शरीरशुद्धीसाठी पंचकर्म

पंचकर्म हा आयुर्वेदातील एक प्रभावी उपचार आहे. तो काळजीपूर्वक आणि सर्व पथ्य-अपथ्य सांभाळून केला तरच त्याचे सुपरिणाम दिसून येतात. कोणाच्या जबरदस्तीमुळे किंवा इच्छा नसेल तर तो मुळीच करू नये. तसेच तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच पंचकर्म करणे केव्हाही योग्य ठरू शकते.
————————————————–
ज्यावेळी शरीरात वात, पित्त, कफ, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, मल-मुत्र, स्वेद या १३ घटकांचे संतुलन बिघडते त्यावेळी शरीरात विविध रोग, दोष निर्माण होतात. त्यावर वेळीच उपचार केले नाही तर त्या व्याधी बळावण्याची शक्यता वाढते. पंचकर्म हा शरीरातील दोष योजनापूर्वक बाहेर टाकण्याचा उत्तम उपाय होय. ही योजना करताना रुग्ण, रुग्णाचे बल, अवस्था आणि ऋतू यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
पंचकर्मात वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण अशी पाच कर्म करून शरीरात निर्माण झालेल्या दोषांचे निवारण केले जाते.
चरकसंहितेत पंचकर्म करण्याविषयी पहिली अट सांगितली आहे,
                  एवंविधस्य कुर्यात्अनपवादप्रतिकारस्य
                                    ….चरक विमानस्थान
याचा अर्थ जो रुग्ण वैद्याचे सांगितलेले ऐकणार नाही, त्याप्रमाणे वागणार नाही, त्याचे पंचकर्म करू नये. पंचकर्मादरम्यान आहारासंबंधी घ्यायची काळजी, आचरणात पाळायचे नियम, पंचकर्मानंतरही आहार-आचरणात अपेक्षित असणारे बदल प्रत्यक्षात आणण्याची तयारी, हे सर्व किती आवश्‍यक आहे हे यावरून समजते.
पंचकर्म कोणी करू नये ?
 • ज्यांची चित्तवृत्ती स्थिर नाही.
 • चिडचिड, राग, द्वेष, असूया यांनी ज्यांचे मन व्यापलेले आहे.
 • ज्यांचा निसर्गावर, स्वतःवर किंवा कशावरच विश्‍वास नाही.
 • ज्यांना स्वतःला मनापासून पंचकर्म करण्याची इच्छा नाही.
 • जे फारच अशक्‍त आहेत, ज्यांचा मांसक्षय, रक्‍तक्षय झालेला आहे आणि ज्यांच्यामध्ये मृत्युसूचक लक्षणे उत्पन्न झालेली आहेत, अशांनी पंचकर्म करू नये.
या गोष्टी टाळाव्यात –
पंचकर्माच्या दरम्यान, तसेच पंचकर्म झाल्यावरही काही दिवसांसाठी ठराविक गोष्टी टाळण्यास  सांगितल्या आहेत. आयुर्वेदात यांना “अष्ट महादोष‘ असे म्हटले आहे.
            महादोषकराण्यष्टाविमानि तु विशेषतः
            उच्चैर्भाष्यं रथक्षोभन्अविचंक्रमणासने ।।
            अजीर्णाहित भोज्ये दिवास्वप्नं समैथुनम्।।चरक सिद्धिस्थान
१. उच्चैर्भाष्यम्‌: फार मोठ्या आवाजात व फार वेळ न बोलणे.
२. रथक्षोभ : रथ म्हणजे वाहन. वाहनात न बसणे हा पंचकर्म करतानाचा दुसरा महत्त्वाचा नियम. सायकल, दुचाकी, चारचाकी, रेल्वे, विमान, कोणत्याही प्रकारचे वाहन पंचकर्मादरम्यान वापरणे अयोग्य होय.
३. अतिचंक्रमण : अति प्रमाणात चालणे हेसुद्धा पंचकर्मामध्ये वर्ज्य सांगितले आहे.
