बदल करून पूर्णपणे मत्सरग्रस्त प्रेमाच्या नावाखाली विरोधी वर्तन करणारा माझा सखा एकाएकी निःशब्द झाला. त्याची वाणी अचानक बंद झाली. अवयव निकामी झाले. मग सगळे स्वकीय दूर पळाले. मित्रत्वाच्या नात्याने संबंध राखणे एव्हढेच आपण सध्या करू शकतो. एकमेकांच्या दोषाबद्दल किंवा कमकुवतपणाबद्दल समजूतदारपणा बाळगला तर उत्तमच ! आयुष्य सतत बदलत जाणार आहे म्हणून विवेक असणे महत्वाचे आहे.

लग्नाच्या दिवशी रजिस्ट्रारच्या कार्यालयात दोघांनी सह्या करायच्या होत्या. पहिल्यांदा बायकोने सही केली आणि नंतर नवऱ्याने. त्याची सही पाहता क्षणीच तिने रजिस्ट्रारला सांगितले, मला घटस्फोट हवाय.

रजिस्ट्रारने आश्चर्याने विचारले, ‘‘म्हणजे? आताच तर तुमचे लग्न झाले ना? आताच सगळे कागदपत्र तयार झाले आहेत.’’ ती उत्तरली, ‘‘होय! खरं आहे तुमचं. परंतु गोष्टी आताच बिघडून गेलेल्या आहेत. हे… पहा नं कागदपत्र ! मी केलेली सही लहान लिपीत आहे आणि नवऱ्याने सही केलेली मोठ्या लिपीत. त्याला स्वतःचाच मोठेपणा दाखवायचा आहे. हीच तर खऱ्या त्रासाची सुरुवात आहे. त्यामुळे मला ते नकोच.’’

तात्पर्य असे कि, शब्दात बदल केला तरी चालू शकेल. मला मात्र आपल्या जाणिवांमध्ये बदल घडवून आणायचा आहे.

आतापर्यंत असंख्य कुटुंबाबरोबर मी राहिलो. या प्रत्येक कुटुंबात पती-पत्नी दोघेही माझ्याकडे माझे मन मोकळे करायचे. दोघेही अतिशय उत्तम! परंतु एकत्र आले कि, युद्ध सुरु. ‘घरोघरी मातीच्या चुली’ याप्रमाणे प्रत्येक घर म्हणजे युद्धभूमीच.  घरातल्या मुलाची वाढ या अशा वातावरणात होते. त्यामुळे मुलेही तेच तंत्र शिकतात आणि भविष्यात तसे वागताना आढळतात.

अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या प्रवृत्ती आपोआप प्रवाहित होत असतात. पिढ्या बदलत राहतात. परंतु प्रवृत्ती तशाच राहतात. म्हणून आपण त्याचा त्याग केला पाहिजे. म्हणजे पुढची पिढी अशा वृत्तीपासून मुक्त होऊ शकेल. फक्त भाषा बदलत राहू नये, तर अमुलाग्र बदल करावा.