पंचकोषविज्ञान

आयुर्वेद शास्त्रात चिकित्सा करताना ‘षङ्धातात्व पुरुषाची’ चिकित्सा करावी असे सांगितले आहे. शारीरिक स्वास्थाबरोबरच मानसिक स्वास्थाचाही विचार आयुर्वेदीय ग्रंथात प्रामुख्याने केलेला पाहावयास मिळतो. आयुर्वेदाने मानवी शरीराचे एकूण पाच कोष सांगितले आहेत. कोणते आहेत हे पंचकोष? आणि त्याचे नेमके कार्य काय याविषयी…
————————————————–
स्वास्थ्यक्षेत्रात आज एवढे संशोधन होऊनही Physcomatic, Auto-immune, Immune deficiency  इत्यादी कारणांमुळे होणार्‍या व्याधींचे प्रमाण वाढतच चालले आहे. म्हणूनच Holistic Medicine दृष्टीकोनाची आवश्यकताही वाढली आहे. या विचारसरणीचा आयुर्वेदात संदर्भ गंगाधरटिकेतील ‘पंचकोषविज्ञानाअंतर्गत’ दिसून येतो.
Holistic  शब्दाची ऑक्सफर्ड डिक्शनरीमधील व्याख्या पुढीलप्रमाणे आलेली आहे. Treating the whole person rather than just the symptoms of disease.
Holistic = Originated from Greek word ‘Holis’ ज्याचा अर्थ पूर्ण, संपूर्ण, परिपूर्ण असा होतो.
Holistic  Healing मध्ये मानवाच्या स्थूल शारीरिक आयामाबरोबरच, सूक्ष्म, मानसिक, प्राणिक, भावनिक, सामाजिक, बौद्धीक व अध्यात्मिक स्तरावर अभ्यास केला जातो.
आधुनिक वैद्यकशास्त्रात चिकित्सा करताना Nektonic Reducinis Law चा अवलंब केला जातो, ज्याचा अर्थ Treating Human like machine असा होतो.
याविरुद्ध आयुर्वेद शास्त्रात चिकित्सा करताना ‘षङ्धातात्व पुरुषाची’ चिकित्सा करावी असे सांगितले आहे. शारीरिक स्वास्थाबरोबरच मानसिक स्वास्थाचाही विचार आयुर्वेदीय ग्रंथात प्रामुख्याने केलेला पाहावयास मिळतो.
मानवी शरीरात एकूण ‘पाच’ कोष सांगितले आहेत.
1) अन्नमयकोष
2) प्राणमयकोष
3) मनोमयकोष
4) विज्ञानमयकोष
5) आनंदमयकोष
अन्नमयकोष –
रसरक्तादी सप्तधातुद्वारा निर्मित ‘स्थूलशरीर’ म्हणजेच ‘अन्नमयकोष’; जे की चक्षुरेन्द्रिय ग्राह्य असते.
ह्या अन्नमयकोषाचे भरणपोषण अन्नाद्वाराच होते. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रात अन्नाला विशेष महत्त्व आहे.
चरकाचार्यांनी ‘अन्नपानचतुष्काचे’ विशेषत्वाने वर्णन केलेले आहे. त्यामध्ये अन्नपानवर्ग, द्रवद्राव्यवर्ग यामध्ये आहारद्रव्यादिकांचे गुणधर्म सविस्तरपणे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे पथ्यापथ्य, अष्टौआहारविधी विशेषआयतन, आहारपरिणामकरभाव इत्यादींचे देखील सविस्तरपणे वर्णन केलेले आहे.
म्हणूनच अन्नमयकोषाची चिकित्सा करताना आहाराचा, पथ्यापथ्याचा, योगासन ह्यांचा विचार करावा.
प्राणमयकोष
ज्यामध्ये सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सौरऊर्जा असते तर हवेपासून मिळणारी पवनऊर्जा असते. त्याप्रमाणे शरीराच्या Biological Energyला प्राण असे म्हणतात.
प्राणमयकोषाचे संवर्धन ‘पंचप्राणाद्वारा’ होते. प्राणमयकोष सूक्ष्म असल्याने चथुरेन्द्रियग्राह्य नसतो.
शरीर (स्थूलशरीर) व मन यांचा सेतू म्हणजेच ‘प्राणमयकोष’. प्राणमयकोषाची चिकित्सा करताना ‘प्राणायामादि’ योगक्रियांचा उपयोग होतो.
मनोमयकोष
आपल्यामध्ये चालणार्‍या अंडित विचारांचा प्रवाह म्हणजेच मन. हे विचार आपल्याला चक्षुरेन्द्रियांनी दिसत नाहीत. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचे कारण हे विचारच असतात. आपले हे विचारमय मन अतिसूक्ष्म असल्याने याची गती, शक्ती व व्याप्ती ही अमर्याद आहे.