४. अत्यासन : म्हणजे एकाच जागी दीर्घ काळपर्यंत बसून राहणेसुद्धा पंचकर्माला बाधा आणणारे असते.
५. अजीर्णाध्यशन : पंचकर्मादरम्यान अजीर्ण म्हणजे अपचन होणार नाही यासाठी खाण्या-पिण्यात खूप काळजी घ्यावी लागते. तसेच अध्यशन म्हणजे पूर्वीचे खाल्लेले अन्न पचण्यापूर्वी पुन्हा खाणे, मग ते पथ्यकर असले तरी, पंचकर्मात कटाक्षाने टाळावे लागते. जेवल्यानंतरही पोट फार गच्च होणार नाही आणि कायम पोटात हलकेपणा व भूक जाणवत राहील असे व इतकेच अन्न खाणे चांगले.
६. विषम-अहिताशन : विषम-अशन म्हणजे जेवणाची नेहमीची योग्य वेळ चुकवून भलत्याच वेळी जेवणे, आणि अहित-अशन म्हणजे स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता अपथ्यकर अन्न सेवन करणे. या दोन्ही गोष्टी एरवीही रोगाला कारण ठरतात. पंचकर्मामध्ये तर खूपच दोष निर्माण करतात.
७. दिवास्वप्न : म्हणजे दिवसा झोपणे.
८. मैथुन
पंचकर्माची पूर्वतयारी
पंचकर्माच्या माध्यमातून संपूर्ण शरीराची, शरीराला कारण असणाऱ्या पंचतत्त्वांची शुद्धी होत असल्याने, हा संपूर्ण विधी अतिशय काळजीपूर्वक, सर्व प्रकारचे नियम व्यवस्थित सांभाळून करायचा असतो. पूर्वतयारी जितकी व्यवस्थित, तितके मुख्य कर्म पूर्णत्वाने होऊ शकते. पर्यायाने इच्छित गुण येऊ शकतो. पूर्वतयारीला पुरेसा वेळ दिला नाही, तर त्यातून उपायापेक्षा अपाय होण्याची शक्‍यता असते. पंचकर्माच्या पूर्वतयारीमध्ये पाचन, स्नेहन आणि स्वेदन या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत.
पाचन –
आम अवस्थेत असणाऱ्या दोषांचे “पाचन‘ करून मगच पंचकर्माची सुरवात करता येते. अग्नीची कार्यक्षमता वाढवणे, पचनास सहायक औषधांची योजना करणे, पथ्यकर आहार घेणे, स्वेदन करणे वगैरे उपायांच्या माध्यमातून पाचन करता येते.
स्नेहन –
यानंतर येते ते स्नेहन. ज्या क्रियेद्वारा शरीर योग्य प्रकारे स्निग्ध केले जाते, त्याला स्नेहन म्हणतात. चरकसंहितेमध्ये स्नेहनाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे,
स्नेहनं स्नेह विष्यन्द मार्दवं क्लेदकारकम्
                                    चरक सूत्रस्थान
ज्या प्रक्रियेद्वारा शरीर स्निग्ध होते, शरीरातील कडक द्रव्ये वितळण्याची सुरवात होते, कठीणपणा नष्ट होऊन शरीरावयव मृदू, कोमल बनतात व शरीरातील जलभाग वाढीस लागतो, त्याला स्नेहन असे म्हणतात.
स्नेहनाचे दोन प्रकार असतात.
 • बाह्यस्नेहन म्हणजे अंगाला औषधांनी संस्कारित सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे.
 • आभ्यंतर स्नेहन म्हणजे औषधांनी संस्कारित स्नेहद्रव्य (सहसा सिद्ध तूप, क्वचित सिद्ध तेल किंवा वसा) सेवन करणे.
