नामस्मरण कशासाठी करायचे?

 

संसारातील असंख्य व्यथा-व्याधींनी गुरफटलेल्या जीवाला मुक्त होण्यासाठी सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या नामस्मरणाचाच आधार असतो. म्हणूनच हे नामस्मरण सतत केले पाहिजे. त्याची योग्य पद्धत माहित करून घ्यायची तर त्याविषयीचे मार्गदर्शनही योग्य घडायला हवे.

 

जीव हा अनंत दोषांचा अपराधी आहे. त्याला या जन्म-मरणाच्या चक्रातून आणि सृष्टीरचनेच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे असेल तर नामस्मरण हाच एकमेव मार्ग आहे. या नामस्मरणासाठी कोणत्याही साधनाची, साहित्याची वा वेळेची आवश्यकता नाही. मनात फक्त परमेश्वराची आवड निर्माण झाली पाहिजे. नामस्मरणामुळे घरात संस्कारमय वातावरण निर्माण होतेच, शिवाय पूर्वजन्मीचे व सध्याचे असे अघटीत पापकृत कमी होण्यास मदत होते. प्रत्येक प्राणीमात्राप्रती दयाभूत, प्रेम अवस्था उत्पन्न होऊन दानधर्म करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.

यासाठी नामस्मरण का करावे? कोणते नाम घ्यावे? ते कोणाकडून स्वीकारावे? नंतर त्याचा फायदा करून घेण्यासाठी पुढील कार्य काय काय करावे? नामस्मरणाचे फायदे, समाधान यात चिंतन करीत राहून किती अधिक प्रमाणात जीवेद्धारण करण्याचा प्रयत्न करावा, तो एकविध भक्तीने आणि परब्रम्ह परमेश्वर उभयदृष्यावताराने स्वीकारलेल्या नामस्मरणाने होईल, ते कोणाचे व का करावे हे समजून घेणे गरजेचे आहे.

नामजप करताना चुकीचा उच्चार केला, त्यात व्यवस्थितपणा ठेवला नाही तर त्याचा फायदा न होता उलट निराशाच पदरी पडते आणि आधीच विकल्पग्रस्त असलेला जीव पुन्हा तिकडेच आकर्षिला जातो. हातात फक्त जपमाळ असते, मनी भराभर वर सरकत असतात, लक्ष मात्र विचलित-सैरभैर झालेले असते. संसारातील असंख्य व्यथा-व्याधींनी गुरफटलेल्या जीवाला मुक्त होण्यासाठी सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या नामस्मरणाचाच आधार असतो. म्हणूनच तो सतत घडायला हवा आणि योग्य रीतीने व योग्य मार्गदर्शनाने व्हायला हवा. यासाठीच हा केविलवाणा प्रयत्न.

यज्ञांना जप यज्ञोस्मीः

कलियुगात नामस्मरण हेच जीवाला तारणारे आहे. जीवाचे कल्याण करणारे आणि रक्षण कारणारे आहे. नामस्मरण जपयज्ञ केले असता या युगात विश्वशांती, पर्यावरणाचे रक्षण आणि आत्मकल्याण संभवते. तसे पाहता यज्ञ अनेक प्रकारचे आहेत. द्रव्ययज्ञ, ज्ञानयज्ञ, भूमीयज्ञ, अन्नयज्ञ इत्यादी. या यज्ञांत जपयज्ञ श्रेष्ठ यज्ञ आहे. भगवान श्रीकृष्ण भागवत गीतेत म्हणतात, 

‘यज्ञांना जप यज्ञोस्मीः’ म्हणजे अर्जुना, यज्ञात जपयज्ञ मीच आहे. म्हणून या युगात नामस्मरण श्रेष्ठ आहे. कलियुगाचा अधिपती कालीराजसुद्धा नामस्मरणापुढे हतबल व नतमस्तक होतो. त्याने तसे वचन देवाला दिले आहे. म्हणून कलियुगात नामस्मरण हेच आत्मउद्धाराचे सोपे साधन आहे. इच्छित मनोकामना नामस्मरणानेच थोपवल्या जातात. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, नामस्मरण करा. जो नामस्मरण करतो त्याचा परमेश्वर अभिमान घेतात. ‘नामे अभिमान आतिः’ असे स्वामी म्हणतात.