ज्याप्रमाणे अन्न व प्राण दोन्ही शरीराचे भोजन आहेत हे स्पष्टच आहे. त्याचप्रमाणे आपले विचारही मनोमयकोषाचे भरणपोषणासाठी आवश्यक असतात. आपले विचार आपल्या ज्ञान व त्याद्वारा मिळणार्‍या अनुभवांवर आधारित म्हणून मनाचे भरणपोषण ज्ञानाद्वाराच होते.
विचार ही एक शक्ती व क्रिया दोन्ही आहे. मन व शरीर (अन्नमयकोष) दोहोंचा परस्परांवर परिणाम दिसून येतो. उदा. क्रोधोत्पत्ती झाल्यावर Tachycardia, Sweaty यांसारखी लक्षणे उत्पन्न होतात.
मानसिक व्याधींच्या अनुषंगाने या कोषाची माहिती असणे आवश्यक आहे.
मनोमयकोषाची चिकित्सा करताना प्रामुख्याने आहाराचाही विचार करावा. आहाराचाही मानसिकतेवर परिणाम होतो. उदा. मधुररस षङ् इन्द्रियप्रसादक सांगितलेला आहे. म्हणूनच तामसिक आहार वर्ज्य करुन सात्विक आहाराचाच उपयोग करावा. त्याबरोबरीनेच ध्यानादि कर्माचा (Meditation) मनोमयकोषाची चिकित्सा करताना विचार करावा.
प्राणमयकोष + मनोमयकोष = सूक्ष्मशरीर
स्थूलशरीर म्हणजेच अन्नमयकोषानंतर प्राणमयकोष आहे व त्यापाठोपाठ मनोमयकोष आहे मृत्युत्तर मनोमयकोष पूर्वीच्या संस्कारांना बरोबर घेऊन स्थूल शरीरातून वेगळ्या होऊन अन्नशरीरात प्रवेश करतो. मृत्युत्तर अन्नमयकोष नष्ट होतो. परंतु मनोमयकोष नष्ट होत नाही.
समाधिस्थ पुरूषच मनोमयकोष नष्ट करु शकतो.
विज्ञानमयकोष
विज्ञानमयकोष म्हणजे ‘आंतरिक ज्ञान, विवेक’!
या कोषाची निर्मिती बुद्धीद्वाराच होते. बुद्धीमुळेच मनुष्य व इतर प्राण्यांमध्ये भिन्नता दिसून येते.
आपले सर्व विचार आपल्या ज्ञानावर, बुद्धिमत्तेवर निर्भर असतात. मानवी शरीरात ज्ञात अनुभव-विवेक यांचा आयाम सर्वात सूक्ष्म आहे. यामुळेच ‘मूलतम’सुद्धा आहे. या विज्ञानमय शरीराद्वारा जीवनाची दशा व दिशा निश्‍चित होते.
विज्ञानमयकोष विकसित झाल्यावर अयोग्य, अज्ञानपूर्वक उत्पन्न होणार्‍या विचारांना झटकून योग्य विचार उत्पन्न होतात.
या विज्ञानमयकोषाचे भरणपोषण व संतुलन विवेकपूर्ण श्रवण-पठण-मननाद्वारा होते.
आनंदमयकोष
‘स्व’मध्ये स्थापित होणे म्हणजेच आनंदमयकोष!
आनंदमयकोष म्हणजेच स्वत:च्या अस्तित्वाचा अंतिम अनुभव जो आपल्या असण्याचा मूलकेंद्र आहे, तेजस्थान आहे. त्याला आनंदमयकोष म्हणतात. अध्यात्मशास्त्रात यास विविध नावांनी ओळखले जाते. हेच केंद्र आपल्या अनुभव व अभिव्यक्तीसाठी या पंचआयात्मक यंत्राची निर्मिती करते. सर्व आयाम या केंद्राशी जोडलेले वस्त्राप्रमाणे गुंडाळलेले असतात. मनुष्य या वस्त्रस्वरुप आयामांच्या अनुभवात ‘स्व’चा केंद्राचा अनुभव विसरुन जातो.
ह्या केंद्रस्थानावर स्वत:च्या अनुभवावर स्थापित होणे व या शरीररुपी साधनाद्वारा पूर्णरुपाने अभिव्यक्त होणे म्हणजेच जीवन (Holistic Being) आहे.
अशाप्रकारे पंचकोषात्मक ज्ञानाद्वारा सर्वांगाने, परिपूर्ण विचार करुन यशस्वी चिकित्सा करता येते.