आयुर्वेदाबद्दल समज व गैरसमज

आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र असले तरी त्याच्या वापराबाबत अनेक समज-गैरसमज आढळतात. शरीराशी निगडीत असणार्‍या सर्व गोष्टी ज्या शास्त्रात सांगितलेल्या आढळतात त्याला आयुर्वेद-शास्त्र असे म्हटले जाते. त्यातील वस्तुनिष्ठता स्पष्ट करणारा लेख…
————————————————–
आयुष: वेद: आयुर्वेद:।
आयुष्याशी संबंधित शास्त्र ते आयुर्वेद शास्त्र.
आयुर्वेद शास्त्र हे भारतवर्षातील फार प्राचीन असे राष्ट्रीय चिकित्साशास्त्र आहे. मनुष्यप्राण्याचे शरीर, त्याची पांचभौतिक उत्पत्ती, शरीराची रचना, त्याचे निरनिराळे व्यापार, कार्यपद्धती, त्याला होणार्‍या आभ्यंतर व बाह्य व्याधी. त्या होऊ नयेत म्हणून योजावयाचे प्रतिबंधक उपाय, व्याधी झाल्यास ते ओळखण्याची साधने व उपाय. बाल, वृद्ध, स्त्री यांना होणारे व्याधी, त्यांचे निराकरण करण्यासाठी निरनिराळे उपक्रम, औषधे, यंत्रे, शस्त्रे, मंत्र-तंत्र आदि उपक्रम. या शरीराशी निगडीत असणार्‍या सर्व गोष्टी ज्या शास्त्रात सांगितलेल्या आढळतात त्याला आयुर्वेद-शास्त्र असे म्हटले जाते.
आयुर्वेदाची आठ अंगे आहेत.
तद्यथा – ‘शल्यं शालाक्यं कायचिकित्सा भूतविद्या कौमारभृत्यम् अगदतन्त्रं रसायनतन्त्रं वाजीकरणतन्त्रमिति।’
1) शल्यतन्त्र – Surgery
2) शालाक्यतन्त्र – Opthalmology  and Otorhinolaryngology (E.N.T.)
3) कायचिकित्सा – Medicine
4) भूतविद्या – Psychiatry
5) कौमारभृत्य – Paediatrics
6) अगदतन्त्र – Toxicology
7) रसायनतन्त्र – Geriatrics
8) वाजीकरणतन्त्र – Science of fertility and Virility
अशाप्रकारे सर्व चिकित्सा-विशेषज्ञांचा आयुर्वेदात समावेश केलेला आढळतो. परंतु या भूतलावरील मायाविश्‍वात आपण आपल्याजवळ हृदयमंदिरी असलेल्या अमृतमय ज्ञानाला ग्रहण करण्यास जवळजवळ विसरलो आहोत.
आयुर्वेदाबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. आयुर्वेदाबद्दल गैरसमज असा की आयुर्वेदतज्ञ हे शस्त्रकर्म जाणत नाही वा ते करु शकत नाही. आयुर्वेदशास्त्रात शस्त्रकर्मचिकित्सा आहे असे कोणी म्हटले तर जनतेत आश्‍चर्य प्रकट केले जाते. परंतु शस्त्रकर्म चिकित्सेचा उमग हा आयुर्वेदातील शल्यतन्त्रातूनच झाला आहे. धन्वंतरी संप्रदायातील सश्रुताचार्य यांना सर्व प्रकारची शस्त्रकर्मे ज्ञात होती. ते कर्णपालीसंधान (Auroplasty), मूढगर्भचिकित्सा (Obstetric surgery), Plastic Surgery छिद्रोदर चिकित्सा (Traumatic perforation of intestine), अस्थिभग्न (fractures) इत्यादी शस्त्रकर्म करीत असत. तसेच ते मस्तिष्काच्या व्याधीवर देखील शस्त्रकर्म करीत असत. त्यावेळी आघात, भोजन व मद्य यांनी निर्माण होणारी तंद्रा संज्ञामोहन म्हणून वापरली जात असे. परंतु प्रभावकारी संज्ञानाशक द्रव्ये (Lack of effective anaesthetic agent) यांचा अभाव, प्रभावकारी जीवाणूनाशक व प्रतिजिवी औषधे यांचा अभाव (Antiseptics and antibiotics), शवच्छेदनाचा अभाव (Disection on dead body), भारतावरील बाह्यलोकांचे आक्रमण (Foreign invasions), राजाश्रयाचा अभाव (Lack of financer) यामुळे शल्यतंत्राचा र्‍हास होत गेला.
जनसमुदायात असा समज आहे, की आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्टस् होत नाही. परंतु औषधांची मात्र योग्य प्रमाणात नसेल तर औषधांचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. औषधीमात्रा ही व्याधीस्वरुप, रुग्णाचे बल, व्याधीचे बल, कोष्ठ, काल, देश, वय व औषधी कल्पना या सर्वांचा साकल्याने विचार करुन ठरवावी लागते. वत्सनाभ, कुचला, ताम्रभस्म यांसारखी विषद्रव्ये वा तीक्ष्ण द्रव्ये वापरताना त्यांची मात्रा अगदी अल्प वापरावी लागते. या सर्व बाबींचा विचार न केल्यास औषधांचा शरीरात विपरीत परिणाम (Side effects) होताना दिसतो.