स्वेदन –
स्नेहनाने शरीरातील कडकपणा, कठीणपणा दूर व्हायला मदत मिळते. योग्य पद्धतीने केलेल्या स्नेहनामुळे स्नेहद्रव्य शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोचू शकते, त्या ठिकाणची अशुद्धी शिथिल करण्यास, मोकळी करण्यास सुरवात करते. ही अशुद्धी पचन संस्थेमध्ये आणण्याचे काम अभ्यंग मसाजामुळे, तसेच स्वेदनामुळे होते. स्वेदनसुद्धा पंचकर्मातील महत्त्वाचे पूर्वकर्म होय. स्वेद म्हणजे घाम. ज्या क्रियेद्वारा घाम आणला जातो, ते स्वेदन होय.
स्तंभगौरवशीतघ्नं स्वेदनं स्वेदकारकम्।।..चरक सूत्रस्थान 
शरीरातील जखडलेपण, जडपणा, थंडी, दूर करून घाम आणणारे ते स्वेदन होय. प्रकृती, वय, उष्णता सहन करण्याची क्षमता, वजन वगैरे अनेक मुद्दे लक्षात घेऊन योग्य प्रकारे स्वेदन करावे लागते. प्रथम स्नेहन व नंतर स्वेदन असा क्रम आयुर्वेदाने सांगितला आहे,
                  स्नेहमग्रे प्रयुञ्जीत ततः स्वेदमनन्तरम्
                  स्नेह स्वेदोपपन्नस्य संशोधनमथेतरत्।।चरक सूत्रस्थान 
प्रथम स्नेहाची योजना करावी, नंतर स्वेदन द्यावे व योग्य प्रकारे स्नेहन, स्वेदन झाल्यावरच मुख्य संशोधनक्रिया अर्थात पंचकर्मापैकी प्रकृतीला व रोगाला अनुरूप उपचारास प्रवृत्त व्हावे.
पंचकर्म
१) वमन –
वमन म्हणजेच ओकारी किंवा उलटीद्वारे शरीरातील कफ बाहेर काढणे. कफ विकारात किंवा कफप्रधान विकारांत वमन अधिक उपयुक्त ठरते.
कफ हा स्निग्ध, शीत, गुरु, मंद, बुळबुळीत, चिकट, स्थिर गतीचा असतो. शरीर हे कफाच्या आधारानेच काम करत असते. यात पृथ्वी व जल तत्वाचे अधिक्य असते.
कफाचे स्थान – शरीरात छाती, नाक, जीभ, डोळे, आमाशय ही कफाची स्थाने सांगितली आहेत. कफाच्या या स्थानाच्या कार्यात किंवा गुणाच्या कार्यात कमी – अधिकपणा आला की कफविकृती निर्माण होते. सतत सर्दी – पडसे होणे, शरीर बेडौल दिसणे, वजन वाढणे, शरीरातील मळाला जास्त बुळबुळीतपणा, चिकटपणा येणे, सुस्ती येणे, थकवा वाढणे या गोष्टी कफाचे कार्य बिघडल्याचे दर्शवतात.  यासंबधीची चिकित्सा करताना वमनाचा विचार करावा. पित्ताच्या काही विकारांतही वमन उपयोगी पडू शकते.
वमन हे शक्यतो दोन ऋतुंमध्ये, १५ दिवसाच्या संधीकाळात, श्रावण, कार्तिक, चैत्र या महिन्यात करावे.
निरोगी व्यक्तींसाठी वसंत ऋतू हा योग्य काळ होय. वमन हे सूर्योदयानंतर करावे. वमनापूर्वी रुग्णाने यथाविधी स्नेह, स्वेद ही पूर्वकर्मे केलेली असावीत.
फायदे –
 • वमन दिल्यामुळे भूक वाढते.
 • शरीर हलके होते.
 • छातीतील कफ नाहीसा होतो.
 • तोंडाची चव वाढते.
 • मळमळ, उलटी हे त्रास कमी होतात.
 • ज्या विकारांकारिता वमन दिले आहे त्या विकारांची बहुतेक लक्षणे दूर होतात.
