जगा पण कृष्णासारखं…

कृष्णाने आसक्ती आणि विरक्ती मधील संतुलन उत्तम साधले होते. यशाच्या एका टप्प्यावर तो कधीचताटकाळत थांबला नाही. आयुष्यभर विविध भूमिका साकारणारा कृष्ण काळाच्या गौरवगाथांमध्ये प्रसिद्धित अडकून राहिला नाही. गोकुळ, मथुरा, द्वारका, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर अशी वाटचाल करतानाकृष्णाने प्रत्येकवेळी नीतीशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास आणि अर्थ लावला. सार्वजनिक जीवनात कृष्णाशिवायदुसरा पर्याय नाही.

समाजात जगत असताना समाजव्यवस्थेला चतुराईने चुचकारत जी व्यक्ती पुढे जाते, ती जगण्यास लायक ठरते. ती इतरांनाही मार्गदर्शक ठरते. व्यवस्थेशी सामना करताना ‘विद्रोह’ करुन चालत नाही. व्यवस्थेवर व्यक्तीगत टिका, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणे, दुसर्यांना मूर्खात काढणे, संत-साहित्यातील वादात्मक मुद्दे चर्चा करुन, वांझोटा करुन इतरांना त्रास देणे अशी कामे काही लोक करीत असतात.

भगवान श्रीकृष्ण, श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी, मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेतल्यावर असे दिसून येते, की कितीतरी गोष्टी आपण त्यांच्या जीवनातून शिकू शकतो. कलीयुगात जगायचे असेल तर ‘कृष्ण’ होऊन जगावे ही कल्पना डॉ. गिरीश जखोटीया यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून मांडली. मी कृष्णभक्त असल्याने ती माझ्या मनाला भावली. कृष्ण आपल्या विरोधकांना कधीही कमी लेखत नसे. नपुंसक अहिंसेला कृष्णाने कधीच थारा दिला नाही. गोकुळवासियांना सोडताना कृष्ण कर्तव्यकठोर कर्मयोगी बनतो. व्यवस्थापकीय भाषेत हाच मुद्दा ‘मॅनेजमेंट ऑफ चेंज’ म्हणून मांडला जातो.

कृष्णाने आसक्ती आणि विरक्ती मधील संतुलन उत्तम साधले होते. यशाच्या एका टप्प्यावर तो कधीच ताटकाळत थांबला नाही. आयुष्यभर विविध भूमिका साकारणारा कृष्ण काळाच्या गौरवगाथांमध्ये व प्रसिद्धित अडकून राहिला नाही. गोकुळ, मथुरा, द्वारका, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर अशी वाटचाल करताना कृष्णाने प्रत्येकवेळी नीतीशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास आणि अर्थ लावला. सार्वजनिक जीवनात कृष्णाशिवाय दुसरा पर्याय नाही.

काही लोक कर्णासारखे स्वतःवरील अन्यायाचे ढोल वाजवीत, कपटी दुर्योधनाची साथ देत, कोणतीही नवीन निर्मिती करु शकत नाहीत. दुसर्यांवरील अन्याय त्यांना कसपटासमान वाटतात. आज आमच्या भोवती सर्वत्र कंस, दुर्योधन, शकुनी वावरत आहेत. त्यांना कृष्णचरित्र वाचल्यावर ओळखता येते. आजच्या काळात शहरातील इमारतीची उंची वाढली पण त्याठिकाणी माणुसकीची गरिमा तीळमात्रही नाही. शहरातील रस्ते चौपदरी रुंद झाले पण माणसाची दृष्टी अरुंद झाली. आपल्या संसारातील व व्यवहारातील खर्च वाढला. परंतु शिल्लक घरं कमी झाली. घरं विस्तारांन मोठी झाली. घरांमधल्या सुखसोयीही पुष्कळ झाल्या. परंतु कुटुंब मात्र छोटे झाले. भरपूर पदव्या असणार्या माणसांचं शहाणपण महाग झालं. ‘खाउजा’च्या (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) जमान्यात माहितीचे डोंगर वाढले पण नेमकेपणा कमी झाला. वेगवेगळे तज्ञ वाढले, औषधे भरपूर आली.  डोळ्याचे तज्ञ, हृदयाच्या उजव्या कोपर्याचे तज्ञ, आयुर्वेद तज्ञ भरपूर झाले. परंतु सामान्य माणसाचे आरोग्य कमी झाले.