          

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंडित माहीमभट्ट यांना जीवनमुक्तीचा संपूर्ण सिद्धांत सांगणारी ब्रह्मविद्या निरुपण केली. त्यात पूर्वी प्रकरण आधी सांगितले. पूर्वी प्रकरणाचा भावार्थ विद्वान पंडित महंत श्री मुरलीधर शास्त्री आराध्य बाबा भुसावळ यांनी केला आहे.

जन्म मृत्यू जरा व्याधिमय अनंत दुःखाचे आगार असलेल्या या संसारचक्रात गोवलेला जीव अनंत यातना भोगत आहे. त्याचा उबग येऊन त्यातून सुटका करून घेण्यासाठी कोणी गुरुभक्ती, कोणी देवभक्ती, कोणी तीर्थोपासना तर कोणी जपजाप्यादी विविध उपायांद्वारे अनुष्ठाने करीत असतात. परंतु यापैकी कोणत्याच साधने जीवाची संसारपाशातून सुटका होत नाही. जेव्हा कृपाळू परमेश्वरच कृपा करून निराकाराचा साकार होऊन य भूतलावर अवतार धारण करतो तेव्हा त्या जीवांची या संसारचक्रातून सुटका होते. म्हणून जीवांनी मोक्षप्राप्ती करीत सर्व सकाम विधी-विधानांचा त्याग करून ईश्वरीय यथार्थ ज्ञान मिळवण्याचा व परमेश्वरी भक्ती करण्याचा प्रयत्न करावा असा भावार्थ सांगण्यात आला आहे.

परमेश्वर प्राप्तीसाठी योग्य गुरूचचे मार्गदर्शन

जन्म-मृत्यूमधील कालखंड सर्व सामान्यपणे संसार प्रपंचात व्यतीत होणारा काळ मानला जातो. या संसार प्रपंचात असलेले जीव नित्यदिन सुख मिश्रित दुखः किंवा दुखःमिश्रित सुखाचा अनुभव घेत जीवन जगत असतात. ‘सुख पाहता जवापाडे दुखः पर्वताएव्हढे’ असे संत तुकारामांनी प्रापंचिक जीवस्वरूपाचे वर्णन केलेले आहे. सुखापेक्षा दुःखाचे भाग जास्त असल्यामुळे जीव वारंवार प्राप्त होणाऱ्या दुखाःने पिडीत होऊन त्यापासून सुटकेसाठी कधी गुरुभक्ती तर कधी देवताभक्ती करीत राहतो. खरेतर गुरु हा जीवच असतो. तो फक्त त्याच्या ज्ञानाप्रमाणे त्या मार्गाने मार्गक्रमण करीत असतो. मात्र त्यास अंतिम सुख देण्याचा प्रत्यक्ष अधिकार नाही. देवी-देवतांची भक्ती चुकीच्या गुरूच्या मार्गदर्शनानेच केली जाते. त्यामुळे देव परमेश्वरभक्तीचा लाभ होऊ शकत नाही. जीवाची अशी ही भक्ती म्हणजे फुकटची मजुरी होय. या संसारचक्रातून सुटून अंतिम सत्य जे परमेश्वर स्वरूप तिथे पोहोचण्याचे मार्गदर्शन यथार्थ करणारा गुरूच करू शकतो. अशा गुरुकडून परमेश्वर आणि त्याच्या प्राप्तीचे उपाय जाणून घेतल्याशिवाय परमेश्वरप्राप्ती शक्य होत नाही. हा परमेश्वर कसा आहे तो अवतार धारण करून जीवोद्धाराचे ज्ञान देतो. त्या ज्ञानानुसार आचरण झाले पाहिजे. परमेश्वर ही एक सर्वश्रेष्ठ शक्ती असून तो अदृश्य स्वरुपात विद्यमान आहे. त्याचे अधीन संपूर्ण सृष्टीचक्राचे नियंत्रण आहे. त्या परमेश्वर स्वरूपातून परमेश्वर सृष्टीमध्ये अवतार धारण करतो आणि अवतार आपल्या अदृश्य स्वरूपाचे तेथील अलौकिक आनंदाचे वस्तुस्थितीविषयी जीवना परिपूर्ण ज्ञान देतो. अवतार विद्यमान असताना सान्निध्यात येणाऱ्या जीवांना आपले सेवादास्य घडवतो. त्यांनी घडवलेले हे सेवादास्य जीवांना परमेश्वरप्राप्तीसाठी प्रदान करतो. त्या योग्यतेच्या बळावर परमेश्वरप्राप्तीला जीव पात्र होतो. परमेश्वर अवतार विद्यमान नसल्यावर मग कसे? हा स्वाभाविक प्रश्न जीवांना पडणे शक्य आहे. तरी ज्ञान, भक्ती, वैराग्य, शील गुरूच्या मार्गदर्शनाने परमेश्वर अवताराची भक्ती अविद्यामानी करावी, यासंबंधी मार्गदर्शन केले जाते आणि याच ज्ञानानुसार भक्ती करण्याची खरी गरज असते.