२) विरेचन
विरेचन म्हणजे शौचावाटे शरीरातील दोष बाहेर काढणे.
शरीरातील वात वाढल्यामुळे, शरीरातील आतड्याचे कार्य मंदावल्यामुळे मलावरोध उत्पन्न होतो. विरेचन म्हणजे केवळ शौचाला साफ होणे नसून यात शरीरारील वाढलेला पित्तदोष गुदमार्गे बाहेर पडणे अपेक्षित असते.
पित्त हे किंचित स्निग्ध, तीक्ष्ण, उष्ण लघु आमगंधी, गतिमान व पातळ स्वरूपाचे असते. पित्त म्हणजे साक्षात अग्नीच. तेज तत्वाचे अधिष्ठान असलेला हा दोष शरीरातील रक्त व स्वेद यांच्या आश्रयाने राहतो. शरीराची यंत्रणा चालू राहण्यासाठी लागणारे सर्व इंधन या घटकाकडून पुरवले जातात. पित्त कमी, तीक्ष्ण व उष्ण असेल तर पित्ताचे पाचाकस्राव पुरेसे सुटत नाहीत. मलनिःसारण बिघडते. पित्त जास्त स्निग्ध झाले तर मळाची दुर्गंधी वाढते.
पित्त हे शरीरत नाभी, आमाशय, घाम, रक्त, लसिका, दृष्टी व त्वचा येथे वास करून असते. या अवयवांच्या संबधीच्या विकारात विरेचनाचा उपयोग केला जातो. मलावरोध, भूक मंदावणे, तोंड कडू वा आंबट होणे, खूप घाम येणे, नख, नेत्र, त्वचा, मूत्र पीतवर्णाचे होणे, सर्वांगाचा दाह होणे, शरीर उष्ण होणे, शरीरास दुर्गंधी येणे अशा लक्षणांत विरेचन घेण्यास सुचवले जाते.
कावीळ, जलोदर, यकृत प्लीहावृद्धी, पित्तज शूल, जीर्णज्वर, राजयक्ष्मा, आम्लपित्त, मूळव्याध, कुष्ठविकार, आमवात, वातरक्त, योनी ओ शुक्रासंदर्भातील विकार इत्यादी विकारात विरेचन ही प्रभावी चिकित्सा ठरते.
पित्ताचा प्रकोप हा शरद ऋतूत होतो. त्यामुळे निरोगी माणसानेही याकाळात स्वास्थ्य रक्षणासाठी विरेचन नक्की करावे. मलावरोध वा त्यासंबधी तक्रार असणारयांनी तर आवर्जून विरेचन करावे.
 सर्वप्रकारची औषधे विरेचन पंचकर्माकरिता कोठा व अन्य घटक बघून द्यायची असतात. विरेचनासाठी दिलेली औषधे पोटात जिरवित, उलटीतून बाहेर पडू नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
बस्तीकर्म
बस्ती म्हणजे एनिमा. वातप्रकोपात बस्ती दिली जाते. या चिकित्सेचे ३ प्रकार पडतात.
 • निरूह बस्ती २.अनुवासन बस्ती ३. उत्तर बस्ती
या तिघांचे कार्य वातावर असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र व विकारांचे स्वरूप वेगवेगळे आहे.
वाताचे कार्य समजून घेण्याआधी वाताचे कार्य समजून घेऊया.
शरीरातील सर्व यंत्रणा ही वायूच्या अधीन राहून काम करते. कफ, पित्त, रसरक्तादी सात धातू, मलमूत्रादी तीन मळ हे वायूच्या कार्याअभावी व्यर्थ होत. प्रत्येक शरीरघटकास वायूच्या गतीमुळेच काम करण्याची संधी मिळते. वायूच्या अभावी शरीर क्षणात निकामी होऊ शकते. वायू ही शक्ती दिसत नसूनही आपल्या कार्याने वा त्याच्या अभावाने सर्वत्र जाणीव उत्पन्न करून देते.