आयुर्वेदिक औषधांना expiry date नसते, असे समजले जाते. परंतु औषधी कल्पनेनुसार त्यांचा सवीर्यतावधि (कार्मुकत्वाचा कालावधी) वर्णन केला आहे. उदा. चूर्णासाठी 2 महिने, काढा, स्वरस यांसाठी 1 दिवस म्हणजेच दररोज नवीन तयार केलेले असावे. परंतु बाजारात मिळणारी चूर्णे ही 2 महिन्यांपेक्षा जुनी असतात. तसेच बाटल्यांमध्ये काढे व स्वरसही शिळे विकले जातात. त्यामुळे व्याधींवर त्यांचा उचित परिणाम न दिसता शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.
सध्याच्या काळात भस्मकल्पना ही वादात सापडलेली आढळते. भस्मसेवनाने किडनी (वृक्क) खराब होतात. शरीरावर सूज येते. असा समज लोकांमध्ये दिसून येतो. भस्मनिर्मिती ही वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहे. यामध्ये भस्मद्रव्याला स्वरस, कल्क यांच्या अनेक भावना दिल्या जातात. याने त्यातील विषद्रव्ये निघून जातात. तसेच तीव्राग्नीचा वापर करुन भस्माला पुट दिले जातात. याने भस्मातील घटकांचे योग्य पचन होते व भस्म शरीरात सुलभतेने पचू शकते. या सर्व प्रक्रियेला भस्माचे शुद्धीकरण व सत्वपातन असे म्हणतात. परंतु काही कमी दर्जाच्या (Low standard) कंपन्या अधिक नफा कमावण्यासाठी या प्रक्रिया कमी-अधिक प्रमाणात गाळतात व तशीच अशुद्ध भस्मे बाजारात विकतात. यामुळे त्यांचा विपरित परिणाम शरीरावर दिसू लागतो.
आयुर्वेदामध्ये वनस्पती, चूर्णे, काढे, गुटिका इत्यादी पोटात देण्याच्या औषधींबरोबरच अनेकविध कर्मांचा सविस्तर उल्लेख केलेला आहे आणि अशा कर्मचिकित्सेत पंचकर्मांचा विशेष उपयोग सांगितला आहे. अनेकविध कर्मे चिकित्साग्रंथात जरी विस्ताराने सांगितली असली तरी आज बहुसंख्य वैद्य यातील फारच थोडी कर्मे करताना आढळतात. ग्रंथात लिहिल्याप्रमाणे दोषादिकांच्या बलाबलाचा, अवस्थांचा, स्थानांचा विचार करुन भिन्न भिन्न कल्पांचा उपयोग करुन केलेली चिकित्सा अभावानेच पाहावयास मिळते. अशी चमत्कारित परिस्थिती आहे. केवळ गोळ्या, पुड्या, पातळ औषध देऊन रुग्णांचे समाधान नीट होत नाही व अपेक्षेप्रमाणे चिकित्सेचा गुणही झटपट येत नाही. यामुळेच आयुर्वेदीय चिकित्सेबद्दल समाजात अनेक अपसमज रुढ आहेत. यासाठी आयुर्वेदीय रुग्णालयात रोग्यांना विशेष चांगली चिकित्सा मिळण्यासाठी, रोग संपूर्ण व लवकर बरे करण्यासाठी आयुर्वेदातील सर्व कर्मचिकित्सा शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने काही संस्थांत आयुर्वेदप्रेमी वैद्य काही प्रयत्न करीत असतात. उदा. साधी वमने, जलौका, रक्तमोक्षण, प्रतिमर्श, नस्ये, शिरोबस्ती, मोचरस पिच्छाबस्ती इत्यादी काही कर्मे थोड्याफार प्रमाणात केली जातात आणि त्यांचा उपयोगही फारच चांगला होतो.
सध्या देशातील अनेक प्रतिष्ठित आयुर्वेदिक चिकित्सालयांपैकी एक असणार्‍या वरळीच्या पोदार आयुर्वेद रुग्णालय, मुंबई येथे उपचार होणार्‍या अनेकविध रुग्णांमध्ये असे आढळून येते, की आधुनिक चिकित्सांपैकी सर्व विधी उपाय करुनही वंध्यत्वासारख्या तसेच मानसिक क्लेश देणार्‍या व्याधींमध्ये समाधानकारक उपशम मिळत नाही. अनेकदा असे निदर्शनास येते, की आधुनिकतम अशा आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्राचा 2-3 वेळा वापर करुनही पदरी निराशाच पडते. अशा रुग्णांमध्ये जर अनेकदा यशस्वी वापर करुन पाहिलेल्या पंचकर्म या उपक्रमाचा योग्य वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वापर केला तर निश्‍चितच या समस्येमध्ये सामधानकारक यश मिळू शकते. शेवटी शास्त्र कोणतेही असो रुग्णाचे हित व आरोग्य हेच महत्त्वाचे.
‘धर्मार्थकाममोक्षणाम् आरोग्यमूलउत्तमम्।’
– चरकसंहिता सूत्र. 1
प्राचीनकाळी भगीरथाने अथक प्रयत्नाने गंगेस स्वर्गातून भूलोकावर आणले होते. तद्स्वरुपच ऋषीमुनींच्या तपाने व ज्ञानाने समृद्ध अशा या अमृतमय आयुर्वेदशास्त्रासंबंधीचे समज-गैरसमज दूर करुन यथोचित उपयोग केल्यास मानवी जीवन निश्‍चितच समृद्ध होईल यात तीळमात्र शंका नाही.