पहाटेचे नामस्मरण

पहिले पंचकृष्ण असताना पुन्हा पाच नामे का सांगितली तर पहिले पंचकृष्ण हे दास्यार्थी सान्निधान स्तीत पुरुषास व पुढील पंचनामे ते स्मरणार्थी असंन्नीधान स्तीत पुरुषास अशा प्रकारचा हा भेद आहे.

पहाटे ३ ते ६ या काळाला सारस्वत काळ म्हटले आहे. त्यावेळेस परमेश्वराचे अनंत ब्रम्हांडावर अवलोकन असते. म्हणून अशावेळी नामस्मरण केले तर त्यामुळे परमेश्वराला संतोष वाटतो व आपले स्मरण परमेश्वराच्या लेखी लागते. त्यावेळी असतीपरीची देवता हृदयाशी येते. अंतःकरणामध्येच परमेश्वराचे श्रेष्ठ नाम साठवले जाते.   

सर्वस्थ चाहं हदि संनीविष्टो

असे भगवान श्री कृष्ण चक्रवर्ती गीतेतील १५ व्या अध्यायात सांगतात. जर आपण झोपलेले असू तर परमेश्वरास असे वाटेल अरेरे! तुझ्यासाठी ही सृष्टी निर्माण केली आणि तू तर झोपलेला आहेस. या सारस्वतकाळी गृहस्थाश्रमी पुरुषाने निदान पाच गाठ्या तरी नामस्मरण करावे व अनुसरलेल्या पुरुषाने पंधरा गाठ्या कमीत कमी नामस्मरण करावे. अर्थात हे प्रत्येकाच्या प्रकृतीमानावर व सवयींवर अवलंबून राहील. नामाचे उच्चार स्पष्ट व बरोबर करावेत. असे परमेश्वराचे नामस्मरण एकांतवासात एकाग्र चित्ताने, गरुडासन घालून ई तोंडावर कापड घेऊन करावे. म्हणजे झोप येणार नाही, तसेच शरीर, मन व बुद्धी दक्ष राहील. कोणतेही कार्य अथवा धर्म सिद्धीस जाण्यासाठी शरीराची तंदुरुस्ती पाहिजेच.

शरीरमाद्यं खलु धर्म साधनं

अंतःकरणात पंचकृष्णाचे श्रेष्ठ नाम भरून राहणे याचे नाव भक्ती.  रात्री झोपताना भगवंताचे श्रेष्ठ नाम चिंतीत झोपावे व पहाटे जाग आल्यावर ते नाम चिंतीत करीतच उठावे. म्हणजे झोपेतील काळ परमेश्वराचे नामस्मरणात जातो. अशाप्रकारे भगवंताचे चिंतन झाल्यावर त्याचे मुखाने नामस्मरण करावे. त्याचे भजन म्हणावे. किंवा त्याचे स्तोत्र म्हणावे. आरती म्हणावी. नामस्मरण करणे वा भजन, मूर्तीवर्णन म्हणजे परमेश्वरास हाक देणेच होय. ईश्वराचे चिंतन करणारे मन ज्या देहात राहते ते पवित्र पाहिजे. सदाचारी माणूसच देहाने, मनाने, बुद्धीने शुद्ध असू शकतो. म्हणून मनात दुष्ट वासना किंवा पापबुद्धी ठेवू नये. नीतीधर्माचे आचरण सोडू नये. जीवनात जे खरोखर चांगले व सर्वश्रेष्ठ आहे त्याचा विचार मानवाने करायला हवा. म्हणून प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपला जो ईश्वरीय धर्म आहे तो धैर्याने शेवटपर्यत पाळावा. असा सदाचाराने वागणारा पुरुष जगात धन्य होतो व त्याला वेळोवेळी परमेश्वराचे सहाय्य मिळते.

अंतःकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम l

यः प्रयाति स सभ्दावं याति नास्त्यत्र संशय ll (गीता ८/५)

भगवान श्रीकृष्ण सर्व भक्तांना उद्देशून म्हणतात, अंतःकाळी-मरणसमयी माझेच नामस्मरण करीत जो देहत्याग करतो तो माझ्या भावास प्राप्त होतो, यात संशय नाही. त्याअर्थी मरतेवेळी परमेश्वराचे स्मरण करीत प्राण सोडले म्हणजे परमेश्वरप्राप्ती होणार हे ठरलेलेच आहे. तर मग आयुष्यभर परमेश्वर भक्ती करण्याची कटकट पाठीमागे का लावून घ्यावी? उत्तर असे की, मरणकाळ हा सर्वाना सारखा नसतो. कोणी एखादा विरळाच मरतेवेळी शुद्धीत असतो.

परमेश्वराचे स्मरण सदासर्वकाळ

काहींना शारीरिक व्याधीच्या वेदना इतक्या असह्य असतात की, त्यामुळे ते शेवटी बेशुद्ध होऊन पडतात व त्या बेशुद्धावस्थेत त्यांचे प्राण निघून जातात. म्हणून सर्वांनाच मरणकाळी परमेश्वराचे स्मरण होणे शक्य नाही. तसेच संपूर्ण आयुष्यात ज्याला एकदासुद्धा परमेश्वर कसा व कोण आहे याचे ज्ञान झाले नाही त्याला त्याचे अंतःकाळी स्मरण होणे हे परम दुर्लभ किंबहुना अशक्यच आहे. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात नेहमी सदासर्वकाळ परमेश्वराचे स्मरण करीत रहावे. मन निर्विषय करण्याचा अभ्यास नित्य चालू ठेवावा. म्हणजे अंतःकाळी तीच स्थिती कायम राहून कोणतीही अडचण न येता मनुष्य परमेश्वराचे नामस्मरण करीत प्राण सोडू शकेल व अखेर त्याला परमेश्वरप्राप्ती होऊन तो नित्यमुक्त होईल असे भगवान श्रीकृष्ण जीवाच्या प्रेमापोटी स्वतः सांगतात.

श्रीकृष्णाचे नामस्मरण करण्यासाठी कुशाग्र बुद्धीच हवे असे नाही. अनन्यप्रेमाने आणि व्याकूळ अंतःकरणाने त्याचे स्मरण केले तरी ते पुरेसे आहे. भगवंताला त्याच्या सरळ व प्रेमळ भक्ताने प्रेमपूर्ण अंतःकरणाने केलेले नामस्मरण फार आवडत असते. ते परमेश्वरप्राप्तीचे अत्यंत सुगम साधन आहे. श्रीकृष्णाचे नामस्मरण ही संसारसागरातून पार नेणारी तरणी-बृहनिका आहे. नामस्मरण करण्यासाठी कोणतेच श्रम पडत नाहीत. ते श्रमसाध्य नसून अनायास साध्य सुखसाध्य आहे. भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी कोणतीच अट नाही. वाटेल त्याला, वाटेल त्या वेळी, वाटेल त्या स्थळी, वाटेल त्या स्थितीत सदासर्वदा पवित्र असे श्रीकृष्ण नामस्मरण करण्यास मोकळीक आहे. त्यात काळाची अडचण मुळीच नाही. हे लक्षात ठेऊन जो परमेश्वराला मुक्ती, मुक्तीदायक मानून त्याच्या परम पवित्र चरणी प्रेमपूर्ण आपले मन, श्रद्धा समर्पित करील त्याला परमेश्वरप्राप्ती अवश्य होईल, यात तिळमात्र शंका नाही.

********************