योग म्हणजे काय?

योग म्हणजे काय?

योग म्हणजे सुखी समृद्ध जीवनाचा राजमार्गच आहे; परंतु या राजमार्गावर चालताना प्रथम मनाचा विचारकरावा लागतो. त्यावर नियंत्रण ठेवावे लागते आणि ते शक् होते ते योगाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाने.

तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर  करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा हा रामबाण उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे, रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक अॅलोपॅथीची औषधं खावेत की योगा करावा  अशा द्विधा मनस्थितीत असतात. पण लोकांना हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे.

लोकांना 70 टक्केपेक्षा जास्त रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण  30 टक्क्यांनी कमी होते.

भारतीय संस्कृतीचे मूळ असणारा ‘योग’ याचा प्रचार व प्रसार जगभर झालेला आहे. ‘योग’ हा शब्द ‘युज्‌’ या संस्कृत धातूपासून आला आहे. ‘योग’ हा सर्वसमावेशक शब्द आहे. जीवनात आनंदी, यशस्वी, समाधानी कसे व्हायचे याचे ज्ञान ‘योग’मध्ये दडलेले आहे.

पूर्वीच्या काळी आपले पूर्वज याच ‘योग’ जीवनपद्धतीचा अवलंब करत असत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशा अष्टांगांनी परिपूर्ण असणारा ‘योग’ मधल्या काळात दुर्लक्षित झाल्याकारणाने आपल्या देशास अेनक समस्यांना सामोरे जावे लागले; पण अलीकडच्या काळात पुन्हा जास्त जोमाने याचा प्रचार व प्रसार झाला आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय उत्कृष्ट अशी बाब आहे.

‘मन’ हेच आपल्या सर्वांच्या सुख-दुःखांना कारणीभूत आहे. या मनावर जर बुद्धीच्या साह्याने योग्य नियंत्रण ठेवले, तर आपल्या भावभावना व विचारही काबूत राहतात. परिणामी, आपल्या पंचज्ञानेंद्रियांद्वारे वा पंचकर्मेंद्रियांद्वारे चुकीच्या गोष्टी घडत नाहीत. दुःखाची निर्मिती होत नाही.

योग म्हणजे सुखी व समृद्ध जीवनाचा राजमार्गच आहे; परंतु या राजमार्गावर चालताना प्रथम मनाचा विचार करावा लागतो. त्यावर नियंत्रण ठेवावे लागते आणि ते शक्‍य होते ते योगाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाने.


योग म्हणजे काय?

योगशास्त्र हे भारतीय षड्‌दर्शनांपैकी एक असून, त्यामध्ये वेदांचे ज्ञान सोप्या पद्धतीने सांगितले आहे. म्हणूनच योगविद्येला वेदविद्या किंवा ब्रह्मविद्या म्हणून संबोधले जाते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये विविध प्रकारांनी योगाचे वर्णन केलेले आढळते. त्यापैकीच गीतेच्या दुसऱ्या अध्यायात ‘योगः कर्मसु कौशलम्‌’ असे वर्णन आढळते. कामामधील कुशलता म्हणजे योग. कामामधील सुंदरता म्हणजेच योग. आज प्रत्येक व्यक्तीने नेमून दिलेले काम नेटकेपणाने केल्यास तोही एकप्रकारे योगच होय. योग हा शब्द ‘युज्‌’ या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ जोडणारा असा अभिप्रेत आहे. शरीर आणि मन यांना जोडतो तो योग, अशी योगाची सोपी व्याख्या आहे. मनाच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग. एकदा ही सोपी व्याख्या समजली म्हणजे मग भगवद्‌गीतेमधील ‘योगस्थः कुरू कर्माणि’चा अर्थही सहज समजतो व आचारणातही आणता येतो. शरीर व मनाची एकाग्रता साधून काम करणे म्हणजे एकप्रकारे ‘योग’ करणे होय. रोजच्या जीवनामध्ये व्यक्तीला आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्याचे सामर्थ्य योगामुळे प्राप्त होऊ शकते. त्यामुळे मनाची एकाग्रता साधून चंचलता दूर होते, व्यक्तीची निसर्गाशी अधिक जवळीक निर्माण होते, मनःशांती लाभते.

जागतिक स्तरावर शांतता, सलोखा व एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी ‘योग’ हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरावे. त्यादृष्टीने भारतामधील काही योगीपुरुष सातत्याने अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामध्ये श्री श्री रविशंकर, रामदेवबाबा, योगगुरू (कै) बी. के. एस. अय्यंगार, महर्षी महेश, योगी स्वामी शिवानंद, स्वामी विष्णुदेवानंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद अशी कितीतरी नावे घेता येतील. महर्षी महेश योगींनी ‘अष्टांग योगा’वर अतिशय सुंदर भाष्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘अष्टांग योगा’चा सराव करणे म्हणजे आयुष्याच्या आठ वेगवेगळ्या परिघांमध्ये एकाच वेळी योगाची स्थिती वाढवत जाणे व सर्वांत शेवटी मोक्षाप्राप्तीचे उद्दिष्ट गाठणे, हेच होय.

प्राणायाम (अष्टांगयोगांपैकी एक) म्हणजे श्‍वसनाच्या व्यायामाद्वारे योगसाधना. मानसिक चिंता, काळजी (anxitey) दूर करण्याचा एक सहज आणि उत्कृष्ट उपाय म्हणजे अनुलोम-विलोम प्राणायाम. आयुर्वेदिक चिकित्सेचा एक भाग म्हणून आम्ही बऱ्याच वेळा रुग्णांना या प्रकारचा प्राणायाम करण्याचा सल्ला देतो. कॉस्टिपेशनसारख्या लक्षणांमध्ये कपालभाती प्राणायाम अधिक उपयोग ठरू शकतो, असा आमचा अनुभव आहे. आसन म्हणजेच शरीर आणि मनाचे एकत्रित (Neuro-muscular intigration) संतुलन होय. विविध प्रकारच्या आसनांमुळे शरीराची सर्व अंगप्रायंगे, सर्व अवयव यांच्यामध्ये एकसूत्रीपणा राहतो. मधुमेह, हृदयविकार, पाठदुखी, कंबरदुखी इत्यादी अनेक व्याधींमध्ये आसनांचा औषधांइतकाच प्रभावी उपयोग होऊ शकतो. आयुर्वेद आणि योग यांची सांगड घालताना महर्षी महेश योगी यांनी महर्षी पतंजलींच्या एका योगसूत्राचा अतिशय सुरेख आधार घेऊन या दोन्ही शास्त्रांचे ध्येय कसे एक आहे हे कित्येक दशकांपूर्वी सांगितले. ते सूत्र म्हणजे ‘हेयं दुःखं अनागतम्‌!

अर्थात दुःख (व्याधी) येण्यापूर्वीच टाळावे.