वायूचे रुक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म व चल असे सहा गुण सांगितले आहेत. या गुणांत वैगुण्य आले की, वातविकार बळावतात. वाताचे विविध प्रकार आहेत. अर्धांगवात, संधिवात, आमवात, धनुर्वात, हातपाय मुरगळणे, तोतरेपणा येणे, पोटात वात धरणे, अतिसार, वारंवार लघवी होणे, कठीण मलप्रवृत्ती, स्त्री – पुरुषांचे आर्तव व शुक्रसंबधीचे विकार, निद्रानाश, स्मृतीभ्रंश हे सर्व वाताचे विकार आहेत. ताणताणाव, अतिजागरण, शरीराचे स्वाभाविक मल – मुत्रादी वेग अडवणे खूप थंड पदार्थांचे प्राशन, मानसिक त्रास, तिखट, तुरट, कडू पदार्थांचे मर्यादेबाहेर सेवन यामुळे वाताच्या कार्यात असंतुलन निर्माण होऊन वातप्रकोप होतो.
शरीरात वात सर्वत्र असला तरी त्याची विशेष स्थाने पक्वाशय, कंबर, मांड्या, कान, हाडे, त्वचा ही सांगितली आहेत. सप्त धातूच्या अस्थी या धातूच्या आश्रयाने वात राहात असतो.
आता बस्ती चिकित्सेबद्दल समजून घेऊ. बस्तीसाठी स्नेह व स्वेद्कर्म आवश्यक आहे. विधीपूर्वक बस्ती घ्यायचा असेल तर सात दिवस पूर्वकर्म अवश्य करून घ्यावे. बस्तीच्या आधी अजीर्ण झालेले नसावे. तसेच मल-मुत्र विसर्जन व्यवस्थित झालेले असावे.
बस्तीचा कालावधी –
निरूह व अनुवासन बस्तीसाठी योग्यकाल संध्याकाळी ६-७ वाजता असावा. त्यादिवशी जेवण ११ वाजता झालेले असावे. ही वेळ शक्य नसेल तर पहाटे लवकर उठून मलमूत्र विसर्जनानंतर बस्ती द्यावा. निरूह बस्ती अगोदर आतडी स्निग्ध होण्यासाठी मात्राबास्ती (तेलाची पिचकारी) द्यायची असेल तर दोन्हीत अर्ध्या तासाचे अंतर असावे. स्त्रियांच्या आर्तव  विकारावर उत्तरबस्तीची योजना परिणामकारक ठरते. उत्तरबस्तीचा योग्य काळ आर्तवाचा होय. त्यावेळेस योनीमार्ग विस्तृत झालेला असतो. याकाळात चौथ्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत उत्तरबस्ती द्यावा.
नस्य –
नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे. डोक्याशी संबधित डोळे, नाक, कान, घसा इत्यादी अवयवांशी संबधित उपाययोजनेसाठी नाक हे महाद्वारच होय. नाकातून टाकलेल्या औषधांचा परिणाम लगेच आणि कालांतराने गळ्याच्या वरच्या अवयवाच्या विकारात होतो. हे औषध केवळ नाकाच्या वर पोहोचते असे नाही तर त्याचा परिणाम डोळे, कान, नाक, घसा इत्यादी अवयवांच्या कार्यावर होतो. यामुळे डोकेदुखीही बरी होते.
नियमित नस्य केल्याने त्वचा, खांदे, मान, तोंड, छाती जाड व बळकट होते. इंद्रिये बळकट होतात. केस पिकत नाहीत. मात्र त्यासाठी नस्य द्रव्य योग्य तेच निवडावे.
नस्य विरेचन, बृहण व शमन असे तीन प्रकारचे असते.