जगातील मालकीची भाषा वाढली. मूल्यांची किंमत कमी झाली. आपण बोलतो फार, पण प्रेम क्वचितच करतो. तिरस्कार करण्यात आपला हातखंडाच. दहावीच्या निकालानंतर आनंदाने ओरडणारा आपल्या मित्राचे मार्क्स बघून त्याचा तिरस्कार करायला सुरुवात करतो. आपलं राहणीमान उंचावलंय पण जगणं मात्र दळभद्री झालंय. आपण चंद्रावर पण जाऊन आलो, पण आपल्या शेजारी राहणारया नव्या माणसाला आपलं भेटणं होत नाही. बाहेरचं सगळं आपण जिंकलेलं आहे, पण अंतर्गामी आपण हरवत चाललो आहोत.

जो जे वांछिल तो ते लाहो,

दुरितांचे तिमिर जावो

अशी प्रवृत्ती आता समाजातून परागंदा झाली आहे. समाजात नावलौकिक व्हावा, वर्तमानपत्रात नाव यावे, टीव्हीवर आली मुलाखत दिसावी, एका वृक्षाचे रोपण केल्यावर लाख वृक्षाचे रोपण केल्याचे श्रेय मिळावे यासाठी अनेकांचा अट्टाहास चाललेला दिसतो. मी कसा बरोबर आहे, माझे वागणे कसे श्रेयस आहे असे जो तो पटवून सांगतो. परंतु स्वतःला तपासून पाहण्याचा विवेक मात्र एखाद्यातच असतो. यातूनच पुढे मानसिक नैराश्य येते.

बाह्यरूप अगदी साधे परंतु आचरण मात्र देवदुर्लभ, व्यक्तिमत्वाची अशी पायरी कधीतरी गाठायला हवी. कारण देव पण अंतर्गाम्य आहे, बहिर्गामी नाही. परंतु अलीकडे बहिर्गामी साधू, बाबा, संत, महंत यांची मांदियाळीच पाहायला मिळते. मठ –मंदिरात जीवघेणी गर्दी पाहायला मिळते. ते पाहून आपण पिकनिकला तर आलो नाही न असा भास होतो. हार –फुलाचे ढीग, खाण्याची चंगळ आणि गर्दीची मजा एवढे सगळे झाल्यावर लक्षात येते की, मंदिराच्या गाभाऱ्यातून देव केव्हाच हरवलाय?

खरंच यातून देव मिळतो का ?

नाही. देव तो अंतर्गाम्य!

तो काईसेनी भजावा, पुजावा ण लागे. देवाचे अंतर्गाम्यत्व ज्याला समजले तो सुखी.

सध्याचा काळ हा उंच माणसांचा आहे, पण खुज्या व्यक्तीमत्त्वाचा, उदंड फायद्याचा आणि उथळ नात्याचा. जागतिक शांतीच्या गप्पांचा, पण घरातली युद्धं मात्र चालूच आहेत. विवेकावर बोलणं आणि लिहिणं सातत्यानं चालू आहे. परंतु मनानं मात्र अविवेकाची जागा घेतलेली आहे. म्हणून जीवनातील गंमत गेलेली आहे. दोन मिळवती माणसं घरात असताना घटस्फोटाचे प्रमाण वाढतंच चाललेलं आहे. बाहेरुन घरं नटलेली आहेत. अंतर्गामी घरकुल दुभंगलेलं आहे. समोरच्या बैठकीत खूप काही नटून-थटून मांडून ठेवलेलं आहे. जमिनीवर गालीचा टाकला आहे. परंतु कोठीची खोली मात्र रिकामी आहे. कृष्ण आता राहिलेला नाही. कृष्णासारखं जगणं दुरापास्त झालं आहे आणि तरीही मी म्हणतोय,

‘जगा, परंतु कृष्णासारखं जगा!!!

******