विरेचन नस्य – डोकेदुखी, डोके जड होणे, सर्दी, गळ्याचे विकार, सूज, गालगुंड इत्यादी विकारांत विरेचन नस्य उपयोगी ठरते. यासाठी वापरात असलेली औषधे (उदा. वेखंड, हिंग, लसून, पुदिना, सुंठ इ.) ही तीव्र व तीक्ष्ण गुणाची असतात. या नस्यप्रयोगामुळे शरीरातील वायू ओ आकाश तत्त्व जागे होते.
बृहण नस्य – वातप्रधान शूल, तीव्र डोकेदुखी, आवाज बसणे, नाक व तोंड कोरडे पडणे, डोळ्यांची उघडझाप करताना त्रास होणे अशा विकारांत बृहण नस्य केले जाते. त्यासाठी तूप, मांसरस, रक्त, मोचरस असे पदार्ध वापरतात. या नस्याचे कार्य पृथ्वी व आप तत्वाचे पोषण करण्यासाठी असते.
शमन नस्य – केस गळणे, पिकणे, तोंडावर तीळ वा मुरुमाचे फोड येणे, डोळे लाल होणे असा विकारांत शमन नस्य उपयोगी ठरते. सततची रात्रपाळी, मद्यपान यामुळे डोळे लाल होत असल्यास शमन नस्याचा उपयोग करावा. यासाठी दूध व पाणी यात बृहण नस्यासाठी सांगितलेली औषधे मिसळून वापरतात. याचा उपयोग अग्नितत्वाच्या शांतीसाठी केला जातो.
नस्य कोणाला देऊ नये –
 • ज्यांनी नुकतेच पाणी, मद्य, तूप असे पदार्थ घेतले असतील . भात खाल्ला असेल,
 • डोक्यावरून आंघोळ केली असेल,
 • सर्दी, पडसे, खोकला झाला असेल,
 • नुकतेच बाळंतपण झाले असेल,
 • बस्ती, रक्तमोक्षण असे शोधन उपचार केले असतील अशांना नस्य देऊ नये.
कारण त्याच्या अगोदरच्या क्रियेत विक्षेप येण्याची वा त्या क्रियांचा सुपरिणाम होण्याऐवजी दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. जेवण उलटून पडणे, परसाकडचा वेग थांबणे, वात कोंडणे इत्यादी गोष्टी यामुळे घडू शकतात.
रक्तमोक्षण –
वमन, विरेचन, बस्ती, नस्य यांच्याप्रमाणेच रक्तमोक्षण हे तितकेच प्रभावी व आवश्यक कर्म आहे.
रक्तमोक्षणाचे सिरावेध, श्रुंग (शिंग), जलौका, अलाबु (भोपळा) व प्रच्छान (फासण्या) असे पाच प्रकार आहेत.
रक्तदाबाचे विकार, रक्ताधिक्य असल्यास दरवर्षी विधीपूर्वक रक्तमोक्षण केल्यास चांगला परिणाम दिसून येतो. दोषांच्या अधिक्याप्रमाणे व व्यक्तीच्या प्रकुतीला अनुसरून असा रक्तमोक्षणाचा पर्याय निवडावा.
रक्तमोक्षण कोणाला करावे –
 • विसर्प, विद्रधी, रक्तवृद्धी, शोथ, कुष्ठविकार, मुखरोग, शिरोरोग, उच्च रक्तदाब असा विकारांत रक्तमोक्षण अवश्य करावे.
 • याशिवाय औषधांनी न उतरणारा ताप, रक्तदुष्टीची शंका असेल तर रक्तमोक्षण करावे.
 • शरीराचा दाह, सर्वांगाला खाज येणे, नाका-तोंडातून घाण किंवा पू येणे, गुल्म, प्लीहा, उपदंश, वातरक्त, खूप घाम येणे इत्यादी कफपित्तप्रधान व्याधींवर रक्तमोक्षण प्रभावी काम करते.
रक्तमोक्षण केव्हा करावे ?
 • शरद ऋतूत निरोगी व्यक्तीने रक्तमोक्षण अवश्य करून घ्यावे. त्यामुळे आरोग्य राखण्यास मदत होते.
रक्तमोक्षण केव्हा करू नये ?
 • ज्यावेळेस बाहेरचे वातावरण खूप थंड वा खूप उष्ण असेल, तसेच खूप ढग आले असताना रक्तमोक्षण करू नये.
 • जेथे वातप्रकोप होण्याची शक्यता आहे त्यांचा शिरोवेध करू नये.
 • ज्यांच्या शिरा (नीला) चटकन सापडत नाहीत त्यांच्याबाबतीत रक्तमोक्षण टाळावे.
 • नुकतीच इतर शोधनकर्मे केली असताना योग्य त्या स्नेहस्वेद या पूर्वकर्माशिवाय रक्तमोक्षण करू नये.
  • सिरावेध – सार्वदेहिक रक्तपुष्टीसाठी सिरावेध हा उपचार केला जातो. सिरावेध हा बहुतांशी नीला या शिरांचा वेध करून रक्तमोक्षण करण्यात येते. हे कर्म फार अवघड नाही. पण तज्ञ वैद्याकडूनच तो करून घ्यावा.
  • जलौकावचारण – स्थानिक व पित्तप्रधान रक्तदुष्टीकरिता जळवा लावणे हा चांगला उपाय आहे. जळवांना जलौका, जळू, लीच अशा नावांनी ओळखले जाते. त्यांचे सविष व निर्विष असे दोन प्रकार आहेत. सविष जळवांच्या अंगावर केस असतात, रंग चित्रविचित्र, स्वरूप उग्र आणि आकार मोठा असतो. त्यांचा दंश असह्य असतो. हा जळू अंगाला लावला असता अंगाची खूप आग होते, सूज येते. रक्त थांबत नाही. घाण पाण्यातील जळवा विषारी असतात.
निर्विष जळवा कमळे, शेवाळे असलेल्या सरोवरात, तलावात मिळतात. स्वच्छ पाण्याच्या जलाशयातील जळवा निर्विष असतात. त्यांचा आकार तुलनेने लहान असतो. रंग किंचित काळसर, लालसर असा असतो. त्या रक्त लवकर शोषून घेतात.
जळू लागलेल्या जागेपासून एक वितभर दुष्ट रक्त शोषून घेतात. पोट भरल्यावर सुटतात. जळवा लावल्याबरोबर जर कंडू, आग, ठणका सुरु झाला तर खूप हळद टाकून जळू सोडवून घ्यावी. काही त्रास झाला नाही तर जळू आपणहून सुटेपर्यंत राहू द्यावी. जळू सुटल्यावर त्या जागी हळद दाबून वर कापूस ठेऊन पट्टी बांधावी.
 • शृंग – यासाठी गाईचे शिंग वापरण्याची पद्धत आहे. यालाच तुंबडी लावणे असेही म्हणतात. वातप्रधान रक्तदुष्टीसाठी याचा उपयोग करतात. जे रक्त खूप पातळ आहे, चटकन गोठत नाही, फेस आहे त्या विकारात शृंगाचा वापर करतात.
 • अलाबु – कफप्रधान रक्तदुष्टीसाठी स्थानिक जागी याचा उपयोग करतात. कफप्रधान रक्तदुष्टीत रक्त बुळबुळीत, चिकट, दाट असते.
 • प्रच्हान – प्रच्हान किंवा फासण्या मारणे हा उपचार अतिशय सोपा असून यासाठी फार साधनसामग्री लागत नाही. यात रक्तमोक्षणाचे फायदे त्वरित मिळतात. रक्त साकळणे, सूज, मार लागणे इत्यादी विकारात याचा उपयोग होतो.
आयुर्वेदातील पंचकर्म हे जितके सोपे तितकेच अवघड. पण योग्य ते योग्य पद्धतीने झाले तर त्याचा सुपरिणाम हा स्वास्थ्यकारक ठरणारा असतो हे निश्चित !